शनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी

0

सोनई/शनिशिंगणापूर (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिअमावस्या व सुट्ट्यांमुळे सुमारे तीन लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले. शुक्रवारी सकाळी 11.50 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अमावस्या होती.

शनिवारी पहाटे झिम्बाब्वे येथील उद्योगपती जयेश शाह व औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती झाली. शनिदेवाचा चौथरा परिसरात व ठिकठिकाणी शनिअमावास्येमुळे फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोनई ते शनिशिंगणापूर या प्रमुख रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.

शनैश्‍वर रुग्णालयाजवळ वाहनतळ उभारण्यात आले होते. मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर वाहने उभी करून भाविक पायी तसेच काही भाविक ऑटोरिक्षाने दर्शनासाठी येत होते. अनेक भाविकांनी नो पार्किंमगमध्ये वाहने उभी करत पोलिसांशी हुज्जत घातली. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी दिल्ली व हरियाणा येथील भक्त मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेे होते. अनेक भाविकांनीही महाप्रसादाचे वाटप केले. देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनामुळे पानसनाला सुशोभिकरणामुळे शनैश्‍वर तीर्थक्षेत्राचा विकास झपाट्याने होत असल्याचे पाहून अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले.
तेलाची विक्रमी विक्री झाली तर पूजेचे ताट 250 रुपयांपासून 5001 रुपयांपर्यंत भाविकांच्या माथी मारल्याने भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

येणार्‍या भाविकांसाठी देवस्थानच्यावतीने पाणी, दवाखाना आदी सुविधा देण्यात येत होत्या. देवस्थानच्यावतीने नियोजन चांगले करण्यात आले होते. झिम्बाब्वे येथील उद्योगपती जयेश शाह यांनी होमहवन व पूजन करून येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

शनिशिंगणापूर येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाविकांचे देवस्थानच्यावतीने सरचिटणीस दीपक दरंदले, चिटणीस अप्पासाहेब शेटे, विश्वस्त शालिनी लांडे, राजेंद्र लांडे, उपव्यवस्थापक अनिल दरंदले, कोषाध्यक्ष योगेश बानकर, शालिनी लांडे, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी स्वागत केलेे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  हरियाणा राज्याचे उद्योगमंत्री विपुल गोयल यांच्यावतीने शनिभक्तांना बर्फीची एक हजार पाकिटे व एक हजार शनिभक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आल्याची माहिती ठेकेदार उदय पालवे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*