शिर्डी बसस्थानकात साईभक्तांना सुविधा द्याव्यात

0

नगराध्यक्षा योगिता शेळके यांची डॉ. हावरे यांच्याकडे मागणी

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा संस्थानने करोडो रुपये खर्च करून राज्य परिवहन महामंडळासाठी बसस्थानक उभारून दिले आहे. राज्यातून तसेच परराज्यांतून येणारे प्रवासी साईभक्त बसस्थानकावर मिळणार्‍या अपुर्‍या सुविधांमुळे हैराण झाले आहेत. याबाबत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून शिर्डी बसस्थानकात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्याकडे केली.
नगराध्यक्षा सौ. शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर व नगरसेवक, नगरसेविकांच्या वतीने डॉ. हावरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बसस्थानकात असणारे सुलभ शौचालय रात्री 12 वाजताच बंद होते. ते 24 तास सुरू रहावे. येथे पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून आरओ युनिट बसवून सर्व प्रवाशांना व साईभक्तांना पिण्याचे शुध्द पाणी पुरविण्यात यावे.
बसस्थानकाच्या पूर्व बाजूस एक गेट बसविले आहे. प्रवासी साईभक्तांना याचा त्रास होऊ नये म्हणून येथेे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. येणार्‍या जाणार्‍या बससाठी इन व आउट अशा गेटची व्यवस्था करण्यात यावी.
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, विजयराव कोते, पतिंगराव शेळके, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे यानी अध्यक्षांकडे बसस्थानकासंदर्भात मागण्या करण्यात आल्या. यावर अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी याप्रश्‍नी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर यांना तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या.

 

LEAVE A REPLY

*