Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिर्डीत गावठी पिस्तुलासह दोघांना अटक

Share

एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुसे शिरपूर येथून केले होते खरेदी

शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डी शहरातील 1000 रुम परिसराच्या मागे संशयितरित्या फिरत असताना दोघा जणांना पोलिसांनी पकडून त्यांची अंगझडती घेतली. त्यात पोलिसांना एक गावठी बनावटीचा पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात या तिघाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून त्या अनुषंगाने शिर्डी शहरातील अग्निशस्त्र व हत्यारे यांचा पोलिसांनी शोध सुरू केला. त्यात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिर्डी शहरातील एका इसमाकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक इशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुले, पोलीस हे. कॉ. प्रसाद साळवे, पो. ना. बाबा सातपुते, पो. ना. किरण कुर्‍हे, पो. शिपाई अजय अंधारे, नितीन सानप हे पोलीस पथक तयार करून आरोपीच्या राहत्या घराजवळ सापळा रचला.

त्यानुसार अक्षय सुधाकर थोरात, रा. जवळके, ता. कोपरगाव, ह. मु. वाघवस्ती रोड, शिर्डी, ता. राहाता, पवन सुभाष भोत, रा. क्रांती चौक, निमगाव, ता. राहाता तसेच एक अन्य अल्पवयीन असे तिघेजण 1000 रुमच्या परिसरात संशयितरित्या फिरताना मिळून आले. या तिघा जणांची पोलिसांनी पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. याबाबत पोलिसांनी या तिघा आरोपींना या गावठी कट्ट्यासंदर्भात विचारले असता त्यातील अक्षय सुधाकर थोरात याने सदर गावठी पिस्टल धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून खरेदी केले असल्याची कबुली दिली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून सखोल चौकशी करून त्यांच्याकडून आणखी काही हत्यारे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!