जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्या – शालिनीताई विखे

jalgaon-digital
2 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

माती इतके श्रेष्ठ दुसरे काहीच नाही. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या भूमीचे महत्त्व संतांनी अनेक दाखले देऊन सांगितले आहे.

आपण सणसूद साजरे करतो. यात देखील प्राणी, पिके आणि मृदा यांचेच पूजन केले जाते म्हणून जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

त्या कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि कृषि विभाग राहाता यांचे संयुक्त विद्यमाने राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथील कृषिभूषण बन्सी तांबे यांच्या वस्तीवर जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित शेतकरी चर्चासत्रात बोलत होत्या.

याप्रसंगी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, अब्बास पटेल, रामभाऊ कोठुळे, उज्ज्वला तांबे, कृषी अधिकारी नारायण लोळगे, सागर क्षिरसागर, सचिन गायकवाड तसेच आत्माचे व्यवस्थापक किशोर कडू, राजदत्त गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. विखे पाटील पुढे म्हणाल्या की, शेतकरी उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयोग करतात. जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. आज काही ठिकाणी भाजीपाला फळांवर भरमसाठ विषारी औषधे वापरली जातात.

याचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. म्हणून शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे. जनसेवा फाऊंडेशन मार्फत अनेक उपक्रम महिलांसाठी राबवले जात आहेत. यातून महिलांना रोजगार निर्माण होत आहे. संस्थेचे भविष्यातही अनेक योजना राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

प्रारंभी केंद्राचे मृदविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे यांनी मृदा दिनाचे महत्त्व सांगितले. चंद्रपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या दोन पुरुष आणि एका महिला बचत गटाचे स्वागत करण्यात आले. शेवटी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन विस्तार शास्त्रज्ञ सुनील बोरुडे यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *