‘एफआरपी’च्या विरोधात 7 डिसेंबरपासून एल्गार : डॉ. अजित नवले

0

नगरमध्ये 11 जिल्ह्यातील नेत्यांचा राज्यस्तरीय मेळावा

अहमदनगर (प्रतिनिधी) – एफआरपीचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यासाठी राज्यातील शेतकरी संघटनांसह अन्य संघटना एकवटल्या आहेत. गुरूवारी अहमदनगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात या संघटनांनी एकत्र येत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून 7 डिसेंबरपासून राहाता तालुक्यातील लोणी येथे पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यापासून आंदोलनास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनांच्या सुकाणू राज्य समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगर येथे गुरुवारी हा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यास राज्यातील सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, सातारा, जालना या जिल्ह्यातील संघटनेचे नेते उपस्थित होते. या आंदोलनामध्ये विविध संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये शेतकरी संघटना (रघुनाथ दादा पाटील), अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय मराठा महासंघ, भूमिपुत्र शेतकरी संघटना, प्रहार संघटना, क्रांती सेना, संभाजी ब्रिगेड, बळीराजा शेतकरी संघटना, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, युक्रांद व आम आदमी, या संघटना सक्रिय सहभाग घेणार आहेत.
लोणी गावच्या ग्रामदैवताची यात्रा असल्याने 4 डिसेंबरला सुरु होणारे आंदोलन आता 7 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 7 तारखेला नगर शहरातील पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर वाजत-गाजत आंदोलनकर्ते लोणीच्या दिशेने कूच करणार आहेत. उसाचा उत्पादन खर्च, 50 टक्के नफा इतकी किमान पहिली उचल मिळावी. साखर धंद्यातील सर्व पदार्थांमध्ये होणार्‍या नफ्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वाटा मिळाला पाहिजे. एफआरपी पध्दत बंद करण्यात यावी, यासह विविध मागण्या आंदोलनातून करण्यात येत आहेत. यावेळी बन्सी सातपुते, बाबा आरगडे, बाळासाहेब पटारे, राजू आघाव, सुभाष निकम, बच्चू गुळवे, खंडू वाकचौरे, निलेश तळेकर, विलास कदम, संदीप कडलग उपस्थित होते.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अहमदनगर येथे राज्यस्तरीय मेळावा पार पडला. राज्यभरातून दोनशेच्या पुढे प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित होते. साखरेच्या भावावरुन उसाचा भाव ठरवण्याचे धोरण चुकीचे आहे. यामुळे शेतकजयांना अन्याय सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकजयांना घामाचे दाम मिळाले पाहिजे. हे आंदोलन एक व्यक्ती किंवा एका कारखान्याच्या विरोधात नाही. एफआरपी कायदा आल्यापासून राज्यात क्षेत्रनिहाय, कारखानानिहाय वेगवेगळे भाव दिले जातात. रिकव्हरी कारखाने कमी दाखवितात. वजनाची चोरी होते, असेही बाळासाहेब पटारे यांनी सांगितले.

कायदा मोडणार नाही –
प्रशासनाच्या सुचनेनूसार आम्ही लोणी ग्रामस्थांची अडचण होणार नाही, यामुळे आंदोलन तीन दिवस पुढे ढकले. हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने करणार आहोत. कुठेही शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही. मात्र सरकारने साखर सम्राटांच्या बोलण्यावर नाचून आंदोलन मोेडित काढू नये, असे आवाहन नवले यांनी केले आहे.

शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे, यासाठी राज्यातील विविध संघटना एकत्र आल्या आहेत. ऊसाच्या प्रश्‍नावर शेतकर्‍यांना छातीवर गोळ्या झेलाव्या लागल्या यामुळे ऊस प्रश्‍नावर आम्ही आक्रमक आहोत. मात्र, राज्यातील कपाशीच्या प्रश्‍नांवर लढा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासह 7 तारेखा सुरू होणारे आंदोलन राज्यातील साखर कारखानदार यांच्या विरोधात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पोत्याने चोरी करणाराकडे लक्ष द्यावे –
सुकाणू समितीवर शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी टीका केली होती. त्यावर डॉ. नवले म्हणाले, किलोभर चोरीकडे लक्ष नेते देतात. त्याऐवजी पोत्याने चोरी करण्याकडे लक्ष द्यावे. चोरी वजनात, रिकव्हरी तसेच धोरणातही चोरी होते. त्यामुळे आमच्यावर टीका करण्यापेक्षा धोरणातील दरोडेखोरी रोखली पाहिजे. मुठभर चोरीवर बोट ठेवणार्‍यांनी दरोडे रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला नवले यांनी खा. शेटी यांना दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*