शिर्डीत 21 हजार झाडांची लागवड करणार

0

ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णत्वास नेणार : जितेंद्र शेळके

शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी शहरापासून 13 किमी अंतरावर विमानतळ नजीक कोर्‍हाळे शिवारात सुमारे 80 एकर जागेत दोन कोटी रुपये खर्च करून 21 हजार मोठ्या झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व उद्योजक जितेंद्र शेळके यांनी दिली.
साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्ताने जगभरातील भाविकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी ग्रीन शिर्डी-क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून शिर्डीत तीन हजारांच्यावर वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन केल्याने ग्रीन शिर्डीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. 2017-18 या समाधी शताब्दी वर्षात शिर्डीतील प्रत्येक रस्त्यावर व चौकाचौकात सात ते आठ फूट उंचीचे पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.
शिर्डी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला आठ ते दहा फूट उंचीचे दोन तीन वर्षे वयोमान असलेल्या तीन हजार झाडांची लागवड करून या झाडांचे संवर्धन केले आहे. आज या झाडांमुळे शिर्डी शहराच्या वैभवात मोठी भर पडली आहे. यासाठी ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या सुमारे 60 सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले आहे. साईबाबा समाधी शताब्दी सोहळा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. जगभरातील कोट्यवधी भाविक शिर्डीला साईसमाधीचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने त्यांना पर्यावरणाचा योग्य संदेश देण्यासाठी शिर्डी शहरातील सर्व रस्ते व चौकाचौकात दहा फूट उंचीचे आणखी पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यात वड, पिंपळ, लिंब, गुलमोहर, जांभूळ, कवठी, चिंच, आंबा या झाडांचा समावेश असणार आहे.
तीन वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या वृक्षलागवडीच्या या उपक्रमासाठी ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी फाउंडेशनने 12 लाखांच्यावर खर्च केलेला आहे. समाधी शताब्दी वर्षात 30 ते 40 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी साईभक्तांंचीही मोठी मदत होत आहे. 10 वर्षे संगोपन करून हे जंगल वनविभागाकडे हस्तांतर करण्यात येईल. या जंगलाच्या निर्मितीनंतर निसर्ग पर्यटनाचा लाभ शिर्डीत येणार्‍या साईभक्तांंना होणार आहे. या वृक्ष लागवडीच्या चळवळीसाठी व संवर्धनासाठी अजित पारख, धनंजय जगताप, डॉ. मंगेश गुजराती, किशोर बोरावके, विक्रम भाटिया, मणिलाल पटेल, रवि गोंदकर, अनिल शेजवळ हे मेहनत घेत असल्याचेही जितेंद्र शेळके यांनी सांगितले.

शिर्डीचे माहात्म्य आता देशापुरते सीमित राहिलेले नाही. देशाच्या व जगाच्या कानाकोपर्‍यांतून दररोज शिर्डीला येणार्‍या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे. बिघडलेल्या पर्यावरणाने तापमानात मोठी वाढ झाल्याने त्याचा त्रास साईभक्तांना होत असल्याचे अलीकडच्या काळात निदर्शनास आल्याने आम्ही दानशूर साईभक्तांच्या सहकार्यातून वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीच्या माध्यमातून साईबाबांनी त्यांच्या हयातीत वृक्षलागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे काम केलेले आहे. साईंचा हाच संदेश आम्ही ग्रीन शिर्डी व क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेतला आहे. येत्या जून महिन्यापासून कोर्‍हाळे शिवारात 80 एकर जागेत जंगल निर्माण करण्याचा धाडसी उपक्रम संस्थेने हाती घेतला असृन जंगलाची निर्मिती करून 10 वर्षे या जंगलाचे संवर्धन झाल्यावर हे जंगल वनविभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या जंगलामुळे भाविकांना जंगल पर्यटनाचाही लाभ मिळणार आहे.
– जितेंद्र शेळके

80 एकरांवर जंगल तयार करणार
शिर्डी शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर कोर्‍हाळे शिवारातील विमानतळाच्या बाजूला असलेल्या फॉरेस्ट विभागाच्या 80 एकर जागेत ग्रीन शिर्डी-क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून जंगल तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी जंगली झाडांबरोबरच वड, पिंपळ, चिंच, आंबा, कवठे, आपटा, जांभूळ आदी प्रकारची 10 फूट उंचीची 21 हजार मोठी झाडे लावण्यात येणार असून या जंगलाची रचना अत्याधुनिक असणार आहे. या जंगलाचे डिझाईन प्रख्यात आर्किटेक्चर कल्याणी शेळके यांनी केलेले असून जंगलात फिरण्यासाठी रस्ते, लाईट, पाणवठे, तलाव निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*