Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लफडे केले की इडी नाही, तर येडी मागे लागते

Share

पक्ष सोडून गेलेल्यांवर शरद पवारांचा निशाणा

अहमदनगर (प्रतिनिधी) – 125 कोटी जनतेच्या पोटाला अन्न पुरविणार्‍या मायबाप शेतकर्‍यांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. राज्यात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून याला सरकार जबाबदार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता द्या सरसकट कर्जमाफी देतो, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दरम्यान, लफडे केले की इडी नाहीतर येडी मागे लागते, अशा शब्दांत पक्ष सोडून गेलेल्यांवर त्यांनी निशाणा साधला.

राष्ट्रवादीचा नगर येथे पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अब्दूल गफार, मागसर्वीय आघाडीचे जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी खा.प्रसाद तनपुरे, आ.अरूण जगताप, आ.संग्राम जगताप, आ.राहुल जगताप, अंकुशराव काकडे, माजी आ.नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडूरंग अंभग, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मंजुषा गुंड, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, संदीप वर्पे, विठ्ठलराव लंघे, दादा कळमकर, प्रताप ढाकणे, अविनाश आदिक, अभिषेक कळमकर, माणिक विधाते, शारदा लगड, निर्मला मालपाणी, अरूण कडू, अजित कदम, डॉ.किरण लहामटे, निलेश लंके, बाबासाहेब भिटे, सत्यवान पवार, संतोष आघाव, नंदकुमार तनपुरे, अशोक कदम यांच्यासह नेते उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, भाजप कारखानदारांचे कर्ज माफ करेल. पण शेतकर्‍यांचे कर्जमाफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात. शेतकर्‍यांनी यांचे काय घोडे मारले? असा सवाल करत ऑनलाईन माफी सांगून शेतकर्‍यांची फसवणूक केली, आम्ही सरसकट कर्जमाफी करु. यासाठी तुम्ही भाजपला चले जाव म्हणा, असे आवाहन त्यांनी केले. आज मोठ्या संख्येने कारखाने बंद पडत आहेत. यामुळे अनेकांच्या नोकर्‍या जात आहेत. यंदा ऊसच नसल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखाने दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालणार नाहीत. जिल्हा आर्थिक संकटात आहे. शेतकर्‍यांचे रोज वाटोळे सुरू आहे. त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि भाजपचे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढण्यात गुंग आहेत. पंतप्रधान मोदी झोपेतही पवार पवार करताहेत. 371 कलमानुसार नागालँड, मणिपूर व इतर आठ राज्यात देशातील इतर राज्यातील माणसे जमीन घेऊ शकत नाही. तेथे बदल का नाही? एका धर्माचे लोक राहतात, म्हणून काश्मिरात 370 कलम रद्द केले का? असा सवालही त्यांनी केला.

कोल्हापूर, सांगली येथे हजारो घरे पुरामध्ये वाहून गेली. शेती उध्दवस्त झाली. राज्याच्या प्रमुख या नात्याने पुरग्रस्तांना धीर देण्याची त्यांची जबाबदारी होती. पण मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरमधून फिरले व हवाई पाहणी केली. दुसरीकडे मी चिखलामध्ये गेलो. तेथील वेदना जाणून घेतल्या. जो संकटांमध्ये आहे, त्याला सरकारने धीर दिला नाही असा आरोप पवार यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनी काय दिवे लावले हे सांगत नाहीत. पंतप्रधान ही एक घटनात्मक संस्था आहे. मी त्या पदाची प्रतिष्ठा जपणारा आहे. पण मोदींना असे बोलणे शोभत नाही. आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात गुंडगिरी वाढलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांचे ते गाव आहे. त्यांच्याकडेच गृहमंत्रीपद असतांना तेथे गुन्हेगारी वाढलीच कशी. जे स्वत:च्या गावाचे सरंक्षण करू शकत नाही ते जनतेचे संरक्षण काय करणार? भाजपवाले फक्त बोलतात, असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

पवार यांनी महाराष्ट्रात काय केले, अशी टीका देशाचे गृहमंत्री शहा यांनी केली होती. यांच्यावर टीका करतांना आ.वळसे म्हणाले, भुकंपानंतर गुजराथ उभे करण्याचे काम पवार यांनी केले. एनडीआरएफ ही पवारांनी देशाला दिलेली देणगी आहे. बेरोजगारी, नवीन गुंतवणूक, तरूणांच्या हाताला काम या विषयावर बोलण्यापेक्षा भावनिक मुद्याच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्ताविक फाळके यांनी केले. यावेळी वर्पे, आ. राहुल जगताप, आ. संग्राम जगताप, शेख, गफार, गायकवाड यांची भाषणे झाली.

म्हातारा झालो, असे समजू नका!
नगर जिल्हा ऐतिहासिक आहे. येथे संघर्षच्या कालखंडात इंग्रजाविरोधात संघर्षाचा बिगुल वाजला होता. यामुळे आजच्या मेळाव्याला महत्त्व आहे. आघाडी सरकारच्या काळात सत्तेत असणारे आता विकासाच्या मुद्द्यावर सोडून जात आहेत. मग त्यावेळी यांनी काय केले, असा सवाल पवार यांनी केला. उगवतीचा इतिहास निर्माण करा. माझे वय झाले, मी म्हतारा झालो, असे समजू नका, असा इशारा त्यांनी दिला.

आधी कारखाना संभाळा : वळसे
जिल्ह्यात बारा-शुन्यच्या बाता मारणार्‍यांनी आधी स्वत:चा कारखाना व्यवस्थित चालवावा. शेतकर्‍यांना एफआरपीनूसार दर द्यावा. मग इकडे तिकडे नाक खुपसावे, असा टोला दिलीप वळसे पाटील यांनी जिल्ह्यातील एका मंत्र्याचे नाव न घेता लगावला. तसेच सत्तेचा दर्प येवू देवू नका, असा सल्लाही दिला.

तलवारीऐवजी बार
सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहेत. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का? या शब्दात त्यांनी टीका केली. राज्यांमध्ये आमचे सरकार असताना आम्ही मुंबईमध्ये डान्स बार बंद केले. चौफुला बंद केला, मात्र आता या सरकारने एक सर्वकाही सुरू केले आहे. नव्या पिढीला तुम्ही काय प्रेरणा देतात असा सवालही उपस्थित केला.

भांगरे राष्ट्रवादीत
शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी अकोल्यातील भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 23 तारखेला आ.अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

काळे अनुपस्थित
कोपरगावचे अशुतोष काळे मेळाव्याला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांचे सर्व समर्थक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. काळे हे आजारी असल्याचे कारण पक्षाने दिले. तरिही या अनुपस्थितीमुळे विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. काळे विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांचे वडिल अशोकराव काळे शिवसेनेकडून कोपरगावचे आमदार होते. दरम्यान, रोहित पवार यांचाही कार्यकर्ते शोध घेत होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!