सरकारवर आरोपांचा गोळीबार

0

ऊसदर आंदोलन, जखमींच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ, गोळीबारावरून टीकेची झोड

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगात तालुक्यात ऊसदरासाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता सरकार आणि सरकारी यंत्रणेवरील आरोपांचा गोळीबार तीव्र झाला आहे. या असंवेदनशील घटनेबद्दल विरोधक आणि शेतकरी संघटनांनी टिकेची झोड उठवली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘गोळीबाराने प्रश्‍न सुटण्याऐवजी चिघळतात’ या शब्दात सरकारचे कान उपटले. आंदोलकांशी चर्चेनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 डिसेंबरपासून सरकारविरोधात यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला. गृहखात्याला स्वतंत्र मंत्री हवा, अशी मागणी करून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नगरमध्ये दाखल झाले होते. ‘गोळीबार करण्याची गरज नव्हती’ अशी कबुली देत त्यांनी आपल्याच सरकारची अप्रत्यक्ष कोंडी केली. भविष्यात असा प्रकार घडणार नाही, यासाठी सरकारशी बोलणी करणार असल्याची सारवासावरही त्यांनी केली. जखमींना प्रत्येकी लाखाच्या सरकारी मदतीसाठी प्रयत्नाचे आश्‍वासन दिल्यानंतर घटनेचा सविस्तर वृत्त्तांत मुख्यमंत्र्यांकडे पोहचविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवसभर घटनास्थळ आणि जखमींच्या भेटीसाठी नेते, संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. मात्र तिकडे शेवगाव तालुक्यात शेतकर्‍यांमागे लागलेला पोलिसांचा ससेमिरा कायम होता. पोलिसांवर दगडफेकप्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल आहे. अटकेतील 10 जणांना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. 7 जणांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान, ऊस दरवाढ आंदोलनाचे लोण गुरूवारी उत्तरेत पोहचले होते. आंदोलकांनी शेकडो ऊसवाहतुक वाहने नगर-मनमाड महामार्गावर रोखली. यावेळी शाब्दीक चकमकीही झडल्या. ऊसदरावरील चर्चेसाठी सुकाणू समिती आणि कारखाना व्यवस्थापनात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. 

जखमींना लाखाची मदत करु : दानवे

गोळीबार करण्याची गरज नव्हती

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्‍यांनी उसाच्या रास्त भावासाठी आंदोलन केले, त्यातून घडलेली दुर्घटना कारखानदारांच्या चुकीमुळे घडली आहे. पोलीस प्रशासनाने अयोग्य पद्धतीने बळाचा वापर करून शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्र्यांशी बोलून मागे घेऊ व जखमींना राज्य शासनाकडून प्रत्येकी एक लाखाची मदत करू असे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.
खानापूर येथे बुधवारी झालेल्या गोळीबाराची  माहिती घेण्यासाठी व शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी गुरुवार दि. 16 रोजी सायंकाळी शेतकर्‍याची प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी केली, त्यावेळी ते बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले, की मी स्वत: शेतकरी व कारखानदारही आहे. मात्र येथे कारखानदाराच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली आहे. भविष्यात अशा गंभीर घटना घडणार नाहीत असे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगतो, असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड, तुषार शिसोदे, दुर्गा थोरात, सुनील रासने, रावसाहेब लवांडे, शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता फुंदे यांचीही भाषणे झाली. भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, अ‍ॅड. विवेक नाईक, बापूसाहेब भोसले, दिनेश लव्हाट, कचरू चोथे, नगरसेवक महेश फलके, पाथर्डीचे जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, मधुकर गोरे, राम गोरे, जावेद शेख, जगन्नाथ भागवत, एकनाथ खोसे, सरपंच अण्णासाहेब जगधने आदी उपस्थित होते.

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऊस दरावरून बुधवारी शेवगाव पोलीसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झालेले आहेत. या ठिकाणी आंदोलन योग्य पध्दतीने हाताळले गेले नाही. पोलीसांनी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर गोळीबार करण्याची गरज नव्हती. या प्रकरणाची सविस्त माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना न्याय देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली.
गुरूवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी नगरमध्ये जखमी शेतकर्‍यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. शेवगाव तालुक्यातील शेतकरी तीन-चार दिवसांपासून ऊसाला भाव मिळावा, यासाठी आंदोलन करत होते. अशा प्रकारे दरवर्षी संबंधीत गावात आंदोलन होत असल्याची माहिती त्या ठिकाणी गेल्यावर मिळाली. बुधवारी शेतकर्‍यांचे आंदोलन शांततेत सुरू होते. मात्र, यातील काही जमाव आक्रमक होत नियंत्रणा बाहेर गेला. त्याला पांगवण्यासाठी थेट गोळीबार करण्याची गरज नव्हती.
या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले असून काही शेतकर्‍यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून काही शेतकरी फरार आहेत. त्यांच्या संदर्भात माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्याशी सविस्तर बोलणे झालेले आहे. त्यांनी मला शेवगावला जाण्यास सांगितले होते. चुकीचे केलेल्या पोलीसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे दानवे यांनी या ठिकाणी जाहीर केले. भविष्यात असा प्रकार घडू नयेत, यासाठी सरकारशी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते तर त्यांच्या पायवर गोळ्या मारणे आवश्यक होते, असे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याऐवजी गृहखात्याला स्वतंत्र मंत्री असवा, या प्रश्‍नाला उत्तर देतांना दानवे म्हणाले, मुख्यमंत्री गृहखात्याचा कारभार पाहत असतांना हा पहिलाच गोळीबार आहे. येत्या काळात गोळीबार होणार नाही, या बाबत ते खात्री बाळगतील. या संदर्भात बैठकीत आम्ही चर्चा करु, असेही त्यांनी म्हटले. गोळीबार हा चुकीचा असून मुख्यमंत्र्यांना खबरदारी घेण्यास सांगू आणि शेतकर्‍यांना न्याय देऊ, असे स्पष्ट केले.

शेतकर्‍यांवरील दडपशाही लांछनास्पद : अजित पवार

लोकशाहीत आंदोलन करणे सामान्यांचा अधिकार आहे. उसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न लांछनास्पद आहे. आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. यामध्ये जे दोषी असतील, त्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
तालुक्यातील खानापूर येथे स्वाभिमानी शेतकरी  संघटना व शेतकरी कृती समितीचे ऊस दरवाढीच्या रास्त मागणीसाठी आंदोलन सुरू असताना बुधवार दि. 15 रोजी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात उद्धव मापारी व बाबूराव दुकळे तसेच पोलिसांच्या लाठी हल्ल्यात अलका व अंकुश थोरात हे जखमी झालेले आहे. या सर्व जखमींची नगर येथे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन चौकशी केली. त्यानंतर पवार यांनी तसेच घोटण व खानापूर येथील आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आंदोलकांसह अनेक महिलांनी अजित पवार यांच्यासमोर व्यथा मांडल्या.
यावेळी आमदार संग्राम जगताप, पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, शेवगावचे नगरसेवक सागर फडके, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, पंचायत समितीचे सदस्य मंगेश थोरात, हनुमान पातकळ आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, शेतकर्‍यांचा कळवळा दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला आता त्यांच्याबद्दल काही घेणे देणे राहिलेले नाही. त्यांच्यामध्येच गोंधळाची स्थिती असून पिकाच्या उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट आधारभूत किमतीचे दिलेले आश्वासनही त्यांच्या विस्मरणात गेले आहे. वास्तविक उसाला चांगला दर मिळण्यासाठी साखरेला चांगला भाव मिळाला पाहिजे. मात्र अशी परिस्थिती असताना पाच लाख टन साखरेची आयात करून जाणूनबुजून साखरेचे भाव पाडण्यात आले आहेत. रास्त मागण्यांसाठी आपण रस्त्यावर उतरला आहात. आम्ही ही तुमच्या सोबत असून यात कुठलेही राजकारण आम्ही करत नाहीत. माणसे म्हणजे किड्यामुंग्या नाहीत. विरोधी पक्ष नते धनंजय मुंढे, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासोबत येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी घोटण येथे बैठकीत दादा टाकळकर, संदीप घुगे, सचिन घुगे तर खानापूर येथे राम गोरे, रावसाहेब लवांडे, दुर्गा थोरात, मारुतराव थोरात यांनी कालच्या घटनेबद्दलची पवार यांना सविस्तर माहिती दिली. खानापूर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन स्थळावरील काही पुरावे अजित पवार यांच्याकडे सूपुर्द केले.

रघुनाथदादांकडून शेतकर्‍यांचे कौतुक
खानापूर व घोटण येथील लढाऊ शेतकर्‍यांनी राज्यस्तरावरील नेतृत्व नसताना आंदोलन केले. ही बाब कौतुकास्पद आहे. सरकारचे धोरण म्हणजे शेतकर्‍यांचे मरण आहे. ऊस, कापूस, तूर या पिकांना भाव मागितला तर सरकार शेतकर्‍यांना गोळ्या घालण्याचे काम करते. अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनीही शेवगाव भेटी दरम्यान दिली.

शेवगाव ते वर्षा मोर्चा काढणार : दहातोंडे
मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. शेतकर्‍यांवर हा अन्याय झालेला आहे. शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, शेवगाव ते वर्षा बंगल्यापर्यंत शेतकर्‍यांबरोबर मोर्चा काढून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणार असून शेतकर्‍यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यायला सरकारला भाग पाडू अशी प्रतिक्रिया मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिली.

राष्ट्रवादीचा 1 तारखेपासून एल्गार
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऊस दरावरून शेवगाव तालुक्यात झालेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागल्याने पोलीसांनी गोळीबार केला. यात दोन शेतकरी जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमध्ये उपचार सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी जखमी शेतकर्‍यांची भेट घेत विचारपूस केली. शेवगावमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी असून राज्य सरकार विरोधात 1 तारखेपासून राष्ट्रवादीने एल्गार आंदोलन पुकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरूवारी सकाळी लवकर आ. पवार यांनी गोळीबारात जखमी शेतकर्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत आ. संग्राम जगताप, नगरसेवक कुमार वाकळे होते. आ. पवार यांनी स्वत: जखमी शेतकर्‍यांशी संवाद साधत हा प्रकार कसा घडला याबाबत जाणून घेतले. तसेच जखमी शेतकर्‍यांच्या हातात आणि शरिरिराच्या कोणत्या भागात गोळीबारातील छरे रुतून बसले आहेत. ते शस्त्रक्रिया करून बाहेर काढणार की अन्य पध्दतीचा अवलंब करणार याबाबत उपचार करणार्‍या डॉक्टरांकडून समजावून घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना पवार म्हणाले, राज्य सरकारकडून बर्‍याच ठिकाणी आंदोलने दडपशाहीच्या मार्गाने दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात राष्ट्रवादी 1 तारखेपासून एल्गार पुकारणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोळीबाराने शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न  

ना. राधाकृष्ण विखे : गृहखात्याला स्वतंत्र मंत्री हवा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगावात जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. यातूनच शेतकर्‍यांवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. सरकारने आंदोलनकारी शेतकरी आणि कारखाना व्यवस्थापन यांच्याची चर्चा करून मार्ग काढला पाहिजे होता. या प्रकारातून गृहखात्याचे अपयश पुन्हा समोर येत असून गृहखात्याला स्वतंत्र  मंत्री हवा, अशी टीका विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांनी केली.
ऊस दरावरुन चिघळलेल्या आंदोलनातील शेतकर्‍यांवर शेवगाव तालुक्यात बुधवारी (दि. 15) पोलिसांकडून गोळीबार झाली होती. यात जखमी झालेल्या दोन शेतकर्‍यांवर नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गुरुवारी दुपारी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जखमींची हॉस्टिपलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते.
ना. विखे म्हणाले, शेतकर्‍यांवर गोळीबार करणे चुकीचे आणि निंदनीय आहे. हे प्रशासनाचे अपयश आहे. सांगलीत पोलीस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला. हे गृहखात्याचे अपयश आहे. गृहखाते प्रभारी असल्यामुळेच राज्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न होता. त्यामुळेच हा प्रकार घडला. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी या प्रकाराची दखल घेवून तातडीने जखमीची भेट घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारच्या संवेदनाच हरवल्या आहेत. कर्जमाफीचे प्रमाणपत्र खोटे प्रमाणपत्र वाटले. मात्र शेतकर्‍यांना कर्ज माफी मिळालेली नाही. हे सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. रोज सरकार योजनांच्या घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही.

एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी भाव देणे बंधनकारक आहे. जे कारखान्यांचे याचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. पण सरकार काही करीत नाही. एफआरपीपेक्षा जास्त भाव देण्याची मागणी होत आहे. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार दर द्यावा. पण सरकार हे करीत नाही, या शब्दात विखे यांनी सरकारवर टीका केली.

गोळीबाराने प्रश्‍न चिघळतात
अण्णांनी घेतली जखमी शेतकर्‍यांची भेट 

शेवगावमध्ये शेतकर्‍यांवर झाडण्यात आलेल्या गोळ्या या चुकीच्या पध्दतीने झाडलेल्या आहेत. गुडघ्याच्या खाली गोळ्या झाडण्याचे सोडून पोलीसांनी केलेल्या गोळीबारात शेतकर्‍यांच्या छातीवर छर्रे लागले कसे याची चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलींसांकडे आंदोलकांना पांगविण्यासाठी अनेक पर्याय होते. ते वापरायला पाहिजे होते. गोळीबार करण्याचे कारण नव्हते. तिकडे पाकिस्तानातून हल्ले होतात, तेथे गोळीबाराची गरज आहे. येथे आपल्याच माणसांवर गोळीबार कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. उद्योजकांवर कधी गोळीबार झाला का परंतू शेतकर्‍यांवर नेहमीच गोळीबार होतात. शरद पवार मुख्यमंत्री असतांना शेतकर्‍यांसाठी मी आंदोलन केले होते. त्यावेळी चार शेतकरी गोळीबारात शहीद झाले होते. आताही शेतकरीच लक्ष करण्यात आला आहे. सरकार कोणतेही असो तो शेतकर्‍यांचा विचार करता नाही. असे सांगून हजारे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तो भाव मिळत नाही म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरत आहे.

फेब्रुवारीत शेतकर्‍यांसाठी आंदोलन
शेतकर्‍यांचे प्रश्‍न दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून त्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी फेब्रुवारीमध्ये राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असल्याचे हजारे म्हणाले.

 

 

 

LEAVE A REPLY

*