अहमदनगर(कर्मयोगिनी) | सौ. शीतल चेतन भुतडा : अंतर्गत सजावटीची पारखी नजर!

0

श्रीरामपूर, जि. अहमदनगर
आर्किटेक्ट
कार्य – विविध शीतगृहे, गोडाऊन ऑफिसेस, बँक, शाळा कॉलेजेसचे आधुनिक पद्धतीने डिझाईन, गट : आर्किटेक्ट

श्रीरामपूर येथील सौ. शीतल चेतन भुतडा आर्किटेक्ट (वास्तुविशारद) क्षेत्रातील एक प्रथितयश नाव. त्यांनी सुमारे 16-17 वर्षांपूर्वी घरातून व्यवसायास सुरुवात केली व अल्पावधीत पती चेतन भुतडा यांच्या मदतीने भुतडा असोसिएट्स या नावाने ऑफिस सुरू केेले. महत्त्वाकांक्षा, मेहनत, आत्मविश्‍वास, काही तरी करण्याची जिद्द, मोठ्यांचा आशीर्वाद आणि घरातील सदस्यांचे सहकार्य या सर्वांच्या जोरावर शीतलताईंनी स्वतःचा व्यवसाय नावारूपास आणला. प्रवरा एज्युकेशन सोसायटीच्या पॅनलवर आज त्या काम करताहेत. शिवाय अनेक नामांकित संस्थांचे आणि सरकारी ईमारतींचे प्रोजेक्ट त्यांनी सहजपणे यशस्वी केलेत.

औरंगाबाद येथील एमआयटी कॉलेजमध्ये आर्किटेक्ट ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून आपल्या मूळ गावी म्हणजे हिंगोलीत इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय शीतलताईंनी सुरू केला. शीतलताईंचे वडील स्व. सुभाषचंद्रजी भांगडिया यांचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यांनीच आपल्या लाडक्या लेकीला स्वतःच्या पायांवर उभे रहाण्यासाठी व्यावयायिक शिक्षण दिले व तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली.

त्यांनी व्यवसायाला अनुरूप असे श्रीरामपूर येथील चेतन मदनलाल भुतडा यांचे स्थळ शोधले. लग्नानंतर शीतलताईंनी घरातच ऑफीस सुरू करून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला रेसिडेन्शिअल प्रोजेक्टची कामे हाती घेतली. या व्यवसायात प्रगती होत असताना पती चेतन भुतडा यांच्या मदतीने भुतडा असोसिएट्स या नावाने स्वतःची फर्म सुरू केली. यानंतर गणेशनगर येथील वर्धमान पतसंस्थेचे काम स्पर्धात्मक पद्धतीने मिळवले.

यामध्ये त्यांनी डिझायनिंग आणि इंटेरियरचे अप्रतिम व काम केले. हे काम पाहून विखे साहेबांनी शीतलताईंची प्रवरा एज्युकेशन सोसायटीमध्ये आर्किटेक्ट म्हणून नेमणूक केली. सुरुवातीला त्यांना मला साधारण प्रोजेक्ट दिले जात होते; पण दरम्यान एक आव्हानात्मक काम दिले ते म्हणजे 2008 साली पंतप्रधान मनमोहनसिंग लोणी येथे येणार होते व अवघ्या 20 दिवसांत त्यांना गाडगीळ सभागृह पूर्णतः तयार हवे होते.

शीतलताईंनी हे आव्हान हातात घेण्याचे ठरवले. बर्‍याच जणांना असे वाटले की, ही नवीन मुलगी कसे काम पार पाडेल? हा एरिया होता 18000 चौरस फुटांचा. येथे ऊस वाहून आणणार्‍या गाड्या उभ्या केल्या जात असत. 3 शिफ्टमध्ये कामाला सुरूवात केली. जवळच्या झाडाखाली सावलीत बसून शीतलताई सर्व देखरेख करत होत्या. हीच झाडाची सावली त्यांचे ऑफीस होती. हा सभागृहाचा प्रोजेक्ट ताईंनी कलरिंग, डिझायनिंग, इटेरियरिंग, लॅण्डस्केपिंगसह पूर्ण केला व सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला.

पंतप्रधान मनमोहनसिंगजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यानंतर शीतलताईंनी मागे वळून पाहिलेच नाही. भराभर काम मिळत गेली व व्यवसायाला भरभराट येत गेली. यानंतर ं शिर्डीच्या साई संस्थानच्या पॅनेलवर निवड झाली व साईनिवारा टॉऊनशिपचे उत्कृष्ट डिझाईन केले. तसेच समता इंटरनॅशनल स्कूलचे सुपूर्ण काम शीतलताईंनी अप्रतीम असे केले. एडीसीसी बँकेच्या राहाता शाखेचे इंटेरियरदेखील त्यांनीच केलेले आहे.

त्यांना2011 साली आयआयआयडी अहमदनगरचा बेस्ट इंटेरियर डिझायनर अवॉर्ड मिळाला आहे. याखेरीज 2014 मध्ये त्यांनी राहता नगर परिषदेचे उच्च दर्जाचे व्यापारी संकुल बांधले. त्यासाठी अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सध्या सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये म. फुले विद्यापीठात पॅनेलवर आहेत. त्याद्वारे नंदूरबार, कर्‍हाड येथे अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजचे आर्किटेक्टचे काम सुरू आहे.

तर पुणे येथे कृषी पणन महामंडळाचे कोल्ड स्टोअरेज आणि गोडाऊनचे काम सुरु आहे. बुलढाणा अर्बन बँकेचे भक्तनिवासाचे काम केले आहे. तसेच प्रवरा बँकेंच्या 14 शाखांचे इंटेरियर डिझायनिंगचे काम अल्पावधीत केले आहे. आज शीतलताई आयडीडब्ल्यू, परिवहन मंडळ, पालीस गृहनिर्माण, एमआयडीसी आदी पॅनलवर काम करत आहेत.

या आधुनिक विश्‍वकर्म्याला यशाची पोचपावती म्हणून 2015 मध्ये जिद्द सोशल फाउंडेशन श्रीरामपूर तर्फे नारी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तर 2018 ला रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानतर्फे नारी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शीतलताईं असे म्हणतात, आकाशाला गवसणी घालण्यासाठी जे पाठबळ मिळाले ते त्यांच्या सासरकडून. घरातील सर्वांनीच पाठींबा दिला. सतत प्रोत्साहन दिले आहे.

 

LEAVE A REPLY

*