शेतकरी कर्जमाफी : पहिल्या टप्प्यात नाशिकमध्ये ८०० शेतकऱ्यांना लाभ

0

नाशिक । दि. 31 प्रतिनिधी
राज्य सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या ग्रीन लिस्टनुसार 2 लाख 39 हजार 77 शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी सुमारे 899 कोटी 11 लाख रुपये सहकार विभागाने आयसीआयसीआय बँकेत जमा केले आहेत.

नाशिक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुमारे 800 खातेदारांचा या यादीत समावेश असून याकरिता सुमारे 4 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र बँकेला अद्याप कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी राज्य सरकारने आयसीआयसीआय बँकेची निवड केली आहे. सहकार विभागाच्या खात्यात सुमारे 4 हजार कोटी रुपये जमा आहेत. त्यातून टप्प्याटप्प्याने रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे दिली जाणार आहे. आयसीआयसीआय बँकेकडून ही रक्कम विविध 11 सार्वजनिक बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात सुमारे 1 लाख 6 हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. यापैकी सुमारे 800 शेतकर्‍यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. या शेतकर्‍यांना सुमारे 4 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग करण्यात येईल.

मात्र मंगळवारपर्यंत ही रक्कम बँकेकडे जमा झालेली नाही. याद्या अपलोड करण्यात येत आहेत. जसजशा याद्या अपलोड होतील तसतसा शेतकर्‍यांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल व बँकांकडे रक्कम जमा होईल, असे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी सांगितले.

गोंधळ कायम
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सर्वत्र गाजावाजा करीत कार्यक्रम घेतला. विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून रान उठवल्याने दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्यासाठी धावपळ सुरू झाली.

त्यानंतर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून दोन शेतकरी याप्रमाणे तीस शेतकर्‍यांना सोपस्कार म्हणून प्रमाणपत्र वाटप केले, परंतु ग्रीन यादीतील तांत्रिक त्रुटींमुळे प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली. आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी अजूनही बँकेमध्ये शेतकरी गेल्यास त्यांना कोणी दाद लागू देत नाही. किती शेतकरी अपात्र आहेत याचा अद्याप थांगपत्ता नाही. त्यामुळे कर्जमाफीचा गोंधळ कायम असल्याचे दिसून येते.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 1 लाख 38 हजार खातेदार व राष्ट्रीयकृत बँकेतील 49 हजार असे एकूण 1 लाख 87 हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यापैकी 1 लाख 6 हजार खातेदार कर्जमाफीस पात्र ठरल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

*