राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण

0

शिर्डी- मुंबई विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवुन प्रारंभ

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – साईभक्तांच्या सोयीसाठी काकडी येथे तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी सकाळी सव्वादहा वाजता पार पडले.
वायुसेनेच्या विमानाने रविवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विमानाला हिरवा झेंडा दाखवून विमानतळावरच्या कोनशिलेचे उदघाटन केले.
यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू, राष्ट्रपतीच्या सौभाग्यवती सविता कोविंद, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. स्नेहलता कोल्हे,
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, आ. शिवाजी कर्डिले, खा. दिलीप गांधी, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदींसह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींचे विमानतळावर मुख्यमंत्री व राज्यपाल यांनी स्वागत केले तर मुख्यमंत्र्याचे स्वागत पालकमंत्री राम शिंदे, आ. शिवाजी कर्डिले व आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
शिर्डी विमानतळावर चार विमाने उतरली होती. काकडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अगदी ठराविक लोकांनाच विमानतऴाच्या उद्घाटनासाठी पास देण्यात आले होते. विमानतऴावर 29 मिनिटांनतर 10 वाजून 25 मिनिटांनी राष्ट्रपतींच्या गाड्यांचा ताफा शिर्डीच्या दिशेने रवाना झाला.
यावेळी वाहनांचा ताफा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र कडेकोट बंदोबस्त असल्याकारणाने लांबूनच राष्ट्रपतींचा ताफा पाहिला. उदघाटनप्रसंगी विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी, श्रीमती वलसा नारायण नायर सिंग, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस प्रमुख रंजनकुमर शर्मा आदींसह आधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनंतरच्या पहिल्या शिर्डी-मुंबई विमानाने 12 प्रवाशांनी मुंबई प्रवास केला. दुपारी 4.30 वाजेच्या शिर्डी ते हैदराबाद या एअर इंडियाच्या पहिल्या 72 आसनी फ्लाईटने केंद्रीय हवाई उड्डानमंत्री गजपती राजू व पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह 60 प्रवाशांनी प्रवास केला. काकडी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांना विमानतळ प्राधिकरणाने निमंत्रण पत्रिका दिली होती, मात्र त्यांना पास दिले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
जमिनी देऊन प्राधिकरणाने शेतकर्‍यांशी असे वागणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.कमीतकमी प्रथम नागरीक म्हणून सरपंचांना तरी प्रातिनिधीक स्वरुपात पास देणे आवश्यक होते असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.

 फ्लाईट न.         ठिकाण              सुटण्याची वेळ पोहोचण्याची वेळ      वार
ए.एल.9653   मुंबई-शिर्डी दुपारी      03.20 मि. 04.05 मि.          सोम,मंगळ,गुरू,शनि
ए.एल.9654   शिर्डी-मुंबई दुपारी      04.30 मि. 05.15 मि.          सोम,मंगळ,गुरू,शनि
ए.एल.9653   मुंबई-शिर्डी सकाळी    08.30 मि. 09.15 मि.          बुध, शुक्र, रवि
ए.एल.9654   शिर्डी-मुंबई सकाळी    09.45 मि. 11.05 मि.          बुध, शुक्र, रवि
ए.एल.9869   हैदराबाद-शिर्डी दुपारी  02.05 मि. 03.55 मि.          दररोज
ए.एल.9870   शिर्डी-हैद्राबाद दुपारी   04.25 मि. 06.10 मि.           दररोज

LEAVE A REPLY

*