साईपादुका दौरा निर्णयासंदर्भात संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीला मुहूर्त सापडेना

0

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साई समाधी शताब्दी निमित्ताने साईबाबांचा प्रचार प्रसारासाठी देशभरात मुळ पादुका दौर्‍याच्या वादावर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 30 नोव्हेंबरपर्यत पादुका दौर्‍यासंबंधी निर्णय कळवु असे सुतोवाच केले होते. मात्र डिसेंबर उगावला तरीही अद्याप निर्णय न झाल्याने पादुका दौर्‍या संदर्भात निर्णय देण्यास या समितीला कधी मुहूर्त मिळणार याबाबत साईभक्तांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी 14 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पादुका दौर्‍याबाबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यिय समिती गठीत करण्यात आली असून यात उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त बिपीन कोल्हे व अ‍ॅड. मोहन जयकर यांचा समावेश आहे.

 

 

हि समिती दोन आठवड्यात पादुका दौर्‍यासंदर्भात निर्णय घेईल तो 30 नोव्हेंबर पर्यत कळविण्यात येईल. समितीच्या वतीने ग्रामस्थ आणि दुरवर असलेले साईभक्त यांच्याशी चर्चा करण्यात येईल. 30 नोव्हेंबर तारीख उलटुन गेली तरी या समितीला अजुनही मुहुर्त सापडला नसल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

 

याबाबत शिर्डी गावचे माजी सरपंच रावसाहेब गोंदकर, मुकुंदराव गोंदकर, भानुदास गोंदकर यांनी शुक्रवारी या विषयावर प्रतिक्रिया देतांना सांगितले बाबांच्या मुळ पादुका शिर्डीबाहेर नेऊ नये. तसेच पादुका दर्शनासाठी चांदीच्या पादुका न्याव्यात. प्रत्येकवेळी ग्रामसभा, गावच्या हितासाठी घेण्यात येणार्‍या निर्णाबद्दल ज्येष्ठांना डावलण्यात आल्याने आज शिर्डीमधील छोट्यामोठ्या व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. बाबांच्या मुळ पादुका दर्शन दौर्‍याला विरोध राहाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

 

उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांना पादुका दौर्‍यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीने काय निर्णय घेतला याबाबत विचारणा केली असता त्यांनी रविवारी दि.3 डिसेंबर रोजी समितीची बैठक होणार असून बैठकीत पादुका दौर्‍यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार तत्कालिन विश्‍वस्त मंडळाला धोरनात्मक निर्णय घेण्यास पाबंदी केल्याने हि त्रिसदस्यीय समिती साईभक्तांच्या श्रध्देचा मोठा विषय बनलेला पादुका दौर्‍यासंदर्भात निर्णय घेणार का याबाबत साईभक्तांमधुन तर्कवितर्क सुरु आहे.

LEAVE A REPLY

*