पटवून घेणे गरजेचे

पटवून घेणे गरजेचे

आतापर्यंत पक्षाची बर्‍यापैकी वाट लागली असल्यामुळे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने लोकसभेच्या 370 जागांवर लक्ष्य केंद्रित करण्याची योजना सादर केली आहे. पण ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यांमध्ये पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, असा किशोर यांचा सल्ला आहे. त्यानिमित्ताने...

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधली आगामी विधानसभा निवडणूक तसेच 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महत्त्वाची धोरणात्मक बैठक पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ या निवासस्थानी अलीकडेच पार पडली. या बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकांचा सविस्तर आराखडा मांडला आहे. काँग्रेसने लोकसभेच्या 370 जागांवर लक्ष्य केंद्रित करण्याची योजना किशोर यांनी सादर केली आहे. पण ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यांमध्ये पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात आणि तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काँग्रेसने अन्य पक्षांशी आघाडी करून भाजपला टक्कर द्यावी, असा किशोर यांचा सल्ला आहे.

किशोर हे आकडेवारी समोर घेऊन तसेच मुद्दे आणि पुराव्यांसह मांडणी करतात. अनेक राज्यांमध्ये त्यांच्या रणनीतीला यश मिळाले असून ते पक्षात आल्यास अथवा पक्षात त्यांचे वजन वाढल्यास आपली दुकाने बंद होतील, अशी भीती काँग्रेसमधल्या काही नेत्यांना वाटत आहे. काँग्रेसमध्ये जी-23 गटाने बंडाचे निशाण उगारले असून पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर सोनिया, राहुल, प्रियंका गांधी आणि जी-23 गट यांच्यातला संघर्ष मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे नेतृत्व नव्या पिढीकडे देण्यात चूक झाली, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मध्यंतरी व्यक्त केले. त्यांना हा साक्षात्कार फारच उशिरा झालेला दिसतो. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये गांधी घराण्यातल्या कोणत्याही व्यक्तीची साधी भेटही झालेली नाही आणि भेट झाली तरी आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही, असे उद्गार शिंदे यांनी काढले होते. कोणी त्यांचा उपदेश ऐकूनच घेत नसल्यामुळे त्यांना असे सांगणे भागच आहे. 2019 लोकसभा निवडणुकांमधल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निवडणुकांचा कोणताही अनुभव नसणार्‍यांच्या कंपूने राहुल गांधींना घेरले असून पक्षाला वाचवण्यासाठी काही स्पष्ट सूचना देणार्‍या ज्येष्ठांना बाजूला सारले गेले, अशी कठोर टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती पी. जी. कुरियन यांनी केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून भाजपप्रमाणे काँग्रेससाठीही त्या प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. मात्र गुजरात काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाला आहे. लेवा पाटीदार समाजातले प्रभावी नेते नरेश पटेल यांना काँग्रेसमध्ये आणून गुजरातमध्ये पक्षाचा प्रमुख चेहरा घोषित करण्याची सूचना प्रशांत किशोर यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बरोबर एक वर्षापूर्वी गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर हार्दिक यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याच वेळी ‘गुजरातमध्ये काँग्रेसकडून माझ्या नेतृत्वाला योग्य संधी दिली गेली नाही, पालिका निवडणुकीसाठी माझी एकही सभा घेतली गेली नाही, मला प्रचारासाठी कोणीही बोलावले नाही’, असा संताप पटेल यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी हार्दिक यांना घेतले जाईल आणि ते हातावर घड्याळ बांधून घेतील, अशी चर्चा सुरू झाली.

त्यावेळी हार्दिक यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचीही भेट घेतली होती. मध्यंतरी गुजरातमध्ये सुरत पालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने लक्षणीय यश मिळवले. पक्षाचे अध्यक्ष आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच गुजरातचा दौरा करून शोभायात्रा काढली तेव्हा त्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये यश मिळवल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुजरातचा दौरा करून विजय यात्रा काढली होती. गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमधल्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी आम आदमी पक्षाला तर काहींनी भाजपला जवळ केले आहे. हार्दिक यांनाही ‘आआपा’चे निमंत्रण होते परंतु त्यांनी ते नाकारल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी त्यांना पक्षाच्या बैठकांना बोलवण्यात येत नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचा सल्लाही घेतला जात नाही. सर्व निर्णय झाल्यानंतरच त्यांना कळतात, अशी अवस्था आहे.

काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये हार्दिक यांनी आपला करिश्मा निर्माण केला होता. पाटीदार समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनांनी गुजरातमध्ये धमाल उडवून दिली होती. त्यानंतर विधानसभेच्या 2017 च्या निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेसच्या प्रचारात सामील झाले. त्यावेळी काँग्रेसची कामगिरी उत्तम झाली होती आणि भाजपच्या तोंडाला फेस आला होता. 2019 मध्ये हार्दिक पटेल यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्याचवेळी त्यांना एका खटल्यात निवडणूक लढवण्यास घालण्यात आलेली बंदी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. त्यामुळे हार्दिक हे विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरू शकतात. परंतु काही कारणामुळे हार्दिक आणि काँग्रेसश्रेष्ठी यांचे जमत असल्याचे दिसून येत नाही. उपेक्षाच करायची होती तर मुळात त्यांना पक्षात घेतलेच का, असा प्रश्न आहे. या स्थितीत आपले शक्तिसामर्थ्य दाखवण्यासाठी हार्दिक पुन्हा पाटीदार आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत. मात्र खरे कारण बघायचे तर त्यांना नरेश पटेल यांच्यामुळे आपली किंमत आणखी कमी होण्याची शक्यता वाटत आहे. काँग्रेसची स्थिती इतकी दारूण असताना दोघाही पटेलांना सांभाळून घेण्याची आणि त्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये निवडणुका होऊन नवा अध्यक्ष निवडला गेल्यास हार्दिक पटेलांना त्याच्याशी चर्चा करून आपल्या समस्या सोडवून घेता येतील. पण काँग्रेसची स्थिती इतकी दयनीय आहे की, आपापसात भांडणे करत राहिले तर सर्वनाश ओढवून घेणे ठरेल, हे निश्चितच अत्यंत दुर्दैवी असेल.

Related Stories

No stories found.