शिंगणापूरात भाविकांची मांदीयाळी

0
शनिशिंगणापूर (वार्ताहर)- श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे दुसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त विविध मान्यवरांसह देशभरातून सुमारे दोन लाख भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. मंदिर परिसरात भक्तांच्या काही वेळा रांगा लागल्या. शिर्डी मार्गे येणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने तसेच जिल्ह्यातील पायी वारी करणारे शनिभक्त यांच्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळाली.
शनिभक्तांनी शनिचौथर्‍यावर जावून स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले. तर काही शनिभक्तांनी शनिचौथर्‍याखालूनच दर्शन घेणे पसंत केले. श्रावणातील दुसर्‍या शनिवारचे औचित्य साधून काहींनी शाबुदाणा खिचडी तर काहींनी अन्नदान केले.
मराठी शाळेपासून ते घोडेगाव रोड सर्कलपर्यंत मेन रस्त्यावर अतिक्रमण करुन पुजा साहित्यासह मका कणीस, काकडी, पेरु, भुईमूग शेंगा, पाणीपुरी, केळी, नारळ पाणी आदी फळे व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागल्या होत्या. त्यामुळे काही वेळा वाहतूक कोंडीचे प्रकार घडल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त ेकली.
शनिचौथरा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंग, भोजन, हरवले-सापडले, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

परिसराची श्‍वानपथकाकडून पाहणी परिसराची श्‍वानपथकाकडून पाहणी  श्री शनैश्‍वर देवस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने अहमदनगर येथील श्‍वान पथकासह बॉम्बशोधक पथकाने मंदिर परिसर, पार्किंग, प्रसादालय, महाद्वार, दर्शनपथ, शनिचौथरासह व्हीआयपी गेस्ट हाऊस या ठिकाणची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक जे. बी. वाबळे, ए. के. मुरकुटे, श्री. घोडगे तसेच पोलीस कर्मचारी भिंगारदिवे, मोरे, गांगुर्डे, चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*