दीपक पाटील यांचा भाजपात प्रवेश निश्चित
Share
शहादा | ता.प्र.-
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. सत्तेच्या प्रवाहात राहिले तर विकास कामांना अधिक चालना मिळते. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेच्या प्रवाहात असलेल्या भाजपासोबत दीपक पाटील यांनी गेले पाहिजे असा सूर कार्यकर्त्यांनी एकमुखाने आवळल्याने पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान कार्यकर्त्यांशी हितगूज करताना पाटील म्हणाले, मी कार्यकर्त्यांसोबत असून परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. कार्यकर्तेच माझी खरी ताकत आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावरच मी मोठा असल्याने पदाची कधी अपेक्षा करीत नाही. कार्यकर्त्यांच्या निर्णयाच्या मी आदर करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
येथील सातपुडा कारखान्याच्या आवारात भविष्याच्या राजकीय वाटचालीबाबत विचार विनिमय करण्या
साठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात कारखान्याचे व्हॉ.चेअरमन प्रेमसिंग आहेर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, बापूजी जगदेव, आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जि.प.सदस्य सुनील चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, विजय विठ्ठल पाटील, सुपडू भोई, पुरुषोत्तम पतसंस्थेचे चेअरमन सुनील पाटील, किशोर मोरे, ज्येष्ठ संचालक माधव पाटील, रवींद्र रावल, आत्माराम बागले, रेशमाबाई दुरंगी, नगरसेवक प्रा.मकरंद पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर.पाटील आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होताच कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी सत्तेच्या प्रवाहात असलेल्या भाजपासोबत गेले पाहिजे असा सूर आवळला.