तेलंगणाचे ‘सैराट’ शिर्डीत जेरबंद

0

मोबाईल लोकेशनवरुन तेलंगणा पोलीसांची कारवाई

शिर्डी (प्रतिनिधी)- तेलंगणा येथून दोन महिन्यापुर्वी सैराट झालेल्या प्रेमीयुगलास तेलंगणा पोलीसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे शिर्डी लगत सावळीविहीर परिसरात शिताफीने पकडले. सदर प्रेमीयुगलास शिर्डी पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर त्यांना तेलंगणा येथे नेण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे तेलंगणा राज्यातील सिध्दीपेठ येथील रंजीत व सुमलता हे प्रेमयुगल दोन महिन्यांपुर्वी सैराट झाले होते. सदरच्या प्रेमयुगलांच्या पालकांनी त्यांच्या शोध घेऊनही ते न मिळाल्याने राजगोपालपेठ पोलीस ठाण्यात मिशींग दाखल केली. पोलीसांनी रंजीत याच्या मित्रांकडून माहीती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मित्रांनिही रंजीत व सुमलता यांचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागु दिले नाही.
दरम्यान रंजीत याने शुक्रवारी घरमालकाच्या मोबाईलवरुन त्यांच्या मित्राच्या मोबाईलवर फोन करुन तेथील माहीती घेतली. मात्र त्याच्या मित्राचा मोबाईल कॉल पोलीसांनी ट्रॅप केला होता. रंजीतच्या फोननंतर पोलीसांनी त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो शिर्डी परिसरात असल्याची माहीती त्यांना दिली. त्यानंतर तेलंगणा पोलीसांनी शिर्डी गाठत घरमालक अनिल गांगुर्डे याच्या मोबाईल लोकेशनवरुन सावळीविहीर परिसरात पोहचले.
अनिल गांगुर्डे यांना ताब्यात घेऊन घटनेची माहीती दिल्यानंतर गांगुर्डे यांनी सदर प्रेमयुगल आपल्याकडे भाडेकरु राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी थेट रुम गाठून प्रेमयुगलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे प्रेमयुगल सुमलता हिला दोन वर्षाचा मुलगा असून ती सात महिन्याची गरोदर होती. रंजीतचे वय 18 तर सुमलताचे वय 25 असल्याचे तेलंगणा पोलीसांनी सांगितले.
राजगोपालपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक सैदूल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. के. यादवगिरी व पो.कॉ. डी. यादवगिरी यांनी तपासकामी विशेष परिश्रम घेतले. त्यांना घरमालक अनिल गांगुर्डे यांनी या कामी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*