माध्यमिक शिक्षक सोसायटीचा कारभार सभासदहित जोपासणारा : शालिनीताई विखे

0
पारितोषिक व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोणत्याही आर्थिक संस्थेच्या वाटचालीत सभासद हिताचा कारभार करताना पारदर्शीपणा व संस्थाचालकांचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे कामकाज अशाच पध्दतीने उत्कृष्ट चालू आहे. संस्थेच्या विविध योजना आदर्शवत आहेत. शिक्षकांनी चांगल्या पध्दतीने चालवलेली सोसायटी म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नाव घेता येईल. याच पध्दतीने शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्याचे कामही अतिशय तळमळीने केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्यावतीने सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ सोसायटीच्या सभागृहात पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून शालिनीताई विखे बोलत होत्या.

यावेळी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे, सोसायटीचे माजी संचालक सुभाष कडलग, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सोसायटीचे ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, अध्यक्ष किशोर जाधव, उपाध्यक्ष सुरेश मिसाळ, सेक्रेटरी सोन्याबापू सोनवणे, संचालक सुनील काकडे, उत्तम खुळे, अंबादास राजळे, बाबासाहेब बोडखे, सय्यद हुसेन आदी उपस्थित होते.

यावेळी दीपलक्ष्मी म्हसे म्हणाल्या, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीने नुकताच अमृतमहोत्सव साजरा केला आहे. 56 सभासदांपासून सुरू झालेला या संस्थेचा प्रवास आज 11 हजार सभासदांपर्यंत पोहचला आहे. मागील 20 वर्षांपासून प्रा. कचरे सोसायटीचा कारभार पाहत असून त्यांनी अतिशय नेटकेपणाने कारभार करून शिक्षकांसाठी या संस्थेला कामधेनू बनवले आहे. सोसायटीच्या अनेक योजना आदर्शवत असून कन्यादान योजना राबवून मुलींसाठी करण्यात येणारे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

प्रा. सुभाष कडलग म्हणाले, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात संधी असूनही नगर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळू शकले नाही. सन 2006 मध्ये प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्याविरोधात उमेदवारी करून चूक केली अशी स्पष्ट कबुली देतो. अन्यथा त्याचवेळी कचरे आमदार झाले असते. आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी सर्वांनी प्रा.कचरे यांनाच बळ देऊन मागच्या सारखी चूक कोणीही करू नये, असे आवाहन कडलग यांनी केले.

माध्यमिक शिक्षक सोसायटीचे राजेंद्र लांडे म्हणाले, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नगर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळणे गरजेचे बनले आहे. जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळत असल्यास सहकार्याची तयारी आहे.
प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष किशोर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन संचालक धनंजय म्हस्के व कल्याण ठोंबरे यांनी केले. उपाध्यक्ष सुरेश मिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक, सभासद व त्यांचे पाल्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*