Photogallery : अमृत महोत्सव : शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी : पवार

0

अभंग यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

पाणी प्रश्‍नी जिल्ह्यातील नेत्यांना मार्गदर्शनाचे काम शरद पवार यांनी करा : विखे पाटील
पवारांमुळेच राजकीय प्रेरणा : पांडूरंग अभंग
जिल्ह्याचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझी भूमिका निश्चित पार पाडेल : शिंदे
अमृतमहोत्सवी सोहळ्यास नेत्यांची मांदियाळी

अहमदनगर (प्रतिनिधी)– शेतकरी संकटात असताना त्याला मदत करणे हे सरकारचे काम आहे. शेतकर्‍याला कर्जमाफी देताना जाचक अटी न टाकता मोकळेपणाने सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकरीच देशाचा चेहरा बदलतील असे सांगत देश बदलायचा असेल, प्रगती करायची असेल तर त्याची कार्यशक्ती वाढली पाहिजे, हे सूत्र घेऊन राजकारण पुढे गेले पाहिजे असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले

विखे-थोरात पहिल्यांदा खरे बोलले…
विखे- थोरात पहिल्यादा एका व्यासपीठावर खरे बोलले. ही पवार नावाची जादू असल्याचे तटकरे म्हणाले. पाण्याचा वाद सोडावा, अशी विनंती विखे यांनी पवार साहेबांकडे केल्याने माझी सुटका झाली असल्याचे सांगून तटकरे म्हणाले, पवार साहेबांनी कोण कोणते वाद सोडवायचे हे तुम्हीच ठरवा, असे म्हणत चेंडू पुन्हा नगरकरांकडे टोलावला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा आणि माजी आमदार पांडुरंग अभंग अमृत महोत्सव सोहळा भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखाना येथे आज शनिवारी सकाळी झाला. व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, आ. दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, मधुकरराव पिचड, शिवाजीराव नागवडे, यशवंतराव गडाख, खासदार दिलीप गांधी, आमदार अरुणकाका जगताप, आ. राहुल जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य भास्करगिरी महाराज हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या हस्ते स्वातंत्र संग्रामात योगदान देणार्‍यांचा सन्मान करण्यात आला. शरद पवार यांना मान्यवर नेत्यांच्या हस्ते सन्मानपत्र बहाल करण्यात आले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते अभंग यांच्या ‘शेतमळा ते विधानसभा’ आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. शरद पवार यांनी दिलेल्या विचारामुळे मला राजकीय वाटचालीची प्रेरणा मिळाल्याचे पांडुरंग अभंग यांनी सांगितले. पवार यांच्यामुळे 1995 मध्ये माझा विधानसभेत प्रवेश झाल्याचे सांगत शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांसोबत काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या मार्गदर्शनात विधानसभेत उत्तम काम करता आले असल्याचे अभंग यांनी सांगितले. वळसे पाटील म्हणाले, सत्ता असो व नसो सर्व सामन्यापासून बाजूला जायचे नाही, ही पवार यांची शिकवण आहे. नागरिकांवर संकट कोसळले तर पवार साहेब सर्वात आधी मदतीला धावतात. जिल्ह्यातील पाणी प्रश्‍नावर एकत्रित भूमिका घ्यावी लागेल असे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना मार्गदर्शनाचे काम शरद पवार यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विखे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या नावाशिवाय देशातील राजकीय नेत्यांची यादी अधुरी ठरेल. पवार यांच्यामुळे पुरस्काराची उंची वाढली आहे. नगरच्या मातीत त्यांच्या राजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. आम्ही घडलो, पदांवर पोहचलो यात पवार यांचे योगदान आहे, हे मान्य केले पाहिजे. आज शेतकरी कर्जमाफीला निकष लावले जातात, मात्र पवार यांनी कर्जमाफी देताना सकल्यपूर्ण विचार केला. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पवार यांची गरज असल्याचे विखे यांनी सांगितले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्य आणि देशाच्या राजकारणात पवार यांचे स्थान अढळ आहे. आजचा कार्यक्रम स्मरणात राहणारा असून अभंग सत्शील, प्रामाणिक कार्यकर्ते, नेते असल्याचे थोरात यांनी सांगितले.
पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, शरद पवार सत्तेत असो व नसो ते सातत्याने राजकारणाचे केंद्रबिंदू असतात. अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. जिल्ह्यातील पाण्याच्या संदर्भात चर्चा करावी लागेल, एकत्र निर्णय घ्यावा लागेल. जिल्ह्याच्या दृष्टीने, हितासाठी एकत्र यावे लागेल. जिल्ह्याच्या पाण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझी भूमिका निश्चित पार पाडेल, असे आश्‍वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले. नेतृत्वासोबत प्रामाणिकपणे राहणारे अभंग यांचे दुर्मिळ असे उदाहरण असल्याचे शिंदे म्हणाले. शरद पवार म्हणाले, अभांग हे सचोटीचे नेते असून संधीचे सोने करण्याची त्यांची हातोटी आहे. समाजाशी बांधिलकी निर्माण करणारे नेतृत्व या जिल्ह्यात पुढे आली, त्यात मारोतराव घुले यांचे नाव घ्यावे लागेल. जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्‍न यक्ष आहे. पालकमंत्री शिंदे यांच्या पक्षाचे खाली आणि वरही सरकार असतानाही ते मला पाणीप्रश्नी लक्ष घालायला सांगतात हे काही कळत नाही. पण ते म्हणतात म्हणून लक्ष घालतो असे पवार यांनी स्पष्ट केले. वाहुन जाणारे पाणी जायकवडीकडे वळवणे गरचे असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शेती कर्ज 12 टक्क्यावरून 3 टक्के करण्याची भूमिका मी घेतली. आज सत्ता असलेल्यांनी शेतमाल खर्च व त्यावर 50 टक्के देण्याची भूमिका प्रचारात घेतली होती. त्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत कर्जमाफी मागणी होत राहील. शेतमालाला योग्य भाव द्या, पाण्याची सोय करा, खते बियाणे स्वस्त करा, सन्मानाने जगण्याची व्यवस्था करा, पुन्हा कर्जमाफी मागणी करणार नाही. घेतलेले कर्ज शेतकरी कधी ठेवत नाही, पण परिस्थिती खराब असल्याने शेतकर्‍याला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*