Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास अथवा थुंकल्यास शिर्डीत 10 हजारांचा दंड

Share

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डी नगरपंचायत शिर्डी शहर स्वच्छतेसाठी दिवसरात्र परिश्रम घेत असून साईमंदिर परिसर तसेच रस्ते पूर्णतः पाण्याने धुवून काढत साईबाबा संस्थान व शिर्डी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने फ्लाईंग स्कॉड पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोणीही कचरा टाकल्यास तसेच थुंकल्यास 10 हजार रुपये दंड घेतला जाईल तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी केले आहे.

शिर्डी शहराची ओळख साईबाबांच्या चमत्कारामुळे झाली असल्याने येथे वर्षाकाठी सुमारे तीन कोटीपेक्षा जास्त भाविक दर्शनसाठी येतात. त्यामुळे शहरात कचर्‍याचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. मात्र साईबाबा संस्थानच्यावतीने शहर स्वच्छतेसाठी शिर्डी नगरपंचायतीस महिन्याला 42 लाख रुपयांचा ठेका दिल्याने स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

अशातच मागील दोन वर्षापूर्वी शिर्डी नगरपंचायतीस शहर स्वच्छतेमध्ये देशात तिसरा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळाला होता. त्या माध्यमातून सुमारे पंधरा कोटी रुपयांचे पारितोषिकही मिळाले. नूतन नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांच्या पुढाकाराने शहर स्वच्छतेचे कामकाज जोरात सुरू असून शहरातील रस्ते तसेच साई मंदिर परिसर पूर्णतः पाण्याने धुण्याचे काम जोरात सुरू आहे.

त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोणीही कचरा टाकल्यास त्याचा फ्लाईंग स्कॉड फोटो काढून तो दुसर्‍या दिवशी वर्तमान पत्रात सार्वजनिकरित्या प्रसिध्द केला जाईल व रस्त्यावर गुटखा आणि पान खाऊन थुंकणार्‍यास एक हजार ते दहा हजार रुपयांचा दंड केला जाईल यासाठी नगरपंचायतचे फ्लाईंग स्कॉड पथक शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले असून थुंकणार्‍यांची यापुढे गय केली जाणार नाही.

मागील चार ते पाच दिवसांपासून शहर कचरामुक्त करण्यासाठी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते,उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी आपला सुका आणि ओला कचरा नगरपंचायतीच्या घंटा गाडीत टाकून शिर्डी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!