Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शंकररावांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरासंगमचा कायापालट करणारच- गडाख

Share

तीन कोटी रुपयांचा कांदा मार्केटचा आराखडा तयार

देवगडफाटा (वार्ताहर)- प्रवरासंगम परिसराचा कायापालट करण्याचा व बाजारपेठ फुलविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरासंगम परिसरात तीन कोटी रूपये खर्चाचा कांदा मार्केटचा आऱाखडा तयार झाला आहे. मी माझा शब्द पाळण्याच्या तयारीला लागलो आहे. शंकररावांना या निवडणुकीत मताधिक्य देऊन तुमचा शब्द खरा करून दाखवा, असे अवाहान युवानेते प्रशांत गडाख यांनी केले.

तालुक्यातील प्रवरासंगम येथे ‘क्रांतिकारी’चे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पद्मनाथ महाराज जाधव अध्यक्षस्थानी होते. अ‍ॅड. अण्णासाहेब अंबाडे, डॉ. सुनिल वैरागर, संजय वाल्हेकर, अनिल बाकले, जानकीराम डौले, गणेश जाधव, श्रीरंग हारदे, शिवाजी हारदे, नाना नवथर उपस्थीत होते. आमदार मुरकुटे यांचे खंदे समर्थक असणार्‍या पंचायत समितीचे माजी सदस्य जानकीराम डौले यांनी यावेळी ‘क्रांतीकारी’त प्रवेश केला.

यावेळी प्रशांत गडाख यांनी तालुक्यात चालू असलेल्या लबाड कारस्थानाचा भांडाफोड केला. गडाख कुटूंबाविषयी विष पेरण्याचे काम केले जाते, माणसे आमच्याजवळ आलीच नाही पाहिजेत याची खबरदारी घेतली जाते. सत्ता हातात असताना त्याचा गैरवापर करून दहशत पसरवली जाते, पण विरोधकांच्या या धमक्याला आम्ही घाबरणारे नसल्याचा इशारा त्यांनी दिला. गलिच्छ राजकारणाने परिसीमा गाठली आहे. फक्त खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जर वास्तवात आमदार मुरकुटे खरे बोलत असतील तर त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यासाठी समोरासमोर यायला मी तयार आहे.

मुख्यमंत्र्यांना सभेमध्ये बोलायला लावून त्यांची आ. मुरकुटेंनी किंमत कमी करून टाकली आहे. कारखाना काढणे हे बोलण्या एवढे सोपे नाही तर उलट आहे ते दोन कारखाने बंद पाडण्यासाठी प्रयत्न करून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे काम केले जाते. यावेळी जनता फसणार नसून आ. मुरकुटेंचे खरे रूप जनतेने ओळखले आहे. सत्तेचा गैरवापर करून चांगल्या संस्था मोडीत काढून संपवण्याचे कटकारस्थान मुरकुटे यांनी केले. मात्र त्यांच्या या कुटील कारस्थानामुळे सर्व संस्थांचे ऑडीट पूर्ण होवून सत्य समोर आल्याने आमदार मुरकुटे तोंडावर पडल्याचे त्यांनी नमूद केले.

शनीशिंगणापूरच्या 106 कर्मचार्‍यांच्या रोजगारावर गदा आणून त्यांना घरी बसवण्याचा मुरकुटे यांचा मनसुबा पर्ण होणार नसून या सर्व 106 कर्मचार्‍यांना नोकरीवर घेवूनच दाखवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ. मुरकूटे विकृत मनोवृत्तीचे असून केवळ गडाखांवर घाणेरडे बोलणे एवढेच त्यांचे कर्तृत्व आहे. पण सामान्य जनतेला कधी मदतीचा हात पुढे करत नाहीत. आमदार मुरकुटे यांच्या सुविद्य पत्नी संचालिका असलेल्या पतसंस्थेकडून सामान्य जनतेच्या ठेवीचे पैसे देण्याची त्यांच्यात दानत नसून या विषयावर त्यांनी कधी ‘ब्र’ शब्द काढलेला नाही. याउलट जर हेच पैसे आमच्या संस्थेत अडकले असते तर तालुकाभर बोंबा मारण्याचे काम मुरकुटेंनी केले असते, असा चिमटा गडाख यांनी यावेळी काढला.

जानकीराम डौले यांनी आ. मुरकूटे यांच्या कारस्थांनाचा भांडोफोड करताना सांगीतले की, गेल्या वेळी मुरकुटे हे विधानसभेला सर्व संपत्ती डावावर लावल्याचे सांगतात. यासंदर्भातील काही पुरावे असतील तर देण्याचे आवाहन त्यांनी करून खरेच संपत्ती डावावर लावली होती तर यावेळी एवढी मोठी संपत्ती कशी आली याचा खुलासा करण्याचे आव्हान त्यांनी दिले. आपण मुरकुटे यांच्या प्रक्रीयेत सहभागी होतो. परंतु मतलब पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्ता संपवण्याचे धोरण मुरकुटे यांनी राबवले.

दोघांमध्ये भांडणे लावून आपला स्वार्थ साधण्याचे त्यांचे मनसुबे असतात. कोणत्याही कार्यकर्त्यांचे काम व त्यांना मदत मुरकुटे करतच नाहीत, परंतु त्यांचे कोणतेही काम होवूच नये यासाठी प्रयत्नशील राहत असल्याचा आरोप डौले यांनी केला. यावेळी बेलपिंपळगाव, वरखेड, जळका, प्रवरासंगम, खेडलेकाजळी येथील शेकडो तरूणांनी क्रांतीकारीत प्रवेश केला.

“आमदार मुरकुटे उत्तर द्या”चे फलक लावा
आ. मुरकुटे यांना वारंवार विनवण्या करून देखील जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देत नसल्याने आता घराघरावर पांढरे कागद चिकटवले जावून त्यावर फक्त ‘आमदार मुरकुटे उत्तरे द्या’ असा मजकूर लावून मुरकुटेंना जाब विचारण्याचे अवाहन प्रशांत गडाख यांनी यावेळी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!