उसाच्या भावासाठी सुकाणू समिती आंदोलनावर ठाम

0

डॉ. अजित नवले यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील भूमिपुत्रांच्या घामाला योग्य न्याय मिळावा, यासाठी सुकाणू समिती धडपड करीत आहे. न्यायासाठी आता गोळीबार नको, दगडफेक नको व लाठीहल्ला नको आहे. उसाच्या भावासाठी आता आत्मक्लेश हाच मार्ग आम्ही अवलंबणार आहे.

आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम असून सरसकट उसाला भाव मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी माहिती सुकाणू समितीचे अध्यक्ष डा. अजित नवले यांनी दिली.

सह्याद्री सभागृहावर गुरुवारी बैठक झाली. ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर सुकाणू समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डॉ. नवले म्हणाले की, राज्यातील शेतकरी ऊस पिकासाठी सारखेच कष्ट करतात. उसासाठी लागणारा उत्पादन खर्च जवळपास सारखाच आहे. मग वेगवेगळ्या जिल्ह्यात ऊस दरात तफावत का? यापुढे शेतकर्‍यांच्या उसाला सर्वत्र सारखाच दाम मिळावा, अशी सुकाणू समितीची मागणी आहे.

तसेच गळीत हंगाम सुरूपूर्वीच सरकारने एफआरपी व पहिली उचल घोषित करावी, या मागणीसाठी सोमवारपासून लोणीत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येणार्‍या बेमुदत राज्यव्यापी उपोषण करण्यात येणार आहे.
उसाला भाव मिळावा यासाठी शेतकर्‍यांसह आम्ही रस्त्यावर उतरलो होतो.

परंतु या आंदोलनांना हिंसक वळण मिळाले आहे. शेतकर्‍यांवर आता लाठी हल्ले व गुन्हे दाखल होऊ नये, म्हणून आम्ही आता आत्मक्लेश आंदोलने करणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी दि. 29 रोजी बीड येथे शेतकर्‍यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर परभणी, सोलापूर, नाशिक या विभागांमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

अजय महाराज बारस्कर म्हणाले की, उसाला राज्यभर एक भाव मिळावा यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्यासाठी नगरमध्ये संयोजन संमितीची अंतीम बैठक घेण्यात येणार आहे. या उपोषण आंदोलनात पावित्र राखणार्‍या व्यक्तींचीच निवड करण्यात येणार आहे.

यावेळी बन्सी सातपुते, बाळासाहेब पटारे, संतोष वाडेकर, श्री. देठे, भैरवनाथ वाकळे, साईनाथ घोरपडे, लहाणू सदगिर, गितेश दिवटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदानासाठी शेतकर्‍यांचा बळी
प्रत्येकाचा उतारा वेगळा आहे. मात्र शेतकर्‍याचे कष्ट सारखे आहे. शासनाने कारखानदारीत सांगली, मराठवाडा, नाशिक तीन झोन केले आहे. त्यात सोलापूर-सांगली सोडला तर महाराष्ट्रावर अन्याय आहे. ही शेतकर्‍यांमधील फुटाफुट आम्हाला मंजूर नाही. राजकारण्यांनी स्वत:च्या मतदार संघानुसार शेतकर्‍यांचे विभाजण केले. व त्याचा बळी शेतकरी ठरला आहे. हा भेदभाव तोडून समान उचल असावी.
चौकट

सुकाणू समितीची आज नगरमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये सदस्यांना कामाची जबाबदारी सोपवून तालुके वाटून देण्यात आले आहेत. ज्यांना तालुके वाटप करून दिले आहे. त्यांनी आपल्या तालुक्यात बैठका घेऊन शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहे. राज्यात सुरु असलेली ही उसदरातील तफावत कमी करण्यासाठी व उसाला भाव मिळण्यासाठी आमचा लढा आहे, अशी प्रतिक्रिया सुकाणू समितीचे बाळासाहेब पटारे यांनी दिली.

शेतकर्‍यांसाठी प्राण पणाला लावू
शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी पहिली आमची आहुती देऊ, राजकारण्यांप्रमाणे लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवणार नाही. पहिली गोळी आम्ही खावू. शेतकर्‍यांसाठी प्राण पणाला लावू. जेव्हा लढा यशस्वी होईल. तेव्हाच अन्न प्राषण करू. शासन व विरोधीपक्ष शेतकर्‍यांचे नाही. तर कारखानदारांचे आहे. त्यामुळे हे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांने यात सहभाग घ्यावा.
– डॉ. अजित नवले,
(अध्यक्ष-सुकाणू समिती)

 

LEAVE A REPLY

*