पंगत बसली अन बुंदी संपली

पंगत बसली अन बुंदी संपली

नुकत्याच 20 जूनला झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने नाथाभाऊंना उमेदवार बनविले. विधानसभेतील आमदारांचे मतदान असल्याने व निवडणूक चुरशीची असल्याने भाऊंनी निवडणूक होईपर्यंत मुंबईतच ठाण मांडले. 29 मते घेऊन ते विजयीदेखील झाले. मात्र, विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागत असतानाच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावत सुरत गाठल्याने विजयी झालेल्या आमदारांना आनंदोत्सवदेखील साजरा करता आला नाही. आता तर सरकारच संकटात असताना नेमकी पंगत बसली अन् बुंदी संपली अशी परिस्थिती निर्माण झाली.

भारतीय जनता पार्टीने अडगडीत टाकलेल्या एकनाथराव खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसने न्याय देण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांपूर्वी नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव दिल्यानंतरही राज्यपालांनी या नावांना मान्यताच दिली नाही.त्यामुळे नुकत्याच 20 जूनला झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने नाथाभाऊंना उमेदवार बनविले. विधानसभेतील आमदारांचे मतदान असल्याने व निवडणूक चुरशीची असल्याने भाऊंनी निवडणूक होईपर्यंत मुंबईतच ठाण मांडले. 29 मते घेऊन ते विजयीदेखील झाले. मात्र, विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागत असतानाच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावत सुरत गाठल्याने विजयी झालेल्या आमदारांना आनंदोत्सवदेखील साजरा करता आला नाही. आता तर सरकारच संकटात असताना नेमकी पंगत बसली अन् बुंदी संपली अशी परिस्थिती निर्माण झाली. यावरच सध्या सोशल मीडियावर याबाबतचे मिम्स व्हायरल होत असल्याने आगामी काळातही खडसेंना संघर्षच करावा लागण्याची चिन्ह आहेत.

2014 मध्ये भाजपाचा गटनेता निवडण्याच्या वेळेपासून नाथाभाऊंनी मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला. मात्र, दिल्लीतूनच देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाल्याने खडसेंना महसूलमंत्री पदावरच समाधान मानावे लागले. परंतु, सरकार स्थापन झाल्यानंतरही आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे त्यांचे पंढरपूरचे संभाषण अडचणीचे ठरले व दीड वर्षातच त्यांना मंत्रिपदावरून पायऊतार व्हावे लागले. गेल्या 30 वर्षांपासून विधानसभेत खान्देशचे प्रतिनिधित्व करणार्‍या नाथाभाऊंना भारतीय पार्टीने 2019 च्या निवडणुकीत बाजूला सारले, शेवटपर्यंत तिकिटाच्या आशेवर असलेल्या भाजपाने त्यांना तिकीट द्यायचे नाही, हे फायनल केलेले असल्याने खडसेंनी शेवटी मुलीला मिळालेल्या तिकिटावर समाधान मानले. दुसरीकडे त्यावेळी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली, राष्ट्रवादीकडून मुक्ताईनगरमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा एबी फार्म घेऊन अजितदादा मुंबईहून निघालेही. परंतु खडसेंचे तळ्यात-मळ्यात पाहून ते पुन्हा मुंबईला परतले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीला पुरस्कृत करीत विजयीदेखील केले. भाजपाकडून न्याय मिळेल या आशेवर त्यांनी दीड वर्ष काढले. मात्र, न्याय तर बाजूलाच; त्यांच्यामागे ईडीची कटकट लागल्याने शेवटी दीड वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेशदेखील झाला. राज्यपाल नियुक्त आमदारकी राज्यपालांनी रोखली, तरीही पवार साहेबांनी विधान परिषदेत नाथाभाऊंना उमेदवारी देण्याची हिंमत दाखवली. पक्षातून विरोध असतानादेखील त्यांनी खडसेंना उमेदवारी दिली. त्याआधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा झालेला पराभव पाहता महाविकास आघाडी सावध होती. त्यामुळे एक-एका मताचे नियोजन करण्यात आले.तरही काँग्रेसला त्याचा फटका बसलाच. भाजपाने आपला पाचवा उमेदवार विजयी केला. राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे, रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर तर भाजपाकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय व प्रसाद लाड विजयी झाले, काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले असले तरी या पराभवाने महाविकास आघाडीला धक्का बसलाच.

असे असले तरी सहा वर्षांचा वनवास संपवून नाथाभाऊंना विजय साजरा करण्याची संधी आली होती. आता आमदार झाल्याने राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपददेखील मिळेल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी जळगाव व जिल्ह्यात मोठ्या विजयोत्सवाची तयारीदेखील झाली होती. मात्र, निकालाच्या रात्रीच शिवसेनेच्या एकनाथाने महाविकास आघाडीला धक्का देत बंड केले.विधानभवनात मतमोजणी सुरु असतांना विरोधीपक्षनेत्यांच्या कॅबिनला देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरकेर,चंद्रकात पाटील यांच्यासह भाजपाचे नेते तर उपमुख्यमंत्री अजिदादांच्या कक्षात एकनाथराव खडसे,जयंत पाटील,रामराजे नाईक निंबाळकर हजर होते.रात्री 10 वाजता भारतीय जनता पार्टीचे राम शिंदे,प्रविण दरेकर,श्रीकांत भारतीय,उमा खापरे,शिवसेनेचे सचिन अहिर,आमशा पाडवी,राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे,रामराजे विजयी झाले.काँग्रेसचे चंद्रकात हंडोरे पहिल्याच फेरीत निवडूण येणे अपेक्षीत असतांना त्यांनी निर्धारीत केलेला 26 मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अर्थात त्यांना 22च मते मिळाल्याने त्यांच्यासह भाई जगताप व भाजपाचे प्रसाद लाड या तिघांचा निकाल बाकी राहिला.

नियमानुसार सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराची दुसर्‍या पसंतीची मते मोजण्यात आली.त्यांना प्रसाद लाड यांना 17,भाई जगताप यांना 19 तर हंडोरेंना 22 मते असल्याने प्रसाद लाड यांची मते मोजण्यात आल्यानेत त्यांनी निर्धारीत कोटा पूर्ण केला.त्यांनतर भाई जगताप यांनी देखील 26 मतांचा कोटा पूर्ण करीत विजय संपादित केला.22 मते घेवूनही हंडोरे पराभूत झाले.विशेष म्हणजे काँग्रेसची हक्काची 44 मते असतांना त्यांच्या पहिल्याच पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचीत आमदार सचिन अहिरच विधानभवनात उपस्थित होते.असे असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय विजनवासात असलेल्या नाथाभाऊंना विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांनी मुंबईसह मुक्ताईनगर पर्यंत विजय साजरा केला. शिवसेनेचे अन्य नेते निडणूक प्रक्रयेत अडकलेले असताना शिवसेनेचे दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार नकोच अशी भूमिका घेत आपला मुक्काम आधी सुरत व आता गुवाहाटीला हलवला. आता तर शिंदेचा गट 50 आमदारांच्या वर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारच संकटात असल्याने खडसेंच्या मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होणे स्वाभाविक आहे.म्हणूनच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पंगत बसली अन् बुंदी संपली या मिम्ससारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.अर्थात विरोधीपक्ष व नाथाभाऊ हे समिकरणच तयार झाले आहे.यासाठी 2014 च्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर स्वर्गीय आर.आर.पाटील यांनी त्यांच्या भाषणात केलेला उल्लेख तंतोतंत लागू पडतो.यावेळी एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनपर भाषणात ते म्हणाले एकनाथ नावाचा जन्मच जणू विरोधीपक्षासाठी झालेला आहे.गेल्यावेळी एकनाथराव खडसे विरोधीपक्षनेते होते.आता ते सरकारमध्ये असले तरी दुसरा एकनाथ या पदावर विराजमान होत आहे. खडसेंनतर शिंदे आले पण एकनाथ मात्र कायम आहे.आता एकनाथराव खडसे विधान परिषदेत विजयी होताच एकनाथ शिंदेंनी बंड करीत राज्यातील खुर्चीलाच सुरंग लावला आहे.उद्या यदाकदाचित सरकार कोसळले तर सेनेचे उरलेले आमदार व काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागेल.त्यामुळे नाथाभाऊ देखील विरोधातच राहणार,भाजपा सत्तेत आली तर विधान परिषदेत दुसर्‍या क्रमांकाचे आमदार राष्ट्रवादीचे असल्याने विरोधीपक्षनेतेपद त्यांच्याकडे येवू शकते,नाथाभाऊंचा विधिमंडळाचा असलेला अनुभव लक्षात घेता व भारतीय जनता पार्टीवर प्रहार करणारा नेता म्हणून त्यांना आक्रमक नेता म्हणून नाथाभाऊंचा त्यांना फायदा होवू शकतो.त्यामुळेे परिषदेतील विरोधीपक्षनेतेपद नाथाभाऊंकडे जाण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे सरकार नसले तरी त्यांचा विधिमंडळात होणारा प्रवेश हाही कमी नाही.तसेही सत्तेचे व नाथाभाऊंचे कधी समिकरण जुळले नाही.कायम विरोधीपक्षात काम करतांना अल्पकाळ सत्तेत होते.त्यामुळे आता जरी सरकार अस्थिर असले तरी नाथाभाऊंनी आपली पुढील तयारी सुरु केली असेल.नाथाभाऊ गेल्या तीन वर्षांपासून विधानभवनापासून लांब होते. त्यांच्या भाषणांमध्ये देखील खंड पडला आहे.अर्थात खडसेंचे सरकारवर तुटुन पडण्याचे कौशल्य पहाता व त्यांना विरोधपक्षनेतेपद मिळाल्यास भाजपाला देखील त्रास सहन करावा लागणार आहे.कारण भाजपाचे नेते आज जे राजकारण करीत आहेत,ते खडसेंकडूनच शिकलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com