शेवगाव : वरूर येथे डेंग्युसदृश्य आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू; आरोग्य विभागाला आली जाग

jalgaon-digital
1 Min Read

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील वरूर येथील अनिकेत रावसाहेब तुजारे (वय-14) या शाळकरी विदयार्थ्याचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली असून वरुर येथे प्रतिबंधक उपाय योजना सुरु करण्यात आली आहे. गावामध्ये साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्यासाठी दोन वैदयकीय अधिकारी व 14 कर्मचारी नियुक्त केले आहेत.

शाळकरी विदयार्थ्याचा काल शुक्रवारी नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले. याबाबत ग्रामस्थ व नातेवाईकांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागास धारेवर धरले. त्यामुळे तालुका आरोग्य विभागाने शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन डॉ. अतुल शिरसाठ व व्ही.बी. लांडे या दोन आरोग्य अधिका-यांची नियुक्ती केली. त्यामध्ये आशा कर्मचार्‍यांसह 14 कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांनी आज गावातील सर्व 545 घरातील पाण्याचे नमुने तपासले. त्यापैकी 233 ठिकाणी पाण्यात डासांची उत्पती होणारी अंडी व अळी आढळून आली. ते पाणी ओतुन देत त्यांना सर्वांना कोरडा दिवस पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या.

गावातील साचलेल्या पाण्यात व डबक्यात आँईल व अँबाँट सोल्युशन टाकण्यात आले. ग्रामपंचायतीने ही गावात स्वच्छता अभियान सुरु केले असून या रोगाबाबत जनजागृतीसाठी हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच धुरफवारणी करुन भिंतीपत्रके वाटण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ताप असलेल्या चार रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *