समृद्धी विरोधात शरद पवारांनी दंड थोपटले

0

मुंबई | मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या लाडक्या प्रकल्पाच्या मागे आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार लागले असून समृद्धी महामार्गत ज्यांच्या जमिनी जात आहेत असा सर्व शेतकऱ्यांची तसेच विविध गावांतील शेतकरी संघर्ष समित्यांची एक परिषद त्यांनी १२ जून रोजी औरंगाबाद येथे बोलावली आहे.

तिथे या महामार्गा संबंधात लोकांचे म्हणणे ऐकून घेऊ आणि नंतर आवश्यक तर सरकार बरोबर संघर्षाचा मार्ग घेऊ अशी घोषणा त्यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे घाई घाईने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की मी गेले काही दिवस या मार्गासंबंधी  माहिती घेतो आहे.

१२ जून रोजी औरंगाबाद येथे होणारी परिषद राष्ट्रवादी काँग्रेसची नसून पक्षातीत असेल. मात्र राष्ट्रवादीचे नेते त्यात पुढाकार घेत आहेत. सर्व पीडितांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे ही पक्षातीत परिषद असली तरी पवार व त्यांचे सहकारी त्याचे संयोजन करती आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री पवार यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे संघर्ष समित्यांच्या मंडळींनी शरद पवार यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केली त्या नंतर त्यांनी औरंगाबाद येथे परिषद घेण्याचा निर्णय केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की साधारणतः विकासाच्या प्रकल्पांच्या बाजूनेच आम्ही असतो. आम्ही आधी सत्तेत होतो आणि पुढेही सत्ते येणार आहोत. तेव्हा उगीचच विरोध कऱण्याची भूमिका नाही. पण नागपूर, नासिक व जळगाव येथे मी गेल्या काही दिवसात अनेक लोकांना भेटलो.

नागपूर मुंबई हा जो समृद्धी महामार्ग होतो आहे त्याची माहिती मी आधी सरकारकडून घेतली. मुख्यमंत्र्यांना मी विचारले त्यांनी काही अधिकारी मोपलवार व त्यांच्या अभियंत्यांना  माझ्याकडे पाठवले. त्यांनी माहिती दिली की सर्व कायद्यांचे नियमांचे पालन करून जमिनीची मोजणी झाली आहे. पण बाधित लोकांनी मला जी माहिती दिली त्यावरून असे दिसते की आदिवासींच्या जमिनी बाबतीत जो पेसा कायदा आहे त्यात जमिनी घेताना संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव हवा तसे ठराव इथे झालेले नाहीत.

केंद्र सरकारने युपीए कालात जो जमीन अधिग्रहण कायदा केला त्यात रेडी रेकनरच्या चौपट किंमत देण्याची तरतूद आहे त्या बाबतीत या प्रकल्पात स्पष्टता नाही. इगतपुरी तालुक्याचे उदाहरण देऊन पवार महणाले की तिथले लोक आले होते. त्या तालुक्यात सर्व मिळून ८२८१२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी लष्करी प्रकल्प, रस्ते, रेल्वे, धरणे आदि विविध प्रकल्पांत पूर्वीच ५६२९९ हेक्टर  जमिनी घेतल्या आहेत आणि आता पुन्हा समृद्धीसाठी १८५० हेक्टर जमिनी घेणार असे सांगत आहेत. इगतपुरीचे शेतकरी हैराण झाले नसते तरच नवल होते.

शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झाल्याचे सरकार सांगते पण शेतकऱ्यांना मोजणीच्या कागदांवर शेतकऱ्यांच्या सह्या देखील नाहीत. परस्पर मोजणी कशी काय होऊ शकते. या मार्गात २१ ठिकाणी नवनगरे उभी राहतील व त्यात जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्यापोटी दरसाल रकमेच्या ९ ट्क्के इतके व्याज देणार असे अधिकारी सांगतात. पण सिडको नवनगर उभे कऱण्याचा अनुभव पाहता अशा नवनगरातील विकसित जमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना मोठ्या रकमा मिळण्यासाठी ३५ वर्षे वाट पाहावी लागली आहे.

सिडकोसाठी कै दि. बा. पाटील य़ांनी  मोठे आंदोलन केले होते. जासईत गोळीबारही झाला होता. मी १९७८ मध्ये मी मुख्यमंत्री झालो त्याच्या आधी तिथे मोठे आंदोलन होते. आम्ही त्यात तडजोडी करीत शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमिनी देण्याचा निर्णय़ केला. अशी आठवण सांगून पवार म्हणाले की समृद्धी महामार्गावर  होणाऱ्या २१ नवनगरात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या एक दोन पिढ्या तशाच जातील तेंव्हा हे म्हणतात तितकी रक्कम मिळायला जातील अशीही भीती पवारांनी व्यक्त केली.

मोजणी पूर्ण झाली व लोकांचा थोडा विरोध आहे हा मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढताना पवार म्हणाले की या मार्गाला हरकती घेणारी पोतीभर निवेदने शेतकऱ्यांनी आजच मला दाखवली आहेत. सिन्नर इगतपुरीमध्ये शेतकऱ्यांनी अधिक तीव्र विरोध केला तेंव्हा तिथे प्रचंड पोलीस बळ वापरून दमन सत्र कऱण्यात आले या विषयी शरद पवरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र आत्ताच मी कोणत्याही विरोधाची आंदोलनाची घोषणा करत नाही १२ जूनला शेतकऱ्यांची सविस्तर चर्चा झाल्या नंतर पुढची नीती ठरवू असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*