गांधी-नेहरूंचे तंत्रज्ञान मोदींना काय समजणार ?

0

शरद पवार : पंतप्रधानांना हे बोलणं शोभत नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)- निर्वासीतांना देशात पाठविण्याचे बंद न केल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे करत बांगला देशाची निर्मिती केली. स्व. राजीव गांधी यांनी विज्ञान-अधुनिकतेची कास धरत क्रांती घडविली. कष्ट, त्याग आणि प्राणांची आहुती देणार्‍या गांधी घराण्याबद्दल शंका घेणे आणि एकीकडे माझं बोट धरून आल्याचे सांगताना दुसरीकडे माझ्याच घरातील भांडण उकरून काढणं हे देशाच्या सर्वोेच्च पदावर बसलेल्या पंतप्रधानांना शोभत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. गांधी-नेहरूंचे तंत्रज्ञान मोदींना समजणार नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित नगरमधील सभेत पवार बोलत होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार अरुणकाका जगताप, अंकुश काकडे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार वैभव पिचड, राहुल जगताप, दादा कळमकर, अशोक विखे, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राजेंद्र नागवडे, मंजुषा गुंड, सर्जेराव निमसे, घनशाम शेलार, शारदा लगड, निर्मला मालपाणी, रेश्मा आठरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पवार यांनी नगरमध्ये वारंवार येण्याच्या कारणाचा उलगडाही भाषणातून केला. यशवंतराव चव्हाणांनी पुढची पिढी तयार करण्याचं काम केलं. तेच काम राष्ट्रवादीही करत आहे. तरुणांना संधी देत नवी पिढी घडविण्याची जबाबदारी पार पाडण्याकरीता मी नगरमध्ये येतोय, असे स्पष्ट केले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी नगरचा दुष्काळ पाहण्यासाठी आले असल्याची आठवण सांगत विकासाच्या मुद्यांवर मार्गदर्शन घेण्यासाठी नगरचे खासदार दिलीप गांधीही दिल्लीत भेटायचे. त्यांनाही मार्गदर्शन केले. आता तेच काम नवी पिढी पूर्ण करेल. सरकारने शेतकर्‍यांना 72 हजार कोटी रुपयांची दिलेली कर्जमाफी फसवी असून फोटोसेशनपुरते कर्जमाफीचे पत्र देण्याचे नाटक भाजप सरकारने केल्याची टीका पवार यांनी केली. प्रधानमंत्री मोदी पाच वर्षात काय केलं हे सांगत नाही, बेेरोजगारीवर बोलत नाही. फक्त गांधी-पवार घराण्यावर बोलतात.

कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. काँग्रेस-माझ्यात मतभेद असतील पण विचार मात्र एक होता असे सांगत काँग्रेससोबत पवार कसे या मोदींच्या टिकेला उत्तर दिले. एकीकडे माझं बोट धरून राजकारणात आल्याचे सांगणारे मोदी दुसरीकडे माझ्या घरातील वाद उकरून काढताहेत. शाहू-फुले विचारात वाढलेल्या आईने आम्हाला एकत्र कुटुंब पध्दती शिकविली. दिवाळीत 70-75 जण त्यातूनच एकत्र येतो, असे सागंत पवारांनी मोदी यांचा समाचार घेतला. यावेळी डॉ.अशोक विखे यांनी ना.विखे कुटुंबावर टीका केली. विकास झाला नाही, असे आरोप करणारे आजोबा-पंजोबाने केलेला विकास विसरले का? अनेक वर्षे जिल्हा परिषदेची सत्ता, राज्यात मंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपद आहे. मग त्या माध्यमातून दक्षिणेचा विकास का केला नाही, असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी अनेक कौटुंबिक आणि डॉक्टर पदवी कोणी, कशी मिळवली, याबाबतचे खुलासे केले.

आ.जगताप यांचे इंग्रजी भाषण
संसदेत प्रश्‍न मांडण्यासाठी अभ्यास असावा लागतो, इंग्रजी बोलता यावं लागतं, या विरोधकांच्या आरोपाला संग्राम जगताप यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. इंग्रजी जेथे बोलायची तेथे बोलावी लागते. अमेरिकेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला जाताना माझी मुलाखत अमेरिकेतील तज्ज्ञांनी घेतली, अर्थात इंग्रजीतच. त्यात पास झाल्याने अमेरिकेला गेलो. हे सांगतानाच संग्राम जगताप यांनी इंग्रजीत भाषण सुरू केलं.

सासर्‍याकडे पाहून मुलगी देता का?
माझ्याकडे पाहून मत द्या, असं सांगणार्‍या मोदींना पवारांनी यावेळी टोला लगावला. सासर्‍याकडे पाहून कोणी मुलगी देतं का? मुलाचं कर्तृत्व पाहून मुलगी दिली जाते, असे ते म्हणाले. नगर दक्षिणेत कोणी दहशत, पैशाचा वापर करत असेल तर त्याला बळी पडू नका. त्यांना धडा शिकवा. कोणी दम दिला तर घाबरू नका. माझ्यापर्यंत निरोप पोहचवा. मी त्यांचा बंदोबस्त करेल, असं पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

*