संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाई

सुरेखा बोऱ्हाडे

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

महाराष्ट्रातील पहिली मराठी भाषिक कवयित्री, संपूर्ण भक्त संप्रदायातील महिला सद्गुरू म्हणून अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई! बुद्धिमान, ज्ञानी अशा संतांना आपल्या प्रखर विद्वत्तेने आणि अधिकारवाणीने गुरुमंत्र देऊन ही शलाका तळपती झाली. भक्तश्रेष्ठ संत नामदेवांना विसोबासारखा गुरू मुक्ताईमुळे मिळाला.

मुक्ताईने बोध खेचरासी केला।

त्यांने नामयाला बोधियेले।

तर लहानशा मुक्ताईचे अलौकिक ज्ञान बघून योगी चांगदेवांचा अहंकार गळून पडला. मुक्ताई स्वतःतील योगसामर्थ्यामुळे आणि प्रेमळपणामुळे सर्व भावंडांची वंदनीय माय तर झालीच त्याबरोबर सर्व संतवर्गाची गुरुमाऊली झाली. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी बहीण मुक्ताबाईस सनद दिली. यात ते म्हणतात,

आठवे समाधीचे अंग आले तुज।

आता नाही काज आणि कांसी॥

या शब्दातून मुक्ताबाईंचे मोठेपण दिसून येते.

अशा या संत कवयित्री मुक्ताबाई यांचा जन्म आपेगावमध्ये इसवी सन 1279 मध्ये झाला. वडील विठ्ठलपंत तर आई रुक्मिणी हे होते. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना व अवमानाला सामोरे जावे लागले. हे चार भावंडे म्हणजे विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप होते. आपल्यानंतर आपली मुले सुखी राहावीत म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित हा निर्णय मान्य करून देहत्याग केला. माता-पित्याच्या जाण्याने खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ, सोशिक व समंजस होऊन आपल्या तीनही भावंडांच्या आई झाल्या. संन्याशाची मुले म्हणून समाजाने या चारही भावंडांची खूप अवहेलना केली. त्यांना अनंत यातना दिल्या, दुःख दिले. हे सारे दुःख भोगत या चारही बहीण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. कुटुंबाच्या गृहिणीपदाची जबाबदारी मुक्ताबाईने कोवळ्या वयात समर्थपणे पेलली. कधी आई बनून भावाच्या मुखात प्रेमाचा घास भरवला तर कधी कठीण प्रसंगी त्यांना प्रेमाने समजावत आधार दिला. एकदा मुक्ताबाई मांडे बनवण्यासाठी खापर आणण्यासाठी कुंभार वाड्यात गेल्या. या चारही भावंडांना कुणी कसली मदत करू नये असे गावप्रमुखाने बजावल्यामुळे त्यांना कुंभाराकडून खापर मिळाले नाही. मुक्ताबाई हिरमुसल्या, तेव्हा ज्ञानेश्वरांनी योग बळाने स्वतःची पाठ तापवली. त्यावर मुक्ताबाईंनी मांडे भाजले. या प्रकाराने विसोबा प्रभावित झाले. पुढे त्यांनी मुक्ताबाईंचे मार्गदर्शन घेतले. संत नामदेवांनी विसोबांना गुरू केले. मुक्ताईंविषयी संत नामदेव म्हणतात,

लहानसी मुक्ताबाई जैसी सणकांडी.

योगसिद्धीचा अहंकार झालेल्या चांगदेवाबाबत मुक्ताबाई म्हणतात,

योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु।

तयाचा विवेकु जाळी परता ॥

तपस्वी व ज्ञानी असलेल्या योगी चांगदेवांना मुक्ताबाईंनी पासष्ठीचा अर्थ उलगडवून दाखवला. तेव्हा चौदाशे वर्षांच्या चांगदेवांनी आत्मरूपाची ओळख करून देणार्‍या या आठ वर्षांच्या मुक्ताईला आपले आध्यात्मिक गुरू केले. कृतार्थपणे चांगदेव म्हणतात,

मुक्ताई करे लेइले अंजन

ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी मोठे बंधू निवृत्तिनाथ यांना गुरू मानून त्यांच्याकडून विद्या संपादन केली. परंतु जेव्हा संत ज्ञानेश्वरांनी स्वतःला आत्मक्लेषामुळे दार बंद करून कोंडून घेतले तेव्हा मुक्ताबाईंनी मोठे होत बंधूला समजावत, वास्तवाचे आणि कर्तव्याचे भान ताटीच्या अभंगातून दिले. त्यावेळी तर त्या प्रत्यक्ष सरस्वती, प्रेमळ आई ठरल्या. दार बंद करून बसणार्‍या ज्ञानोबांना मुक्ताबाई म्हणतात,

योगी पावन मनाचा। साहे अपराध जनांचा

विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी....

लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्दल ठायीचे ठायी।

तुम्ही तरुण विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।

अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे.लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा असे मुक्ताबाईंनी आई होऊन प्रेमाने समजावल्यामुळे ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर त्यांच्या हातून अलौकिक असे ज्ञानेश्वरी निर्मितीचे कार्य घडले. यावेळी ज्ञानेश्वरांना समजावण्यासाठी संत मुक्ताबाईंनी रचलेले हे एकूण 42 ताटीचे अभंग मराठी संत साहित्यातील अनमोल रत्ने आहेत. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी या अभंगाची रचना आहे. याबरोबरच हरिपाठाच्या अभंगात मुक्ताबाई लिहितात,

अखंड जयाला देवाचा शेजार

कारे अहंकार नाही गेला ।

मान अपमान वाढविसी हेवा

दिवस असता दिवा हाती घेसी ॥

मुक्ताबाईंच्या काव्यातील हे विचारधन सोप्या भाषेत आहे परंतु अत्यंत परखड आहे.

संत नामदेवांच्या परीक्षेच्या निमित्ताने मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती भावंडांना आली आणि मुक्ताबाई या तीन भावंडांबरोबरच सर्व संत परिवाराला माता स्वरूपात वंदनीय झाल्या. मुक्ताबाईंना गोरक्ष कृपेची अमृत संजीवनी लाभली. संत ज्ञानेश्वर, इतर भावंडे, संत नामदेव जेव्हा तीर्थाटनास गेले तेव्हा मुक्ताबाई अज्ञातवासात राहिल्या. तीर्थयात्रेवरून परतल्यावर ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्याचा आपला मानस बोलून दाखवला. तेव्हा कुठल्याही संसारीक किंवा भावनेच्या बंधनात अडकून न पडता सर्व भावंडे त्यासाठी सिद्ध झाले. प्रथम ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. सोपानदेव यांनी सासवड येथे समाधी घेतली. निवृत्तिनाथ आणि नामदेव यांच्या समवेत मुक्ताबाईंनी आपेगाव, वेरूळ, घृष्णेश्वर असा प्रवास केला. पुढील वाटचालीदरम्यान ज्ञानबोध या ग्रंथाची निर्मिती झाली. या ग्रंथात संत निवृत्तिनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे 12 मे 1297 मध्ये तापी नदीकिनारी वास्तव्यास असताना ही प्रखर ज्ञानमय मुक्ताई आपल्यासारख्याच जाज्वल्य तळपत्या विजेच्या प्रवाहाबरोबर आकाशात लुप्त झाली. पृथ्वीतलावरचा आपला कार्यभाग त्यांनी संपवला. मुक्ताईंचे साहित्य, संत वर्गामध्ये असलेला त्यांचा अधिकार मात्र कालातीत अबाधित राहणार आहे.

लोकसाहित्यातूनही विविध प्रकारे मुक्ताई आजही भेटत राहतात, माझ्या मुक्ताचं चांगुलपण गं जसं केवड्याचं पान. मुक्ताबाईचे साहित्य-विचार परखड, जाज्वल, मार्गदर्शक आहे. त्यांच्या साहित्यातून समाजाला आधार, प्रेमाचा ओलावा मिळाला.

मुंगी उडाली आकाशी । तिणें गिळले सूर्याशी। मुक्ताबाईंच्या साहित्यात सामर्थ्य होते.

भक्तिधारेत, अध्यात्मात, मराठी साहित्यात आणि मराठी माणसाच्या मनात संत मुक्ताबाई यांचे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com