शहाद्यातील परिस्थिती पूर्वपदावर

0
नरेंद्र बागले,शहादा । दि.16 – पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या हत्येेनंतर झालेली जाळपोळ व दंगलीनंतर शहरातील परिस्थिति पूर्व पदावर येत असून व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत.
मात्र गरीब नवाज कॉलनीत अजूनही सन्नाटा असून तणाव आहे. दरम्यान, जाळपोळ झालेल्या घरांची व मलमत्तेच्या नुकसनीचे पंचनामे करण्याचे काम पोलिस प्रशासनकडून सुरु झाले आहे.
येथील एमआयएमचे नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती सद्दाम तेली यांच्या हत्येनंतर खेतिया रोड परिसर व गरीब नवाज परिसरात उसळलेल्या दंगलीत अनेक घरांची व् दुकानांची जाळपोळ करण्यात आली.
समजकंटकांनी तेली यांच्या हत्येस कारणीभूत असलेल्या संशयिताच्या घरांमधील संसारपयोगी वस्तु, रोख रक्कम व मौल्यवान वस्तुंची लूटमार करुन जाळून टाकल्या.
अनेक दुकांनाही जाळून टाकण्यात आल्या. समजकंटकांच्या उद्रेकात ज्यांचा घटनेशी काही संबंध नाही अशा लोकांची घरेही जाळण्यात आली.

आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या घरांच्या केवळ सांगडा उरला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर वेठीस धरले गेले असून शहरात अघोषित संचारबंदीची परिस्थिती उद्भवली होती.

सर्वत्र तणाव व दहशतीचे वातावरण पसरले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हयातून मोठा फौजफटा तैनात करण्यात आला. दरम्यान, मयत सद्दाम तेली यांच्यावर काल दि. 15 रोजी सायंकाळी 5वाजता दफन विधी करण्यात आला.

तणाव कमी होण्यास सुरुवात झाली तरीही संभाव्य धोका पाहून पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे हेदेखील रात्री शहाद्यात तळ ठोकून होते.

शहरात रात्री कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे आज शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत.

मात्र ज्या परिसरात घटना घडली त्या मुस्लिमबहुल वसाहत असलेल्या गरीब नवाज कॉलनी परिसरात अजूनही सन्नाटा व तणावपूर्ण शांतता आहे.

या परिसरात अजूनही दुकाने बंदच आहेत. पोलिस प्रशासनाकडून या परिसरात महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकीकडे शहरातील परिस्थिती पूर्व पदावर येत आहे तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडून समाजकंटकांच्या उद्रेकात जाळपोळ झालेल्या घरांचे, दुकानांचे, वाहनांचे नुकसनीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे.

या दंगलीत अनेक दुकाने व 10 ते15 घरांना जाळून टाकण्यात आल्या आहेत. घरे जाळतांना पेट्रोलचा वापर झाल्यामुळे संपूर्ण घरे व दुकाने भस्मसात झाली आहेत.

ज्यांचा दंगलीशी संबध नाही, अशांची घरेही उध्वस्त करण्यात आल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. तेली हत्त्याप्रकरणातील संशयतांची घरे बेचिराख झाल्यामुळे पोलिसांना पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान या दंगलीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बेचिराख घराची दूरवस्था
सद्दाम तेली हत्त्या प्रकरणी समजकंटकांनी संशयितांची घरांमधील सामानांची लूट करुन घरे जाळून टाकली. आगीत घरे पूर्णतः बेचिराख झाल्याने घरांची केवळ सांगाडा उरला आहे.

ज्या घरांमध्ये घटनेपूर्वी लहान मुले व अबालवृद्ध वावरत होते तीच घरे आता निर्मनुष्य झाली असून या घरांचा ताबा आता बकर्‍या व कुत्र्यांनी घेतला आहे. या घरांची अवस्था पाहून सारेच अवाक् होत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*