Type to search

Featured सार्वमत

शिर्डीत युवकाची गोळ्या झाडून हत्या

Share

भरसायंकाळची घटना, एक अटकेत, तिघा हल्लेखोरांचा शोध सुरू

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नालारोडलगत असलेल्या हॉटेल पवनधाममध्ये अज्ञात इसमांनी शिर्डी येथील लक्ष्मीनगर भागात रहिवासी असलेल्या प्रतिक संतोष वाडेकर (वय 19) या युवकाच्या गळ्यावर गोळी झाडून हत्या केली. संशयित चार इसम हत्येनंतर पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी धाव घेतली आहे. पसार झालेल्या एका संशयित इसमाचे नाव नितीन वाडेकर असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजले आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना झाली आहेत. यातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

काल मंगळवार दि. 11 रोजी हॉटेल पवनधाम येथे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील नितीन वाडेकर याच्याबरोबर प्रतिक वाडेकर या दोघांसह पाच जणांना फ्रेश होण्यासाठी रुम नंबर 104 भाड्याने देण्यात आली होती. पाचजण रुममध्ये जाताच हॉटेल मालक गोविंद गरूर यांना जोरात गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. यावेळी हॉटेल मालकाने बाहेर येऊन बघितले असता तर चारजण पहिल्या मजल्यावरून खाली उतरून पळून जाताना दिसले. यावेळी यातील एका इसमास गोविंद गरूर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गरूर दाम्पत्यास प्रतिकार करत त्याने पलायन केले. यानंतर गरुर यांनी रूममध्ये गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत प्रतिक संतोष वाडेकर यास बघितल्यावर तातडीने पोलिसांत धाव घेत झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

दरम्यान, शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कसून चौकशी सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी तीन पोलीस पथके तैनात करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. याबाबत घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संतोष वाडेकर हा मूळ शिर्डी येथील लक्ष्मीनगर मधील रहिवाशी असून शिक्षणासाठी तो बाहेरगावी असल्याचे सांगितले. यावर्षी तो इयत्ता नववीत पास झाला असून दहावीत गेला होता. या घटनेने लक्ष्मीनगर भागात तणावपूर्ण वातावरण होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!