भाजपने शेतकर्‍यांना देशोधडीला लावले : सुकाणू समिती

0

10 नोव्हेंबरला तहसील कार्यालयांत शेतीमाल ओतून घंटानाद आंदोलन 

अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजप सरकारने शेतकर्‍यांना देशोधडीला लावले असून शेतकर्‍यांचे मरण ठरलेल्या सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी राज्य शेतकरी सुकाणू समितीने जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवार दि. 10 नोव्हेंबरला सर्व तहसील कार्यालयांत मातीमोल ठरलेला शेतमाल ओतून, शेतकर्‍यांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नांवर बहिरे झालेल्या राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय जिल्हा सुकाणू समितीच्या नगर येथील बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती प्रहार शेतकरी वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारसकर व शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे यांनी दिली.
केंद्रात व राज्यात सत्तापरिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे उलटली. या तीन वर्षांच्या कार्यकाळात सरकारने सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेऊन शेतकर्‍यांचा अतोनात छळ केला. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन पाळले नाही. शेतीमालावर निर्यातबंदी, नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. फसवी कर्जमाफी योजना जाहीर केली.
साखर कारखानदारांना पाठीशी घालून ऊस उत्पादकांची संगनमताने लूट सुरु केली. सोयाबीन, कापूस, मका दूध, काळवर्गीय पिके, कडधान्य, अन्नधान्य, कांदा आदी शेतीमाल आधारभूत किंमतीपेक्षा कमी कराने खरेदी केला जात असताना शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करुन शेतकर्‍यांना लुटले. शेतीची वीज बेकायदेशीरपणे खंडीत करुन शेतकर्‍यांवर सूड उगविण्याचे काम चालू आहे.
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर भाजपचे सरकार सपशेल अपयशी ठरले असून तीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकर्‍यांना देशोधडीला लावले आहे. शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्‍नांवर शेतीमाल ओतून घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून शेतकरी बांधवांनी आपापल्या तहसील कार्यालयावर जाऊन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सुकाणू समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
बैठकीस प्रहार संघटनेचे अजय महाराज बारसकर, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, भारतीय किसान सभेचे अ‍ॅड. सुभाषराव लांडे, नानासाहेब कदम, विलास गेरंगे, कॉ. बन्सी सातपुते, अशोक पठारे, बच्चू मोढवे, रावसाहेब गाडेकर, दत्ता गवळी, रामनाथ दळवी, भाऊसाहेब मोढवे, बहिरनाथ वाकळे, अशोक सब्बन, संध्याताई मेढे, मेहबूब सय्यद, राजू शेख, शंकर न्यायपल्ली, अनंत लोखंडे, रामदास वाघस्कर, राजेंद्र गोर्डे, हौशिराम चोळके, अनिकेत अवचट, सब्बन शिंदे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*