तिरुपतीत केशदान तर शिर्डीत रक्तदान : डॉ. हावरे

0
शिर्डी(प्रतिनिधी)- साईबाबा संस्थानच्या वतीने रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन साईनाथ रक्तपेढीद्वारे साई मंदिर परिसरात दररोज रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तिरुपती बालाजीला केशदान करण्याची संकल्पना जशी रुजली आहे, त्याच धर्तीवर शिर्डीत रक्तदान संकल्पना रुजविण्यासाठी प्रयत्न आहे, अशी माहिती माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.
डॉ. हावरे म्हणाले, दिवसेंदिवस रक्त व रक्त घटकांची गरज वाढत चालली असून त्या प्रमाणात ऐच्छिक रक्तदान करणार्‍यांची संख्या फार कमी आहे. साईबाबांची महती सर्वदूर पसरलेली असून देशविदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात. तिरुपती देवस्थान येथे केशदान ही संकल्पना रुजली असून त्याच धर्तीवर शिर्डी येथे रक्तदान ही संकल्पना साईभक्तांच्या मनात रुजल्यास भविष्यात रक्त व रक्त घटकांची कमतरता कमी होण्यास मदत होणार आहे.
तिरुपतीत केशदान तर शिर्डीत रक्तदान या संकल्पनेतून साईबाबा संस्थानच्या साईनाथ रक्तपेढीव्दारे साईबाबा समाधी मंदिर परिसरात म्युझियम समोर देणगी कार्यालयाशेजारी दररोज रक्तदानाचा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे.
रक्तदान करणार्‍या दात्यांचा संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात येऊन त्यांची साईबाबांच्या समाधीच्या थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच राज्यातील विविध रक्तपेढ्यांना या उपक्रमाशी जोडलेले असून या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून गरजु रुग्णांना विनामुल्य रक्त पुरवले जात असल्याचे डॉ.हावरे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*