‘कुशावर्ताच्या कोतवाला’ची पवारांकडून दखल

गर्दी व्यवस्थापनाबाबत डॉ. सिंगल यांच्याशी चर्चा

0
नाशिक । पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या फुटओव्हर ब्रिजवर गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन 23 पादचारी मृत्युमुखी पडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी वर्षभरापुर्वी कुंभमेळाच्या निमित्ताने लिहलेल्या ‘कुशावर्ताचा कोतवाल’ या पुस्तकातील गर्दीचे व्यवस्थापनाची दखल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली आहे. तर याबाबत त्यांनी त्यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चाही केली.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे शेतकरी अभियानाच्या समारोप सत्राच्या पूर्वसंध्येला शरद पवार यांचे शहरातील एका हॉटेलमध्ये आगमन झाले होते. यावेळी त्यांनी वेळ देत आयुक्त सिंगल यांचे ‘कुशावर्ताचा कोतवाल’ हे पुस्तक मागवून घेतले. त्यातील गर्दीचे व्यवस्थापन याची दखल घेत. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांना दुरध्वनी करून याबाबत सुमारे 20 मिनीटे चर्चा केली.

नाशिकचे आयुक्त असलेले डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी गर्दी व्यवस्थापन यावर पीएचडी केलेली आहे. यातील त्यांचा सखोल अभ्यास आहे. 2003 साली त्र्यंबकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याचे तेव्हा पोलिस अधीक्षक असलेले रविंद्र सिंघल प्रभारी होते. त्यांनी व्यवस्थापनशास्त्राचे निकष लावून या कुंभमेळ्याचे काटेकोरपणे आयोजन केले होते. हा कुंभ त्यांनी गर्दीचे व्यवस्थापन करत यशस्वी केला होता. त्यावर आधारीतच त्यांनी कुशावर्ताचा कोतवाल हे एक पुस्तकही लिहिले आहे.

एलफिन्स्टन रोडच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुस्तकातील संदर्भ व उदारहणे तसेच विवंचन महत्वाचे आहे. त्यांनी या पुस्तकात दिल्याप्रमाणे नियंत्रणाची काही सूत्रे आहेत. कमीत कमी वेळात लोकांना आत घ्यायचं आणि बाहेर काढायचं यासाठी आगमनाचे आणि निर्गमनाचे रस्ते सतत खुले राहतील याची काळजी घ्यावी लागते. जमावाचे गर्दीत रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नाही.

मग त्यासाठी, लोक न अडखळता, एका जागी न थांबता, प्रवाहासारखे वाहत राहतील, याची खबरदारी घ्यावी लागते. सतत उद्घघोषणा, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन, दिशादर्शक पाट्या, अशा अनेक मार्गांनी अखंड प्रवाह वाहत राहिला की चेंगराचेंगरीची भीती कमी होत जाते. पहिले आणि महत्त्वाचे सूत्र असे की, वाहत्या गर्दीपुढे अचानक अडथळा उभा राहणे, अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. अचानक मधेच कोणी थांबला तर त्या क्षणीच गर्दीचा वेग थांबतो आणि वाहत जाण्याचा नैसर्गिक तोल धोक्यात येतो.

गर्दीत पायदळी तुडवले जाऊन मृत्यू येणार्‍यांच्या संख्येपेक्षा गुदमरून मरणारांची संख्या जास्त असते. हे े त्यांनी उदाहरणासहीत स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी मुंबईत 2014 साली घडलेली चेंगराचेंगरीची घटना घडली.तसेच 1981 साली कुतुब मिनार परिसरात घडलेल्या घटनांची उदाहरणे देली आहेत. तसेच नाशिक शहरात गोदावरीत कुंभमेळ्याच्या वेळीच घडलेल्या चेंगराचेंगरीचे उदाहरण देत त्याचा तौलानीक अभ्यास मांडला आहे.

मुंबई येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी या पुस्तकाची स्वतः दखल घेतली तसेच डॉ. सिंगल यांच्याशीही केली आहे. सिंगल यांनी मांडलेले गर्दी व्यवस्थापनाचे तंत्र शासनापर्यंत पोहचवून अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

माझ्यासाठी आश्चर्यकारक : सायंकाळी मला शरद पवार आपणाशी बोलणार असल्याचा संदेश आला आणि काही वेळात दुरध्वनीवरून त्यांचा फोन आला. त्यांनी पुस्तकातील गर्दीचे व्यवस्थापन या विषयावर माझ्याशी 15 ते 20 मिनीटे चर्चा केली. त्यांनी जी सखोल चर्चा केली त्यावरून त्यांनी हे पुस्तक अगोदरच वाचले असल्याचे तसेच त्यांचाही याबाबत सखोल अभ्यास असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांनी याची दखल घेऊन त्याबाबत चर्चा करणे हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते.
– डॉ. रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त

LEAVE A REPLY

*