गाठी बांधू नका, मोकळ्या हाताने द्या ; कर्जमाफी प्रकरणी शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

0

 भेंडा येथे नागरी सत्कार

भेंडा (वार्ताहर) – राज्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफीवरून पिळवणूक सुरू आहे. शेतकरी घेतलेले कर्ज कधी बुडवत नाही, मात्र, परिस्थिती साथ देत नाही. त्यात दुष्काळ!. शेतकरी संकटात असतांना त्याला मदत करण्याचे काम सरकारचे आहे. शेतकरी मदत मागतो तर गाठी बांधून देऊ नका तर सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी करून सरकारच्या कारभारावर माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी टीका केली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. पवार यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार, तर माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे अमृत मोहत्सवी सत्कार, शेतमळा ते विधान सभा या आत्मचरित्राचे प्रकाशन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, भास्करगिरी महाराज, कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले, खा. दिलीप गांधी, आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, आ. अरुण जगताप, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. सुधीर तांबे, आ. वैभव पिचड, साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, माजी आमदार अशोकराव काळे, जयंतराव ससाणे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, बाजीराव खेमणार, सुजीत झावरे, विठ्ठलराव लंघे, दिलीपराव लांडे, अरुण कडू, अशोक गायकवाड, कॉ. सुभाष लांडे, डॉ. क्षितिज घुले, आशुतोष काळे, राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवार यांचा तसेच वयाचे 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी आमदार पांडुरंग अभंग व सौ नर्मदाताई अभंग यांचा सत्कार सत्कार पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान शेतमळा ते विधानसभा या आत्मचरित्राचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पवार म्हणाले की, मी अनेक राज्य, जिल्ह्यातील कार्यकर्ते पाहिले. परंतु सत्शील, प्रामाणिक, सेवाभावी वृत्ती, नेतृत्वावरील विश्वास आणि सच्चा सहकारी हे पांडुरंग अभंग यांचे वैशिठ्ये आहेत. शेती समाजकरणाची आवड, ग्रामपंचायत ते विधान सभा प्रवास, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची भूमिका अभंग यांनी घेतली.

पद्मश्री विखे पाटील, मारुतराव घुले पाटील, आबासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब थोरात या सहकारातील जाणत्या नेतृत्वामुळे सहकार चळवळ वाढली. 1990 मधील घुले पाटलांच्या पराभवाचे शल्य आमच्या मनात होते. 95 मध्ये ते धुवून काढण्याचे ठरविले असतांना स्वतः थांबून त्यांनी अभंग यांना पुढे आणले.
पुन्हा वेळ आली त्यावेळी घुले पाटलांनी पुन्हा अभंग यांचे तर अभंग यांनी नरेंद्रचे नाव सुचविले. सत्ता नको नेतृत्व मोठे झाले पाहिजे हा घुलेचा आदर्श अभंग पुढे नेत आहेत.पाण्याचा मोठा यक्ष प्रश्न आणि वाद आहे. पाणी नसल्याने शेतकरी वारंवार अडचणीत येत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील वाया जाणारे पाणी वळवून जयकवाडीला देण्यास अडचण नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.कर्जमाफीची चर्चा सार्‍या देशात आहे. 1978 मध्ये दुष्काळात जनतेला जगविण्यासाठी बंर्डींगची कामे केली. त्यांचे कर्ज शेतकर्‍यांचे उतार्‍यावर आले. मी मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमतः हे बंर्डींगचे कर्ज माफ केले. तेंव्हापासून कर्जमाफी सुरू झाली. शेती कर्ज 13 टक्क्यावरून शून्य टक्क्यापर्यंत आणले.आज सत्ता असणार्‍या सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के हमी देण्याचे आश्वासन प्रचारादरम्यान दिले होते.
शेती मालाला हमी भाव, पाण्याची व्यवस्था, खते बियाणे स्वस्त दरात मिळत नाही तोपर्यंत कर्जमाफीची मागणी होतच राहणार आहे. या देशातील 60 टक्के जनता खेड्यात राहते. त्यांची क्रयशक्ती वाढविली पाहिजे.
उत्तर प्रदेशसाठी वेगळी भूमिका आणि महाराष्ट्रासाठी वेगळी अशी असू नये. देशाच्या पंतप्रधानाचे एखादे विधान हे संपूर्ण देशासाठी असते. धोरणात्मक निर्णय हा सर्वांसाठी असतो. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात नगर जिल्ह्यातूनच झाली आहे, असे पवार यांनी आवर्जून सांगितले.
पालकमंत्री शिंदे म्हणाले की, नेतृत्वासोबत प्रामाणिक राहणारे अभंग यांचे हे दुर्मिळ उदाहरण अलीकडच्या कालखंडात दिसून येत नाही. पवार साहेब हे माणसांच्या मनाशी जुळलेले नेतृत्व आहे. ते सत्तेत असो वा नसो ते सातत्याने राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. असे कोणतेच क्षेत्र नाही की त्यात त्यांचे योगदान नाही.
पाण्याचा प्रश्न जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आणि हिताचा प्रश्‍न आहे. सर्वानी एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. जिल्ह्याच्या पाण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझी भूमिका निश्चित पार पाडील, असेही शिंदे यांनी म्हटले.
ना. विखे पाटील म्हणाले की, देशाच्या राजकारणाची यादी पवार साहेबांच्या नावाशिवाय पूर्णच होत नाही. शेती, सहकार, उद्योग, समाजकारण, राजकारण, क्रीडा या सर्वच क्षेत्रात त्यांचे अतुलनिय कार्य आहे.पद्मविभूषण पुरस्कारामुळे या पुरस्काराचीच प्रतिष्ठा वाढली आहे, असे बहुआयामी कार्य त्यांचे आहे. राजकीय वाटचालीत पवार साहेबांचे आशीर्वाद घेऊनच मी पुढे गेलो.
पाण्याच्या मूलभूत प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो. 20 वर्षात पाण्याचे नवीन श्रोत निर्माण करण्यात कमी पडलो. नगर जिल्ह्याच्या पाणी प्रश्नासाठी जिल्ह्याने राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वपक्षीय भूमिका घेतली पाहिजे. यासाठी पवार साहेबांनी लक्ष घालावे. सुख- दुखा:त सदा स्मितहास्य ही अभंग यांची हातोटी आहे. स्वर्गीय घुले पाटलांना त्यांनी साथ दिली. त्यागाची असीम परिसीमा म्हणजे पांडुरंग अभंग आहेत असे विखे म्हणाले.
माजी मंत्री पिचड म्हणाले की, शब्द पाळणारा शिष्य असावा तर पांडुरंग अभंग यांच्या सारखा. खिसे कापू कीतीही भेटतील परंतु असा सरळ माणूस भेटणार नाही. शरद पवार यांचे राजकारण अपराजित आहे. आजचा कार्यक्रम होत असताना मारुतराव घुले पाटलांची उणीव जाणवते.
तटकरे म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनतर देशाच्या राजकारणात आदराने पवार साहेबांचे नाव घेतले जाते. वडिलांचे सहकारी असलेल्या पांडुरंग अभंग या ज्येष्ठ नेत्याचा सन्मान करण्याचा मोठेपणा घुले बंधूनी दाखविला ही महत्त्वाची बाब आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची ताकद नगर जिल्ह्यातील नेतृत्वात आहे. तर दिल्लीच्या तक्ताला धडक देण्याची ताकद-क्षमता पवारांमध्ये आहे.
आ. थोरात म्हणाले, पांडुरंग अभंग हे सहकारातील सत्वशील हाडाचा कार्यकर्ता आहेत. नेतृत्वाच्या विचारांशी एकनिष्ठ व जिल्ह्यात सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आहे. पवार साहेबांनी देशाच्या राजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले आहे. ते केवळ पक्षांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते आहेत.
आ. दिलीप वळसे पाटील म्हणाले, मारुतराव घुले पाटलांनी दिव्यदृष्टीतून परिसराचा विकास केला. अभंग हे सामान्य कुटूंबातून विधानसभेत आले. त्यांच्याबद्दल आमच्या सर्वाांच्या मनात आदर आहे. सत्ता असो वा नसो सर्व समान्यांचे प्रश्नापासून कधीच बाजूला गेले नाहीत. म्हणूनच पवार साहेबां विषयी नगर जिल्ह्याने आज कृतज्ञात व्यक्त केली आहे. दरम्यान पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी पवार साहेब यांनी लक्ष घालावे अशी मागणी माजी आ. नरेंद्र घुले यांनी केली.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक परसराम खराडे, किसनराव जपे, हाजी इब्राहिम मणियार यांचा पवारांचे हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*