तहसील, पोलीस ठाण्याच्या इमारतींचे उद्घाटन

0
शहादा । ता.प्र.- सर्वसामान्य जनतेच्या विकासाशी निगडित बाबींना सरकार प्राधान्य देत आहे. त्यामुळे जिल्हा विकासाचा वेग वाढत असला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावी होताना दिसत नाही.

निधी किती आला त्यापेक्षा त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. कारण सरकार हे जनतेचे असून सरकारी अधिकारी जनतेचे सेवक आहेत, याचे भान असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पर्यटन व रोजगार हमी मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी केले.

शहादा येथील नूतन तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन इमारतीच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ना.रावल बोलत होते. याप्रसंगी आ.उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक संजय पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील,

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोराडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जि.प.सदस्य रामचंद्र पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, उपविभागीय पोलिस अधिकारी महारू पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एस.कादरी, भाजपा अध्यक्ष डॉ.किशोर पाटील, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, नायब तहसीलदार उल्लास देवरे आदी उपस्थित होते.

शहराच्या वाढत्या विस्तारासोबत सर्वसामान्य जनतेसाठी तहसील व पोलिस स्टेशनचया नूतन इमारती समर्पित करीत असल्याचे सांगून ना.रावल म्हणाले, जिल्यात शहादा प्रगतीशील शहर असून भविष्यकालीन दूरदृष्टी ठेवून जनतेच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडित या वास्तू उभारण्यात आल्या आहेत.

कारण या शहराची विकासाची संस्कृती आणि राजकीय कल्चर जिल्हयात वेगळे स्थान राखून आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण विकासासाठी आणि विकासकामांचा वेग उंचावण्यासाठी शासकीय पातळीवर प्राधान्याने प्रयत्न होत असताना प्रशासनाने अधिक गतिमान होणे आवश्यक आहे जिल्हयाच्या विकासाचा आलेख वाढता ठेवण्यासाठी निधी मोठ्याप्रमाणात दिला जात असताना त्याची अंमलबजावणी मात्र धिम्यापद्धतीने सुरु आहे. कामांना विलंब झाला तर त्याचे नुकसान अधिकार्‍यांचे न होता सरकारचे पर्यायाने त्यामधील घटकांचेच अधिक होते म्हणून सामान्य जनतेशी निगडीत विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सांगितले.

आ.उदेसिंग पाडवी यांनी तहसिल कार्यालय मिनी मंत्रालय तर पोलिस स्टेशन न्यायदेवतेचे मंदिर असल्याचे सांगून सामान्य माणूस पोलिस स्टेशनला माणसावर नव्हे तर खाकी वर्दीवर विश्वास ठेवून जातो त्याला योग्य न्याय देण्याचे काम चोखपणे झाले पाहिजे. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी प्रास्तविकातून म्हणाले की शहराची गरज खर्‍याअर्थाने पूर्ण होत आहे.

प्रशासन गतिमान होत असून लोकसहभागाचे तंत्रही वाढत असल्याने जलयुक्त शिवार यासारख्या लोकचळवळीतून लोकाभिमुख प्रशासन जनतेच्या जवळ येत आहे. आभार तहसीलदार मनोज खैरनार यांनी मानले.

LEAVE A REPLY

*