घरचे झाले थोडे... त्यात व्याह्याने धाडले घोडे

घरचे झाले थोडे... त्यात व्याह्याने धाडले घोडे
घरी पुष्कळ माणसे व गुरेढोरे असून त्यांचीच व्यवस्था नीट होत नाही, अशी अवस्था असताना त्यात जर व्याह्याकडील एखादे घोडे आणखी राखणीस आले तर असलेल्या आपत्तीत आणखी भर पडल्यासारखीच होते. कारण व्याह्याचे घोडे म्हणून नाकारता येत नाही व त्यास खावयास घालायचे तर जवळ काही नाही; अशी चमत्कारिक स्थिती होते. यावरून उपस्थित झालेल्या संकटांत किंवा आपत्तीत आणखी भर पडते, यालाच म्हणतात घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे.

ज्यातील विशेषतः खान्देशातील शेतकरी सध्या विचित्र अडचणीत अडकला आहे. आधी बेपत्ता झालेल्या पावसाने नंतर जो कहर केला; तो आजपर्यंत सुरु आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हातून जाताना पाहत बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी ना केंद्र सरकारकडे वेळ ना राज्य सरकारकडे. त्यामुळे केवळ नेत्यांच्या पाहणी दौर्‍यातून दिलासा देण्याचा होणारा प्रयत्न किती तकलादू असतो, याचा अनुभव याची देही याची डोळा अनेकवेळा बळीराजाने घेतलेला आहे. आजही खान्देशात त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व वादळामुळे कंबरडे मोडलेल्या बळीराजाच्या हाती कवळी मिळालेली नसताना आता उत्तर प्रदेशात झालेल्या शेतकर्‍यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या म्हणजेच सोमवारी महाविकास आघाडीने बंदची हाक दिल्याने घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे अशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

बळीराजाला पावसाने कितीही झोडपले अथवा रुसला तरी त्याच्याशी नेहमीच आपुलकीचेच नाते राहिलेे आहे. पाऊस रुसला, हसला, हिरमुसला, बरसला अथवा कोपला तरीही त्याला तो आपलाच वाटतो. एखाद्या वर्षी तो धो धो बरसतो तर कधी-कधी थेंब अन् थेंब पाण्यासाठी तरसवतो. त्यात दोन्ही वेळा घालमेल होते ती बळीराजीच. हो, मात्र या दोन्ही वेळेस पर्यटन होते ते राजकीय नेत्यांचे. ते कोणत्याही पक्षाचे असो, शेतकर्‍यांच्या बांधावर जायचे, त्यांचे पंचनामे करायचे आणि भाबड्या बळीराजासमोर अधिकार्‍यांना झापायचे. 10 ते 15 दिवसांत मदत मिळेल, असे आश्वासन द्यायचे आणि पुढचे गाव गाठायचे. हा आता नित्याचा अनुभव झाला आहे. त्यात गावकीतील तरुण मंडळी एमपीएसी, यूपीएससीची तयारी सोडून या पुढार्‍यांच्या मागे-पुढे फिरत आपले आयुष्य अंधाराच्या खाईत लोटत आहे; हेदेखील विसरत आहेत.

ही सारी शेतकर्‍यांची मुले असल्याने एकीकडे शेतीचे तर दुसरीकडे पिढीचे होणारे अतोनात नुकसान तो आपल्याच डोळ्यात साठवत अश्रू गिळत आहे. या सार्‍यांचा उहापोह करण्याचे कारण जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या नष्ट झालेल्या पिकांची पाहणी करताना फिरणारे पुढारी अन् शेतकर्‍याच्या हातात मिळालेली मदत हा गंभीर विषय आहे.

राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करायची? असा प्रश्न विचारला जातो. एखाद्याला झोडपून काढावे, तसा पाऊस कोसळतोय. आपल्या माणसांनी आपलाच घात करावा तसा अवकाळीच्या रूपात येणारा पाऊस शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये, बांधावर धुडगुस घालतोय. मुलासारखे काळजीने वाढविलेली पिके डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहून बळीराजाच्या जीवाची घालमेल होते.

तीच स्थिती सध्या राज्यातही आहे. काही ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री पोहोचले आणि बांधावरच पंचनामे झाले. मदत मात्र पाच वर्षाआधी झालेल्या नुकसानीची मिळतेय, एकीकडे राज्य सरकार तर दुसरीकडे केंद्र सरकार अशी स्थिती असताना एकमेकांकडे बोट दाखवत शेतकर्‍यांना वाकुल्या दाखवित आहे. त्यामुळे आपल्याच अनेक समस्या असताना आता उत्तर प्रदेशात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी काही राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे.

त्याला सर्वसामान्य शेतकरी म्हणून प्रत्येकाचा पाठिंबा आहे. मात्र, याचवेळी माझ्या राज्यातील, जिल्ह्यातील बळीराजाच्या दु:खासाठी एखाद्या दिवशी, पंजाब, गुजरात, राजस्थानमध्येही बंद पाळण्यात आला तर आतापर्यंत आत्महत्या करून जीवन संपविणार्‍या माझ्या बळीराजाला खरी श्रद्धांजली ठरेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com