Photo Gallery : रोकोडाच्या डोंगरावर पांघरली जातेय ‘हिरवाई’ची चादर

0

नाशिक | सुरगाणा तालुक्यातील शिंदे या आदिवासी बहुल गावात ग्रामस्थांच्या जाणिवेतून वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. चार उघडाबोडका वाटणारा केम चा आणि रोकोडाच्या डोंगरावर ‘हिरवाई’ची चादर पांघरली जाते आहे. केम शिखराच्या परिसरातील हा भाग आपले रुपडे बदलत वनपर्यटनासाठी सज्ज होतोय.

वन विभागाची नोकरी सोडलेल्या मोतीराम गावीत यांनी गावात आलेल्या साधूंचा उपदेश प्रमाण मानून डोंगरावर झाडे लावण्यास सुरूवात केली. वयाची पच्च्याहत्तरी पार केलेल्या गावीत यांनी सरपंच असताना केमचा डोंगरावर वृक्षारोपण करण्याचा ठराव केला. याच डोंगरावरून गिरणा, कादवा, उनंद या पूर्ववाहिनी आणि नार-पार, आमटी, वाझडी या पश्चिमवाहिनी नद्यांगचा उगम झालेला आहे. अवघी बाविसशे लोकसंख्या असलेल्या या गावाने डोंगरावर 10 हजार झाडे लावली.

आपला परिसर सुंदर आणि पर्यटनासाठी आदर्श असा करायचा ध्यास ग्रामस्थांनी घेतला आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य सुरू झाले. शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाने ग्रामस्थांच्या या उपक्रमाला आणखी गती मिळाली. गतवर्षी गावाने तब्बल 25 हजार झाडे लावली. रोजगार हमी योजनेतून खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले. गावातील नागरिकांना यामुळे रोजगारदेखील मिळाला.

एका बाजूला समुद्र सपाटीपासून 1900 फूट असलेल्या केम शिखराचे सौंदर्य आणि दुसऱ्या बाजूस चमचा आणि रोकोडा डोंगरामुळे तयार झालेली  ‘यु’ आकाराची रचना आणि मधोमध दरीतील अप्रतिम दृष्य असा हा भाग असल्याने पर्यटन विकासाला येथे संधी आहे. गावीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे  प्रयत्नही त्याच दिशेने आहेत.

डोंगरावर लावलेल्या रोपांपैकी 90 टक्के रोपे जगली आहेत. काही रोपे तीन ते दहा फुटापर्यंत वाढली असल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. केमचा डोंगराच्या 170 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण झाल्यानंतर आता रोकोडाच्या 70 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण सुरू आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने 45 हजार रुपये खर्च करून गुजरातमधून आंबा, जांभूळ, आवळा, पेरू, गुलमोहोर, मोगरा, काजू, सिसव, काशिद, आदी 16 प्रकारची रोपे आणली आहेत.

झाडे जगविण्यासाठी डोंगरावर पाईपलाईन नेण्यात आली असून यावर्षी तळे तयार करून ठिबक सिंचनाची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक हिरामण चौधरी यांनी सांगितले. डोंगरावर सुविधेसाठी पेसाअंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहे. वृक्षारोपणासाठी पेसामधून 2 लाख 78 हजार खर्च करण्यात आला आहे. यावर्षी डोंगरावरच नर्सरी तयार करण्यात येणार आहे.

डोंगरावर अर्जुन साताडा, निरगुडी आदी वनौषधींची रोपेदेखील लावण्यात आली आहेत. पडीक जमिनीचा योग्य वापर करण्याबरोबर पर्यावरण रक्षण, पर्यटन आणि रोजगार निर्मितीचा दूरगामी विचार करून या आदिवासी गावाने केम शिखराचा परिसर नयनरम्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आ

हेत. यावर्षी गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्पदेखील गावाने केला आहे. एक लघु पाटबंधारे प्रकल्प आणि 23 पाझर तलावाच्या ठिकाणी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात आला आहे. ग्रामस्थांचे प्रयत्न आणि या भागात होणारी स्ट्रॉबेरीची शेती लक्षात घेता काही वर्षात हा भाग पर्यटकांना निश्चितपणे आकर्षित करेल.

मोतीराम गावीत-डोंगरावर 50 हजारावर झाडे लावण्यात आली  आहेत. प्रत्येक झाडाची नोंद सातबारावर घेण्यात येत आहे. विशेषत: फळझाडे लावून स्थानिकांना भविष्यात रोजगार मिळावा आणि पर्यटकही आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने झाडे लावल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊन गावालाही लाभ होईल.

(साभार :  जिमाका)

LEAVE A REPLY

*