उन्हाचा चटका अर्थकारणालाही!

उन्हाचा चटका अर्थकारणालाही!

यावर्षी जाणवणार्‍या तीव्र उन्हाळ्याचा मोठा आर्थिक फटका शेतीला आणि दैनंदिन व्यवहाराला बसत आहे. वीज कपातीला तोंड द्यावे लागत आहे. वीजेअभावी कारखाने अनेकदा पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, परिणामी उत्पादकता कमी होते. उत्पादनांच्या किमती वाढू शकतात किंवा त्या वस्तूंच्या विक्रीतून कंपन्यांना होणारा फायदा घटू शकतो. यामुळे एकूणच आर्थिक नियोजनाला मोठा फटका बसणार आहे.

भारत आणि पकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोन्ही देश कडक उन्हाळ्याच्या फटक्याने अक्षरशः बेजार झाले आहेत. भारतातल्या अनेक भागामध्ये सध्या विजेचे संकट निर्माण झाले आहे. कोळसा उपलब्ध नसणे आणि त्याच्या नियोजन-वितरणातील दोष, राज्य सरकारचा गलथानपणा यामुळे हे संकट तीव्र बनले आहे. विशेषतः उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागात ‘पॉवर कट’ची परिस्थिती असल्यामुळे हा उन्हाळा अधिक दुष्कर वाटायला लागला आहे. एकूणच उन्हाळ्याच्या दिवसांत प्रचंड उन्हाळा, पावसाळ्यात प्रचंड पाऊस तर हिवाळ्यात कडक थंडी अशा प्रकारच्या वातावरणाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. ही पर्यावरणीय विषमता, उद्योगधंदे, शेती व्यवसाय आणि आरोग्य यासाठी हानिकारक आहे.

भारताच्या बहुतांश कानाकोपर्‍यामध्ये सध्या 40 ते 45 डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड तापमान अनुभवायला मिळत आहे. यातले वैशिष्ट्य म्हणजे पारा मार्च महिन्यामध्येच 40 च्या वर गेला. हिवाळा ते उन्हाळा असे संथ संक्रमण आपल्याला यंदा पाहायला मिळाले नाही. पडदा पडावा तसा हिवाळा खटकन संपला आणि दुसर्‍या दिवशी कडक उन्हाळा सुरू झाला. वातावरण बदलाचे हे एक नवीन चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. तापमान प्रचंड वाढले की आपल्याकडे पाऊस पडतो आणि जमीन आणि हवामान थंड होते. परंतु सध्या भारतात कुठेही ढग जमलेत, असे दिसत नाही. त्यामुळे सूर्याची उष्णता थेट जमिनीवर आणि जनमानसावर पडत आहे. त्यामुळे जिणे अतिशय दुष्कर होऊन गेले आहे. त्याचा परिणाम म्हणून ओरिसामध्ये शाळा बंद करण्यात आल्या. पश्चिम बंगालमध्ये- देखील काही ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्याचा परिणाम सर्वांच्या तब्बेतीवर व्हायला लागला आहे. त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवरदेखील झालेला दिसतो.

इतके दाहक भीषण चित्र आता हवामानाच्या बाबतीत आपल्याकडे घडतेय. लक्षात घ्या, याच काळामध्ये पावसाळ्यापूर्वी जमीन तयार करण्यासाठी शेतकर्‍यांना उन्हातान्हात अक्षरशः 40-45 डिग्रीमध्ये तासन्तास राबावे लागते. त्याच उन्हाच्या कडाक्यात अनेक शेतकर्‍यांच्या तब्बेती बिघडतात. अतिसार आणि निर्जलीकरण अशा व्याधींना बळी पडावे लागण्याचा हाच काळ. याकाळात आणखी एक गोष्ट बहुतांशी वेळा खेडेगावात, जंगलात दिसते, ती म्हणजे जंगलामध्ये आगी लागण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. हे सगळे अचानक घडतेय का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. वातावरण बदलाचे किंवा जागतिक तापमानवाढीचे अहवाल काढून बघा, त्या प्रत्येक अहवालात हा धोका वर्तवण्यात आला होता. दरवर्षी आपण तापमानवाढीचे उच्चांक पाहतोय. कधी 120 वर्षांमधला सर्वात कडक उन्हाळा तर कधी शंभर वर्षांमधला सर्वात भीषण पाऊस तर कधी 80 वर्षांमधली सर्वात जोरदार थंडी या सर्वाला आपण तोंड देतोय. सध्या आपण अनुभवत असलेल्या उन्हाळ्याची तीव्रता गेले अनेक आठवडे कमी झालेली नाही. ज्याला आपण उष्णतेच्या लाटा म्हणतो, ती परिस्थिती आपल्याकडे सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या सुरुवातीला येईल, असे जाहीर केले गेले होते. परंतु यावेळी मार्च महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यातच उष्णतेच्या अशा लाटा आल्या. या सगळ्यावरून पर्यावरण बदलाची तीव्रता आपल्या लक्षात येईल.

उन्हाचा चटका अर्थकारणालाही!
पुत्र वियोगाचा, शोक अनावर झाला, मातेनेही आपुला, प्राण मग त्यागला.!

एकूणच हवामानाचा एक पॅटर्न ठरलेला आहे. समुद्राचे गरम पाणी पॅसिफीकमधून भारताकडे यायला सुरुवात होते. त्यातून गरम वार्‍याच्या दिशा या भारताकडे येतात. गरम वार्‍यामुळे संपूर्ण देशभर एक गर्मीचे वातावरण निर्माण होत असते. हा काहीसा तांत्रिक विषय. परंतु हे सर्व आपल्या जीवनाशी, जीवन व्यवहाराशी आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. पर्यावरण बदलामुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम लक्षणीय आहेत. पर्यावरण बदलामुळे होणार्‍या तापमानवाढीचा परिणाम जनावरांबरोबरच मनुष्यावरही होतो. या सगळ्याला इंग्रजीत डिहायड्रेशन (निर्जलीकरण) असे म्हणतात. त्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागतो. म्हणजे घाम येतो पण तो सुकत नाही. त्यामुळे आणखी भीषण परिस्थिती उद्भवते. गेले काही दिवस मी अमरावती, अचलपूर, नागपूर या भागात एका शोध समितीचा प्रमुख म्हणून काम करत होतो. यापूर्वीदेखील ऐन उन्हाळ्यात मी विदर्भात आलो आहे. पण यावेळी काहीतरी वेगळे होते. असे जाणवले की, रात्रीचे तापमानदेखील थंड होत नाही. त्यामुळे शरीराचे आणि जमिनीचे तापमानही कमी होताना दिसत नाही. जमिनीचे तापमान दिवसा जसे असते तसेच रात्रीदेखील जाणवते. रात्री जमीन थंडच होत नाही. या सगळ्याशी आपला जीवन व्यवहार जुळवून कसा घ्यायचा हा खरा सवाल आहे. त्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे. याचे कारण आपल्या भविष्याचा आणि वर्तमानाचा तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या अनुषंगाने आणखी एका विषयाकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. या तापमानवाढीचे काही भीषण आर्थिक परिणाम संभवतात.

एक तर तापमानवाढीमुळे यावर्षीचा उन्हाळा आपल्याकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच आला. त्यामुळे हिवाळा ते उन्हाळा हे संक्रमण झालेच नाही. त्याचा फार मोठा आर्थिक फटका आमच्या शेतीला आणि जीवन व्यवहाराला बसला. त्यामुळेच गेल्या दशकातला नव्हे तर गेल्या जवळपास 38 वर्षांमधला हा सर्वात तीव्र उन्हाळा आहे, असे हवामान खात्याने जाहीर केले. त्यात पुन्हा आपल्याकडे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे या उष्णतेच्या लाटेचे दुष्पपरिणाम अधिक काळ आणि अधिक तीव्रतेने जाणवतात. त्यामुळेच आपल्याला वीज कपातीला तोंड द्यावे लागत आहे. वीज नसल्यामुळे कारखाने चालत नाहीत, कारखाने चालत नाहीत म्हणून उत्पादकता कमी, उत्पादकता कमी राहिल्यामुळे तयार होणार्‍या वस्तूंच्या किमती अनाठायी वाढणार आहेत किंवा त्या वस्तूंच्या विक्रीतून कंपन्यांना होणारा फायदा घटणार आहे. नफा कमी झाल्यामुळे त्यांच्या एकूणच आर्थिक नियोजनाला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळी दुकाने शटर संपूर्ण किंवा अर्ध खाली करून बंदच राहतात. त्यामुळे तिथले खरेदी-विक्रीचे व्यवहार नीट होत नाहीत. दुपारच्या वेळी शेतीची कामे जवळपास किंवा अत्यंत थंडावलेली असतात. त्यामुळे त्याचीदेखील उत्पादकता कमी झालेली असते. लक्षात घ्या, आपल्याकडच्या एकूण कामगारांपैकी जवळपास 45 ते 50 टक्के लोकांना रस्त्यावर किंवा शेतामध्ये उतरून काम करावे लागते. त्या सगळ्यांना या प्रचंड उन्हाच्या तडाख्याचा त्रास होतो. म्हणून त्यांच्या केवळ तब्बेतीवर नाही तर उत्पादतेकवरदेखील परिणाम होतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे युक्रेन आणि रशियादरम्यानच्या युद्धामुळे भारताला गहू निर्यातीमध्ये फार मोठी संधी उपलब्ध झाली. परंतु उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की गव्हाच्या अपेक्षित उत्पादनाच्या म्हणजे 122 मिलियन मेट्रिक टनामध्ये सुमारे 15 टक्क्यांनी घट होईल, असा धोक्याचा इशारा कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिला आहे. आपल्याकडे तयार होणार्‍या जिर्‍यासारख्या अनेक मसाल्याच्या पदार्थांनादेखील जोरदार फटका बसतो आहे. त्यांची उत्पादकता 15 टक्क्यांनी कमी होत आहे. 2029 पर्यंत आपण पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्या सगळ्याला अशा गोष्टींमुळे काहीशी खीळ बसते आहे हे नक्की. हे झाले देशपातळीवरचे. सध्या सर्वांनी उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी जे जे करता येईल ते जरूर करावे. उन्हाळा बाधत नाही हे दाखवून द्यावे. यातूनच उन्हामुळे बसणारा आर्थिक फटका टाळता येईल.

Related Stories

No stories found.