पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच शहाद्यातील घटना घडली – एमआयएमचे आ.जलील

0
शहादा । दि.15 । ता.प्र. – पाणी भरण्यावरून झालेल्या वादात सद्दाम तेली याचा कुठेली संबंध नसतांना कट रचून त्याची हत्या करण्यात आली.
या घटनेतील आरोपी अजूनही मोकाटच असून त्यांना तत्काळ अटक झाली पाहीजे, अशी मागणी करीत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार्‍यांना पोलीस अभय का देतात? असा सवाल एमआयएमचे औरंगाबाद येथील आमदार इमतियाज जलील यांनी पोलीस अधिक्षक राजेंंद्र डहाळे यांना केला.
पोलीसांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवीत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळेच ही घटना घडल्याचा आरोपही पोलीस अधिक्षकांसमोर केला.
पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या धुमश्चक्रीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाहण्यासाठी गेलेल्या एमआयएमचे नगरसेवक सद्दाम तेली यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
या घटनेची माहिती घेण्यासाठी एमआयएमचे औरंगाबाद येथील आमदार इम्तीयाज जलील शहाद्यात सकाळपासून तळ ठोकून आहेत.

त्यांच्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सैय्यद मोईल, औरंगाबाद मनपाचे विरोधी पक्षनेता फिरोजखान आले आहेत. यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे व प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची भेट घेवून दोषींवर कारवाई करण्याबाबत माहिती जाणून घेत होते.

पोलीस अधिक्षकांशी बोलतांना आ.इम्तेयाज जलील म्हणाले की, पालिकेच्या झालेल्या निवडणूकीपासून वाद सरू होता. अनेकवेळा वाद होऊनही पोलीसांनी आरोपींना मोकाट सोडले आहे.

कालच्या भांडणातही सद्दाम तेली यांचा संबंध नसतांना कट रचून हत्या करण्यात आली. पोलीसांनी यापूर्वीच खबरदारी घेतली असती तर ही घटना टाळता आली असती.

पण तसे घडले नाही ही दुर्दैवी बाब आहे. पोलीसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आ.जलील म्हणाले की, पालिका निवडणूकीत सद्दाम तेलीने अर्ज भरला त्यावेळी त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांसदर्भात पोलीसांनी त्यास तडीपारची नोटीस दिली.

मात्र, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना तडीपार का केले गेले नाही? असा सवाल करून आरोपींशी पोलीसांचे साटेलोटे तर नाही ना? असा आरोपही पोलीस अधिक्षकांसमोर केला.

राजकीय वाद तात्पुरता असावा मात्र, खुन्नस ठेवून गुन्हा घडवून कायद्याला आव्हान देणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

सीसीटीव्ही कॅमेरा, पोलीसांदेखत खुनासारखा गुन्हा घडत असेल तर कायदा, सुव्यवस्था आहे कुठे? असा सवाल करीत अशा गुन्हेगारांचा पोलीस बंदोबस्त करणार नसेल तर आम्ही त्यांना आमचा हिसका दाखवतो असा ईशाराही दिला.

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याचे आ.जलील यांनी एस.पी.ंना सांगितले.

दरम्यान, पोलीस अधिक्षकांशी चर्चा सुरू असतांना आ.इम्तेयाज जलील यांच्याशी एमआयएमचे सर्वेसर्वा खा.ओवेशी यांनी मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधिक्षक डहाळे यांच्याशीही त्यांनी चर्चा करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे सांगितले.

दरम्यान, पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे व प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी आ.जलील यांच्यासह शिष्टमंडळाला घटनेतील सर्व दोषींना अटक केली जाईल, कोणीही मोकाट सुटणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले.

 

LEAVE A REPLY

*