शेवगाव बसस्थानक बनले गुन्हेगारांचा अड्डा

0

चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेवगाव बसस्थानकावर असलेली पोलीस चौकीच गायब झाल्याने बसस्थानक गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. दिवसेंदिवस बसस्थानकावर चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र याकडे आगार प्रमुख व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

शेवगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक आहे. शेवगाव हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने गेवराई, माजलगाव, परभणी, हिंगोली, पैठण, बीड, अंबड आदी भागात जाण्यासाठी शेवगाव येथूनच जावे लागते. यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचा अहोरात्र राबता असतो. प्रवाशांबरोबरच चोरट्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते.

हे लक्षात घेऊन बसस्थानकावर पोलीस चौकी उभारण्यात आली होती. त्या चौकीत दोन पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूकही असे मात्र या चौकीमध्ये कधीच पोलीस कर्मचारी बसत नसल्याने ती चौकी असून अडचण नसून खोळंबा अशी झाली होती.

यानंतरच्या काळात तर ही चौकीच बसस्थानकावरून गायब झाली. यामुळे प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी झटकण्याची पोलिसांना एक प्रकारे संधीच मिळाली. त्यातही शेवगाव पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांची बसस्थानक आवारात ड्युटी लावली जाते मात्र ते कर्मचारी नेमून दिलेल्या जागेवर कधी आढळतच नाहीत. याचाचत फायदा चोरटे घेतात व प्रवाशांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागतो.

या चोरट्यांशी पोलिसांचे लागेबांधे असल्यानेच नेमणुकीस असलेले कर्मचारी बसस्थानकावर थांबत नसल्याच्या तक्रारीही प्रवाशांमधून होत आहेत. बसमध्ये चढत असताना प्रवाशांचा खिसा कापणे, मोबाईल चोरी जाणे, महिलांच्या पर्स हिसकावणे, गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडणे, शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर मुली, महिलांची छेडछाड करणे अशा घटना वारंवार घडतात. विशेष म्हणजे बसस्थानकाच्या भिंतीलाच पोलीस ठाण्याची भिंत आहे. तरीही चोर्‍यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पोलीस कर्मचारी व चोरटे यांच्यावर पोलीस अधिकार्‍यांचा वचक नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा शहरात आहे. बसस्थानक आवारातून गायब झालेली पोलीस चौकी शोधून नव्याने ती उभारावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. आगार प्रमुखांनीही बसस्थानक आवारात होणार्‍या चोर्‍यांच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी होत आहे.

दोन दिवसांपूर्वी पाथर्डी येथील एका महिलेची पर्स चोरून त्यातील सोने चांदीचे दागीने व एक हजार रूपये असा पाऊण लाखांचा ऐवज लांबविला. सोन्याचे पँडल व गंठण, सोळा डिस्को मनी, सोन्याच्या दहा ग्रॅमच्या दोन अंगठ्या, दहा ग्रॅमचा झुंबर जोड, चार ग्रॅमची एक अंगठी, एक 8.5 ग्रॅमचा झुंबर जोड असे 74 हजार 512 रुपयांचे दागिने व रोख 1 हजार 500 रुपये असा 76 हजार 12 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

LEAVE A REPLY

*