समुपदेशन

समुपदेशन

ज्योत्स्ना पाठील

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

मागील लेखात आपण प्रज्ञाने, प्रथमेशच्या आवडींविषयी लिहिले असता ‘टुरिस्ट गाईड’ या व्यवसायाचे आजच्या काळानुसार बदललेले वेगळे स्वरूप आणि त्यातल्या विविध संधी याविषयी जाणून घेतले. आज आपण ‘मार्गदर्शक’ या व्यवसायाची पुढची पायरी म्हणजेच ‘समुपदेशन’ होय. आज ‘समुपदेशन’ या व्यवसायाची नितांत गरज आहे. आधुनिक काळात माहिती व तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे अनेक गोष्टींचा सामना लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच करावा लागत आहे. त्यामुळे अनेक समस्या समाजातील घटकांना भेडसावत आहेत. अनेकांच्या मनात भीती, न्यूनगंड व हिनतेची भावना बळावत आहे आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अशाप्रकारची भावना बाधा आणण्याचे काम करत असते. समाजात अनेक व्यक्ती नैराश्याने त्रस्त होऊन चुकीचे पाऊल उचलून जीवन संपवतात, तर काहीजण अल्झाइमर, स्किझोफ्रेनिया यासारख्या मनोविकारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे आजच्या समाजाला मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक यांची गरज अधिक प्रमाणात भासू लागली आहे. समुपदेशनाच्या व्यवसायाचे क्षेत्र खूप विस्तारित आहे. व्यावसायिक क्षेत्राबद्दल, विवाहाविषयी, कौटुंबिक, वैयक्तिक समुपदेशन करणे अशा अनेकविध क्षेत्रात समुपदेशन करता येते. अनेक व्यक्तींना शारीरिक अपंगत्व आलेले असते त्यामुळे अशा व्यक्तींना आत्मविश्वासाने जगण्याचे बळ देण्यात समुपदेशकाची भूमिका मोलाची असते. समुपदेशक उत्तम सहकारी असावा, विश्वासू सोबती असवा, त्याचबरोबर तो समाजसेवाही नकळपणे करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, समुपदेशक होण्यासाठी उत्तम संवाद साधणयाची कला अवगत करावी लागते. समोरच्याला बोलते करणे आणि स्वतः श्रोता बनणे आवश्यक असते. समोरच्या व्यक्तीच्या कलाकलाने घेऊन प्रश्न विचारून माहिती संकलित करणे, तिचा निष्कर्ष काढणे व उपाययोजना करणे. या सर्वांचा ताळेबंद साधावा लागतो. समोरच्या व्यक्तीने सांगितलेली माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक असते. समुपदेशक चारित्र्यवान असावा तसेच त्याच्याकडे विनोद बुद्धी असावी. इतरही गुणांची आवश्यकता असावी लागते. तूर्तास तुम्हा मुलांना (मुले-मुली) ‘समुपदेशन’ या करिअरची तोंडओळख करून देणे एवढाच या लेखाचा उद्देश आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळे क्षेत्र निवडून त्यात करिअर व समाजसेवा अशी दुहेरी संधी साधण्याची क्षमता असेल त्यांनी या क्षेत्राचा जरूर विचार करावा. चला तर मग मुलांनो, अभ्यासाबरोबरच विविध व्यवसाय, कोर्सेस यांची माहिती घेऊन स्वतःला अपडेट करत राहा आणि आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. पुन्हा भेटू पुढच्या लेखात एका नवीन विषयासह.

तुमची,

ताई

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com