Sunday, April 28, 2024
Homeशब्दगंधविश्वचषक समीप आला ; पण...

विश्वचषक समीप आला ; पण…

– नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा महासोहळा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. 2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर देशातील चाहते भारत पुन्हा जगज्जेता होण्याची आस लावून बसले आहेत. मात्र संघ निवडीबाबतचा घोळ अद्याप मिटलेला नाही. भारतीय निवड समिती विश्वचषकासाठीच्या संघाला अंतिम रूप देण्यासाठी 5 सप्टेंबर या शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू इच्छित आहे. या तारखेपर्यंत बुमराहचे चांगले रिपोर्ट येतीलच आणि मिळत आहेत. राहुल आणि श्रेयससमवेतच गोलंदाज कृष्णा याच्याबाबतही स्थिती बर्‍याच प्रमाणात स्पष्ट झालेली असेल. भारतासमोर घोषित संघात बदल करण्यासाठी 27 सप्टेंबरपर्यंत संधी आहे.

- Advertisement -

या काळापर्यंत आशिया चषक संपलेला असेल आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दोन सामनेदेखील झालेले असतील. यावरून निवडकर्त्यांना प्रत्येक खेळाडूचे चित्र स्पष्ट झालेले असेल. बुमराह गेल्यावर्षी ब्रिटनविरुद्ध खेळल्यानंतर पाठीच्या दुखण्यावर उपचार घेत आहे. बुमराहच्या विश्वचषकात खेळण्यासंदर्भातील संकेत आयर्लंडच्या दौर्‍यातूनच मिळतील. जर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो कोणत्याही अडचणींशिवाय गोलंदाजी करू शकत असेल तर त्यास विश्वचषकाच्या तयारीसाठी 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर याकाळात खेळल्या जाणार्‍या आशिया चषकात आणता येऊ शकते. बुमराह हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. अन्य वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर मोहंमद सिराज आणि मोहंमद शामी यांची जागा निश्चित झाली आहे. शार्दूल ठाकूरची फलंदाजीची क्षमता पाहता संधी मिळू शकते. शेवटच्या स्थानाचा निर्णय कृष्णा आणि मुकेशकुमार यांच्यापैकी एकाचा होईल. अर्थात, कृष्णाला बॅकअप गोलंदाज म्हणून ठेवण्याची शक्यता अधिक आहे. वास्तविक तोदेखील आयर्लंड दौर्‍यातून संघात वापसी करत आहे.

राहुल हा संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण तो संघात पाचव्या क्रमांकाची जागा घेण्यासाठी मोलाचा ठरू शकतो आणि यष्टिरक्षक म्हणूनही तो भूमिका बजावू शकतो. राहुल फिट होत असेल तर यष्टीरक्षणाची आघाडी तोच सांभाळेल, असे वाटत आहे. श्रेयस फिट असणेदेखील तितकेच आवश्यक आहे. तो मधल्या फळीत खेळण्यात माहिर आहे. कारण फिरकी गोलंदाजांचा तो सामना चांगल्यारीतीने करू शकतो. तो आपल्या पावलाचा चांगला वापर करतो. श्रेयस हा डावाला वेगदेखील आणू शकतो. परंतु हे दोघे वेळेवर फिट राहत नसतील तर काय पर्याय राहू शकतो? हुकमी फलंदाजांनीदेखील वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर हाराकिरी केल्याने आणि अपेक्षेप्रमाणे खेळी न केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. राहुल फिट नसेल तेव्हाच संजूची एन्ट्री होईल, अशी शयता आहे. वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर संघात सामील होण्यासाठी तिलक वर्मा हा एक उमदा खेळाडू समोर आला. तो आत्मविश्वासाने फलंदाजी करतो. त्याच्या खेळीचा रोहित शर्मादेखील चाहता आहे. जर तो प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत असेल तर श्रेयसचा तो बॅकअप खेळाडू राहू शकतो.

फिरकी गोलंदाजाचा विचार केल्यास कुलदीप यादवने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. तो संघाचा आधारस्तंभ आणि पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, हे त्याने पटवून दिले. रवींद्र जडेजाचे देखील स्थान पक्के आहे. तिसर्‍या फिरकीपटूसाठी अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होऊ शकते. कर्णधार रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, विश्वचषक ताटात सजवून मिळत नाही. यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे, पण आपण किती सक्षम संघ उतरवता यावरच जय-पराजयाचे गणित अवलंबून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या