अखंड सावळागोंधळ

अखंड  सावळागोंधळ

राज्यातले तीन पक्षांचे सरकार ही जणू तीन पायांची शर्यत आहे. त्यामुळे कोणालाच पळता येत नाही. ना पुढे जाता येते ना मागे फिरता येते. मी पाठीशी आहे, हे वचन शरद पवार यांनी या सरकारला कितीही वेळा दिले तरी पुन्हा पुन्हा हे सरकार पाच वर्षं नक्की टिकेल हे सांगण्याची आवश्यकता का निर्माण होत असावी तर कोणाचाच कोणावर विश्वास नाही म्हणून...!

महाराष्ट्रातले राजकारण दिवसेंदिवस अविश्वासाचे होत आहे, असे जाणवते. एकीकडे वीज कर्मचार्‍यांचा संप तर दुसरीकडे एसटी महामंडळाचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार आणि नित्यनेमाने राजकीय नेत्यांचे एकमेकांवर चाललेले आरोप-प्रत्यारोप म्हणजे शिमगा बरा अशी परिस्थिती वाटते. या सगळ्याचा अर्थ एकच दिसतो की, सरकार स्थानापन्न झाल्यापासून रोज काही ना काही बिघडतच चालले आहे. कधी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या तर कधी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे एकमेकांवर लहान मुलांच्या शाळेत केले जातात तशा प्रकारचे आरोप करताना दिसतात.

बातम्या हा प्रकार तर हास्यास्पद होत आहे. इतक्या गमतीशीर बातम्या माझ्या पन्नास वर्षांच्या माध्यम कारकिर्दीत कधीही पहायला मिळाल्या नाहीत. एक नेता सांगतो की आमदारांना मोफत घरे द्या तर अधिक ताकदवान नेता सांगतो की, असे काही करु नका. अर्थात ते तर खरेच आहे की मुंबईत आयुष्य पणाला लावून काम करणारी लक्षावधी माणसे स्वत:चे घर नसताना या शहरात वावरत आहेत. अशा स्थितीत आमदारांना मोफत घरे देण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. अशा परिस्थितीत दुसरा एक नेता सांगतो की आमच्या पक्षाचेच मुख्यमंत्री असले तरी एकूण निधीवाटपात राष्ट्रवादीला 55 टक्के, काँग्रेसला 27 टक्के तर शिवसेनेच्या वाट्याला केवळ 18 टक्क्यांची खिरापत येत आहे; हे योग्य नाही.

असा सारा प्रकार सरकारच्या विरोधात असून सरकारचे दोन वरिष्ठ मंत्री, ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. दुसरीकडे, वर्षा गायकवाड आणि अस्लम खान हे दोघे तलवारी नाचवण्याच्या गुन्ह्यात अडकले आहेत. नितीन राऊत हे ऊर्जामंत्री वीज संपात अडकलेले तर अनिल परब हे अनेक प्रकारच्या अडचणीत सापडले आहेत. स्वत: मुख्यमंत्री म्हणून वर्कफ्रॉम होम करत आहेत. असा सारा गोंधळ या सरकारचा त्रास वाढवणारा ठरत आहे.

यात भर म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील हे दोन खंदे भाजपा नेते कायम तलवारी उगारुन सरकारवर कशा पद्धतीने मात करता येईल या विचारात गुंतले असल्याचे दिसत आहे. त्यात मग नाना पटोले वेगळ्याच प्रकारची भर घालून सरकारला अडचणीत आणताना दिसत आहेत. या तीन पक्षांचे सरकार ही जणू तीन पायांची शर्यत आहे. त्यामुळे कोणालाच पळता येत नाही, ना पुढे जाता येते ना मागे फिरता येते अशी अवस्था आहे. शरद पवार यांनी या सरकारला पाठीशी राहाण्याचे वचन कितीही वेळा दिले तरी पुन्हा पुन्हा हे सरकार पाच वर्षं नक्की टिकेल हे सांगण्याची आवश्यकता का निर्माण होत असावी, तर कोणाचाच कोणावर विश्वास नाही म्हणून! घणाघाती आरोप करणारे किरीट सोमय्यांसारखे नेते कशाचीही तमा न बाळगता सातत्याने या सरकारमधल्या निम्म्यापेक्षा अधिक मंत्र्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा वारंवार करत आहेत. हे असे किती दिवस चालणार? राज्यपालही सरकारची गोची करत असून महाराष्ट्राच्या राजकारणाचा अधिकाधिक चुथडा होत आहे.

सामान्य माणसाला महागाईने, शाळा प्रवेशातल्या गोंधळाने, दोन वर्षांच्या करोना रोगराईने त्रस्त केले असताना संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचा दररोजचा राजकीय सामना बघण्याची सामान्य माणसाची अजिबात इच्छा नाही. पण कुठलाही राजकीय नेता हा समंजसपणा दाखवताना दिसत नाही. याला कोणताही पक्ष अपवाद नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपही हे सरकार खाली खेचण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करताना दिसत आहे.

या ठिकाणी मांडावासा वाटणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणीही कोर्टात जाऊन आपल्या विरोधकाविरुद्ध अब्रुनुकसानीची फिर्याद करताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे शंभर कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा करायचा असेल तर त्याच्या एक पंचमांश रक्कम म्हणजेच वीस कोटी रुपये (काळे नव्हे तर लख्ख गोरे) कोर्टात अनामत म्हणून ठेवावी लागते. ते कोण ठेवणार? ती ठेवण्याची क्षमता असणारी स्वच्छ चारित्र्याची किती मंडळी राजकारणात आहेत? म्हणूनच तर नुसती दमबाजी सुरू आहे. दोन पहिलवान आखाड्यात उतरतात आणि एकमेकांवर नुसतीच माती टाकत राहतात. पहिल्यांदा पट काढतो त्याला जिंकण्याची शक्यता असते तशीच हरण्याची भीतीही असते. म्हणूनच एक स्पष्टपणे दिसत आहे की जोवर शरद पवार आहेत तोवर या सरकारला डर नाही. पण पक्षांतर्गत मंडळी काय करत आहेत याचा सुगावा शरद पवारांना वारंवार लागत असतो. त्यामुळे त्यांनीही सावध रहाणे गरजेचे आहे.

विरोधी पक्षांनी सरकारला पेन ड्राईव्ह किंवा प्रत्यक्ष संगणकांच्या मार्गानेही घेरण्याचा प्रयत्न केला तरी या सरकारमधले खुद्द अजितदादा, जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ ही राष्ट्रवादीची नाणी खणखणाट करणारी आहेत. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण अशी काही मंडळी विरोधी पक्षीयांशी ताकदीने लढणारी आहेत. कारण हे सगळे नेते राजकारणात आपले श्रेठत्व सिद्ध करणारे आहेत. या सगळ्या प्रकारात सरकारला सातत्याने घेरले जात आहे. पण शरद पवार हे सरकार पाच वर्षं टिकेल असे म्हणतात तेव्हा या गोष्टीची खात्री वाटते की सरकारला घेरण्याचा कितीही प्रयत्न झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा कितीही चुथडा झाला तरी या सरकारला त्यातून बाहेर काढण्याची ताकद शरद पवारांकडे आहे. पण तरीही उद्याच्या राजकारणात नेमके काय दडलेले आहे हे सांगणे खरोखरीचे अवघड असते.

Related Stories

No stories found.