तेंव्हापासून रोज करंगळी बघतो! ; पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर पवार यांचा चिमटा

0
भेंडा (वार्ताहर) – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा आणि पांडुरंग अभंग यांचा अमृतमहोत्सव यानिमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर एकाच व्यासपीठावर आले. अलिकडच्या वर्षात प्रथमच हे घडले. याचा उल्लेख नेत्यांनी भाषणात केला. राजकीय चिमट्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. पवारांचे बोट धरून राजकारण शिकलो, असे पंतप्रधान मोदी म्हटल्यापासून मी रोज आपली करंगळी तपासून पाहतो, असे पवारांनी सांगताच हास्यकल्लोळ उडाला.
आपल्या भाषणात शरद पवार यांनी प्रारंभीच मारूतराव घुले यांची आवर्जून आठवण काढली. त्यानंतर राजकीय भाष्याकडे वळताच त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना चिमटा काढला. तत्पूर्वी जिल्ह्याच्या पाणीप्रश्‍नी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, याकडे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी लक्ष वेधले होते. हाच धागा पकडून पालकमंत्री शिंदे यांनी पवार यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याचा उल्लेख करून पवार म्हणाले, खाली आणि वरही शिंदे यांचे सरकार आहे. तरिही ते मला पाणीप्रश्‍नी लक्ष घालायला सांगतात, हे काही कळत नाही. पण म्हणतात म्हणून घालतो लक्ष…असे त्यांनी उच्चारताच कार्यक्रमस्थळी खसखस पिकली. यावेळी मोदी यांनी पवारांच्या बोटाला धरून राजकारण शिकलो या वक्तव्याचा भाषणाच्या ओघात उल्लेख केला.

कोणी काहीही सांगीतले तरी शुभेच्छा!
आम्ही घडलो. राजकारणात विविध पदांवर पोहचलो. यात शरद पवार यांचे योगदान निश्‍चित आहे, हे मान्य केले पाहिजे, असे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे म्हणाले. भाषणाच्या शेवटी कोणी काहीही सांगीतले तरी आमच्या पवार साहेबांना शुभेच्छा आहेत, असे ते म्हणताच खुद्द शरद पवार यांच्या चेहर्‍यावरही हास्यलकेर उमटली.

गडाख, कोल्हे यांची उपस्थिती
भेंडा येथील कार्यक्रमाला सर्वपक्षीय उपस्थिती लक्षवेधी ठरली. यात ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्यापासून आशुतोष काळे, अविनाश आदिक या तरूण नेतृत्वाचाही समावेश होता. यात यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गडाख आणि घुले यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रृत आहे. मात्र सोबतच पवार आणि गडाख यांची मैत्री राजकारणापलिकडची मानली जाते. त्यामुळे गडाख येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्या उपस्थितीनेच दिले.

पाणी, विखे, थोरात आणि तटकरे!
पाणीप्रश्‍नावर शरद पवार यांनी मार्गदर्शन करावे. यासाठी आता जिल्ह्याने एकत्रित विचार करावा. अनेकांच्या यशात त्यांचे योगदान आहे, असे यावेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे म्हणाले. यानंतर बोलण्यासाठी उठलेल्या आ.बाळासाहेब थोरातांनी पवार यांच्यासोबतचा कृषीमंत्री म्हणून कार्यकाळ आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कालखंड असल्याचे सांगीतले. त्यांच्यानंतर भाषण करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा धागा पकडून विखे-थोरात आज एकाच व्यासपीठावर खरे बोलले, असा चिमटा काढला. असे या जिल्ह्यात प्रथमच घडले.हिच पवार नावाची जादू आहे, असे ते म्हणाले. आता पवारांकडून कोण-कोणते वाद सोडवून घ्यायचे ते तुम्हीच ठरवा, असा सल्ला त्यांनी देताच उपस्थितांमध्ये हास्यस्फोट झाला. नगरचा पाणीप्रश्‍न किती गंभीर असतो, याचा आपणाला अनुभव आहे. जलसंपदा मंत्री असताना बाजूला विखेंचा बंगला होता तर समोर थोरातांचा. थोरात मला भेटून गेले की लगेच विखे यायचे. आता हा वाद पवार सोडवणार म्हणजे माझी सुटका झाली, असे तटकरे यांनी सांगताच पुन्हा हास्याचे कारंजे उडाले.

महिलांची लक्षणीय उपस्थिती
कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणे गर्दी झाली. सत्तेत नसतानाही पवार या नावाला असलेले वलय यातून स्पष्ट झाले. कार्यक्रमाला शेवगाव मतदारसंघातूनही मोठी उपस्थिती होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी यासाठी गेल्या 15 दिवसांत विशेष परिश्रम घेतले होते. त्याचा हा परिणाम असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांत होती. जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा वाढता राजकीय वावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू केलेल्या तयारीचे संकेत या कार्यक्रमाने दिल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

*