शेवगाव-पाथर्डीसह 54 गावांना दुषित पाणी

0
शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव – पाथर्डीसह 54 गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे सध्या पिवळसर रंग असलेले दुषित पाणी शहरातील नळाद्वारे येत आहे. हा रंग कशामुळे आलेला आहे ? याचा आरोग्य विभागाच्या मदतीने तातडीने शोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशुध्द पाणी पुरवठ्याने नळयोजनेची पाणीशुध्दीकरण यंत्रणा कुचकामी झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दोन दिवसांपासून दूर्गंधीयुक्त, पिवळसर पाणी सुरु आहे. शेवगाव शहरातील नळांद्वारे अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याने लोकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
नगरपरिषदेतील भाजप नगरसेवक कमलेश गांधी, अरुण मुंढे, अपक्ष नगरसेवक वजीर पठाण व कार्यकर्त्यांनी योजनेच्या शहरातील खंडोबामाळ येथील जलशुध्दीकरण केंद्रास आज गुरुवारी भेट दिल असता अशुध्द पाणी असल्याचे दिसले.
जनतेला तातडीने शुध्द पाणी पुरवठा करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे. जलशुध्दीकरण केंद्राच्या टाक्यातील वाळू, पाण्यात मिसळण्यात येणा-या क्लोरिन, टीसीएल, तुरटी आदी रसायनांची मात्रा अशा कुचकामी कार्यपध्दतीची त्यांनी पाहणी केली.
जायकवाडी जलाशयात पावसाळ्यात पाणी दुषित होण्याचे प्रकार घडते. मात्र याकडे ना सत्ताधारी ना विरोधक यांनी गंभीरपणे पाहिले नाही. दुषित पाणी कोठून येते? अद्ययावत जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित सातत्यपुर्ण पाठपुरावा होणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्य जनतेत आहे. सध्यातरी ज्यांच्याकडे घरगुती आरओ सिस्टीम नाही त्यांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली असून आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

LEAVE A REPLY

*