अधिकारी व विश्‍वस्त मंडळाच्या उपस्थितीत शनीअमावास्या यात्रेचे नियोजन

0

तीन ठिकाणी वाहनतळ उभारणी; वाहनतळापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 10 बसेसची व्यवस्था

सोनई (वार्ताहर)- उद्या शनिवार 18 नोव्हेंबर रोजी शनीअमावास्या असल्याने श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथे अमावास्या पर्वकाळात शनिदर्शनासाठी भाविक येणार असून नेहमीप्रमाणे मोठी यात्रा भरणार असल्याने शासकीय अधिकारी व देवस्थान विश्‍वस्त मंडळ, खातेप्रमुख यांची एकत्रित नियोजन बैठक काल गुरुवारी पार पडली.
शनिअमावास्या पर्वकाळ शुक्रवार 17 नोव्हेंबरचे दुपारी 3.29 पासून प्रारंभ होणार असून शनिवार 18 चा पूर्ण दिवस व सायंकाळी 5.11 वाजेपर्यंत अमावास्या पर्वकाळ आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून ही पहिलीच फुलटाईम अमावास्या असल्याने व भाविकांत अमावास्या पर्वकाळातच शनीदर्शन घेण्याची भावना असल्याने देश व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून 7 ते 8 लाख भाविक शनीदर्शनासाठी येतील असा अंदाज असल्याने नियोजन बैठक घेण्यात आली.
प्रांताधिकारी श्रीमती आंबेकर, तहसीलदार उमेश पाटील, शिंगणापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती राऊत, देवस्थानचे कोषाध्यक्ष योगेश बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे, विश्‍वस्त आदिनाथ शेटे, सौ. शालिनी लांडे, डॉ. रावसाहेब बानकर, भागवत बानकर, सहाय्यक कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, उपव्यवस्थापक अनिल दरंदले, तांत्रिक अधिकारी नितीन शेटे व विभागप्रमुख या नियोजन बैठकीस उपस्थित होते. बैठकीत कायदा व सुव्यवस्था, रस्ते, वीज, एसटी, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्थापन आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीतील निर्णयानुसार मुळा कारखाना गाडीतळ, शिंगणापूर कमानीजवळ एक किलोमीटर, शनैश्‍वर ग्रामीण रुग्णालय अशा तीन ठिकाणी वाहनतळ उभारण्यात येणार असून तेथून शनी मंदिरापर्यंत जागेसाठी दहा एसटी बसेस सकाळी 8 ते रात्री 8 असे सतत 12 तास वाहनळ ते मंदिरापर्यंत नेणार असल्याचे असल्याचे नेवासा आगारप्रमुख सुरेश देवकर यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी देवस्थानचे 80 सुरक्षा गार्ड, खासगी सुरक्षारक्षक अहमदनगरचे 30 व पुण्याचे 20, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 20 पोलीस अधिकारी व दिडशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता महाआरती होणार आहे. सर्व भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या अध्यक्षा सौ. अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर व विश्‍वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

लटकू व खासगी गाळेधारकांना पर्वणी –
नेहमी होणार्‍या शनीअमावास्या यात्रा काळाचा अनुभव बघता शनीदर्शन हा भाविकांना पर्वकाळ असतो. परंतु भाविकांची वाहने हेरून ठराविक पूजा साहित्य दुकानात नेण्यासाठी शेकडो लटकू दररोज राहुरी-सोनई-शिंगणापूर रस्त्यावर कार्यरत असतात. आणि मोठी यात्रा हा लटकू व खासगी गाळेधारकांना पर्वकाळ ठरतो. कारण हे लोक भाविकांना मनमानी भावाने पूजा साहित्य, नारळ, तेल अव्वाचेसव्वा दराने मन मानेल त्या किंमतीत विकतात. पैसे कमी म्हटल्यास दादागिरीही केली जाते. वाहनतळापासून खासगी रिक्षा उभ्या करून भाविकांना शिंगणापूरपर्यंत नेले जाते. त्या जागी ड्युटीवर असलेल्या पोलीस दादांनाही लटकू मॅनेज करतात. अशी खुलेआम चर्चा दर यात्रेला होत असते. परंतु खासगी पार्किंग, गाळेधारक या सर्व लटकूंना ‘अभय’ देत असल्याने पोलिसांचे ‘भय’ उरत नाही. किमान यात्रा काळात तरी भाविकांची जास्त पैसे घेऊन लुबाडणूक होऊ नये अशी भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*