तिसर्‍या श्रावणी शनिवारनिमित्त शिंगणापुरात 4 लाख भाविकांचे दर्शन

0
शनिशिंगणापूर (वार्ताहर)- श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे तिसर्‍या श्रावणी शनिवारनिमित्त तसेच सलग सुट्ट्यांमुळे विविध मान्यवरांसह सुमारे 4 लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावल्याने मिनी शनिअमावास्येसारखे वातावरण निर्माण झाले होते.
अचानक वाढलेल्या गर्दीचे नियोजन करताना शनैश्‍वर देवस्थान सुरक्षा व्यवस्था व पोलीस कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागली. शनिदर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भक्तांनी पहाटेपासून येणार्‍या शनिभक्तांसाठी साबुदाणा खिचडी वाटपाचे नियोजन केले होते. त्याचबरोबर श्रावण मासातील भंडाराच्या रुपाने अन्नदान करणार्‍या अनेक शनिभक्तांनी दिवसभर अन्नदान केले.
शुक्रवार मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यातील पायी वारी करणारे शनिभक्त व दुरवरुन येणार्‍यीा शनिभक्तांच्या वाहनांनी मंदिर परिसराकडे येणारे सर्व रस्ते शनिभक्तांनी फुलून गेले होते. पोलीस ठाण्यापासून घोडेगाव रोड सर्कलपर्यंत मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करुन पुजा साहित्यासह मका कणीस, काकडी, भुईमूग शेंगा, पाणीपुरी, केळी, नारळपाणी, वडापाव, चहा, पेढा आदी खाद्य पदार्थांच्या हातगाड्या लावून व्यापारी आपल्या मालाची विक्री करताना दिसून आले. यामुळे रोडवरुन पायी चालणारे शनिभक्त, मोटारसायकली, गाड्या, बस व इतर वाहनांमुळे नेहमीसारखी वाहतूक कोंडी होत होती.
ग्रामपंचायतच्या करनाक्यापासून लटकुंची शनिभक्तांच्या गाड्या अडविण्यास सुरुवात होते. चारचाकी गाड्यांच्या समोर मोटारसायकली आडव्या लावून वाहतुकीची कोंडी करत विशिष्ट गाळ्यांकडे भाविकांच्या गाड्या वळवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या समोर करत असतात. त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. याच माध्यमातून भाविकांची लूट होते व पर्यायाने भाविकांना मनःस्ताप सहन करावा लागतो.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या श्रीमती माया चिंतामन इवंते यांचा सन्मान विश्‍वस्त शालिनी लांडे यांच्या हस्ते करण्यात आला. सायंकाळची महाआरती उद्योगपती अशोक जिंदाल यांचे हस्ते करण्यात आली.
दिवसभरात अनेक व्हीआयपींनी भेट देवून शनिदेवाचे दर्शन घेतले. सर्व मान्यवरांचा देवस्थानच्यावतीने सरचिटणीस दिपक दरंदले, कोषाध्यक्ष योगेश बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे, माजी अध्यक्ष दादासाहेब दरंदले, पत्रकार शांतादेवी गणेश भूतकर, उपव्यवस्थापक अनिल दरंदले, माजी विश्‍वस्त नितीन शेटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षाधिकारी एस. एच. गायवले लक्ष ठेवून होते.

देवस्थान परिसरात शनिभक्तांना अडवून 10 ते 15 वर्षे वयोगटातील गाईड मुले ज्यांना शनिदेवाच्या पुजेबद्दल काहीच माहिती नसताना पुजा साहित्याची कशी विल्हेवाट लावायची याची चुकीची माहिती दूरवरुन आलेल्या शनिभक्तांना देताना परिसरातील शनिभक्तांनी पकडून चुकीचा सल्ला देवू नका शनिभक्तांना भ्रमीत करु नका असे सांगितले.

मुळा कारखाना गेटजवळ मुळा कारखाना परिसर युवकांच्यावतीने सार्वजनिक खिचडी वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी शनिभक्तांना 300 किलो साबुदाणा खिचडी, 100 किलो नायलॉन चिवडा, 500 डझन केळी व 200 किलो काकडीचे वाटप करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*