तीक्ष्ण हत्याराने युवकाचा खून; मृतदेह महामार्गावर फेकला

0
सिन्नर |  नाशिक-पुणे महामार्गालगत असणाऱ्या एस.टी. कॉलनीत वास्तव्याला असलेल्या युवकाचा त्याच्या राहत्या घरातच खून करून अपघाताचा बनाव करण्यासाठी महामार्गावर मृतदेह फेकून देण्यात आला होता.
घटना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. विकी सुरेश मोरे (वय २१) असे मयत युवकाचे नाव असून त्याची हत्या का व कुणी केली याचा सिन्नर पोलिस शोध घेत आहेत.
विकी मोरे एकटाच एस. टी. कॉलनीत राहत होता. त्याचे आई वडिलांचे निधन झालेले असून दोन वर्षांपूर्वी मोठा भाऊ देखील विजेचा धक्का लागून मयत झालेला आहे. तर विवाहित बहीण जळगाव येथे सासरी वास्तव्याला आहे.
खोल्या भाड्याने देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर विकी गुजराण करत होता. मध्यरात्री बारा  वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह उद्योगभवन येथील हॉटेल पुरोहित समोर महामार्गावर आढळून आला.
टणक, तीक्ष्ण व  वजनदार हत्याराने  डोक्यावर व तोंडावर वर करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले व त्यातच त्याचा मृत्यू झाला. हीब प्रथमदर्शनीच सिद्ध झाल्याने विकीची ओळख पटवत पोलिसांनी त्याच्या घराकडे मोर्चा वळवला.
सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदशनाखाली पोलिसांनी विकीचे एस.टी. कॉलनीतील घर शोधले. तेथिल परिस्थिती पाहता घरातच त्याचा खून करून  अपघाताचा बनाव करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर टाकण्याची शक्कल अज्ञात मारेकऱ्यांनी लढवली असल्याचे स्पष्ट झाले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मार्तंड जाधव यांच्या फिर्यादी वरून सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सकाळी पोलीस उपाधिक्षक दीपक गिऱ्हे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाचा सूचना दिल्या.
फॉरेन्सिक तज्ञ, श्वान पथकाने देखील तपासकामी हजेरी लावली. विकीचा घरात खून करून मृतदेह दुचाकीवरून महामार्गापर्यंत आणण्यात आला असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण ज्या हॉटेलसमोर मृतदेह आढळला तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयास्पद दुचाकींची हालचाल कैद झाली  आहे.

LEAVE A REPLY

*