स्वगत चित्ररंगी रमणाराचे!

स्वगत चित्ररंगी रमणाराचे!

सुरांच्या दुनियेत रमणारा मी अचानक चित्रांच्या दुनियेत आलो आणि इथलाच होऊन गेलो. इथूनच ‘माझ्यातल्या मी’चा खरा प्रवास सुरू झाला. अनेक चित्रे काढली, कलाकृती तयार झाल्या, वेगळी शैली जोपासली. आता नवीन पिढीकडून काही सहकार्य अपेक्षित आहे. माझ्या नव्या विचारांची धुरा वाहण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी, असे वाटते...आपण कोणता वारसा मागे ठेवून जात आहोत हे विशद करताना चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा संपादित अंश

प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या गुणांची देवदत्त शिदोरी असते. या शिदोरीचा मान राखत, तिचा योग्य वापर करून घेत स्वत:चा चरितार्थ साधला आणि जमल्यास त्यातला काही भाग दुसर्‍यालाही देण्याचा प्रयत्न केला तर ते ठरते आदर्श जगणे. या जाणिवेनेच मी अंगातली कला फुलवली आणि जमेल तसा आणि तितका या चित्रकलेचा प्रसार केला. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी माझ्या चित्रसंपदेचा समृद्ध वारसा सोपवताना मनस्वी आनंद होतोे.

माझी ओळखच रंगरेषाकार अशी आहे. पण काही पुस्तके लिहिल्याने मी गाण्याचाही वेडा आहे, हेही लपून राहिलेले नाही. नव्या पिढीने माझ्याकडून या दोन्ही गोष्टींची आवड घ्यावी आणि या वारशाचे जतन करावे. मलाही हा वारसा कोणाकडून तरी मिळालेला आहे. मी बेळगावचा. तिथेच माझे बालपण गेले. आजूबाजूच्या वातावरणातच सूर दाटलेले. 1593, महादेव गल्ली या आमच्या घराला दृष्ट लागेल असा सांगीतिक शेजार लाभला होता. या वातावरणाला भुलून मीही बासरी वाजवायला शिकलो. पण बारा वर्षांचा असताना ब्राँकायटिसचा त्रास झाला आणि ओठाची बासरी गळाली. त्यानंतर मात्र सुरांचे आणि रेषांचे वेड वाढत गेले. माझा अभ्यास यथातथाच. शिक्षणात मी काही प्रगती करेन, असे कधीच वाटले नव्हते. घरूनही शालेय शिक्षणाला कधी फारसे महत्त्व दिले गेले नाही. सुरुवातीला गाण्याचेच जास्त आकर्षण होते. सूर तृप्त करत होते. पण एकदा घर आवरताना वडिलांनी साठवलेली चित्रे हाती पडली आणि माझे जगच बदलले. डब्ल्यू लँगहॅमर, चित्रकार प्र. ग. सरूर, चित्रकार दीनानाथ दलाल, चित्रकार द. ग. गोडसे यांच्या कथाचित्रांनी माझी सांगीतिक भूक चित्रमाध्यमातून जागवली. झालेल्या त्रासामुळे मी गाऊ शकत नव्हतो पण सापडलेल्या चित्रांच्या रूपाने संगीतापासून दुुरावलेले सगळे दृश्य स्वरुपात सापडले आणि चित्रकलेकडे ओढला गेलो. तो क्षण माझ्या आयुष्याला वळण देणारा ठरला.

के. बी. कुलकर्णी, आर. बी. पवार आणि आजगावकर या तीन चित्रकारांनी स्थापन केलेल्या ‘कलानिकेतन’ या संस्थेत माझे शिक्षण सुरू झाले. नंतर चित्रकलेचा दर्जा, सचोटी आणि निकष यांना सर्वोच्च स्थान देत के. बी. कुलकर्णी सरांनी ‘चित्रमंदिर’ ही संस्था सुरू केली. त्यामुळे उच्च कलाशिक्षण माझ्या गावातच पार पडले.

त्यावेळी पवार नावाचे आमचे सर होते. त्यांनी मला पेन्सिल तासायची योग्य पद्धत शिकवली आणि माझे पेन्सिल ड्रॉईंगवरचे प्रेम वाढत गेले. यातच माझ्या शैलीची बीजे सापडली. रेषांना विशिष्ट वळण देणे, भावस्पर्शी रेषानिर्मिती हे तंत्र समृद्ध होत गेले. स्वत:च्या ड्रॉईंगकडे अलिप्तपणे पाहण्याची दृष्टी मिळाली. पण इतके झाले तरी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला मी नापास झालो. डिप्लोमाचे काम सब्जेक्टिव्ह असल्याने पासिंगसाठी परीक्षकांचे मत महत्त्वाचे होते. माझ्या शैलीचे आकलन न झाल्याने पन्नास टक्के पासिंग आवश्यक असलेल्या या परीक्षेत मी सपशेल आपटलो. माझी पुन्हा परीक्षा द्यायची तयारी होती. कारण पासिंग नव्हे तर लक्षवेधी काम माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते पण नंतर असे काही घडले की नापासाचा शिक्का बसला असताना मला पास म्हणून घोषित करण्यात आले. खरे तर यापेक्षा जास्त चांगले काम करून दाखवण्याची इच्छा असल्याने पास झाल्याचे दु:खच जास्त झाले आणि त्यामुळेच मी नावापुढे कधीही जी.डी.आर्ट ही पदवी लावली नाही.

आज स्थित्यंतराचे हे टप्पे त्रयस्थपणे बघताना मजा वाटते. प्रत्यक्षात मात्र तो काळ अत्यंत धकाधकीचा होता. माझे काम बघून पी. जी. शिरूर नामक व्यक्तीने मुंबईत येण्याचे सुचवले होते. तो साधारणपणे 1957 चा काळ. पण नंतर मीच त्या संधीचा लाभ घेऊ शकलो नाही. त्यामुळे डिप्लोमानंतरचे सहा महिने हातात काहीच काम नव्हते. हा काळ बर्‍यापैकी नैराश्याचा होता. नंतर एका कॅलेंडरची असाईनमेंट मिळाली. काम सिलेक्ट झाल्यास जॉब मिळणार होता. हे काम सिलेक्ट झाले आणि रमेश संझगिरी यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बोलावून घेतले. तोपर्यंत मी ब्रशने लाईन ड्रॉईंग करत नव्हतोे. पण इथे असताना मला ब्रशलाईनची ताकद कळली. आमच्या वेळी भरपूर स्पर्धा होती, पण ती अत्यंत निकोप होती. त्यामुळे कामातला रस वाढत गेला. यानिमित्ताने सध्याच्याही पिढीने निकोप स्पर्धा ठेवावी, असा माझा आग्रह असेल.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोन वर्षे घालवल्यावर मी ‘ब्रिटीश ओव्हरसीज मार्केटिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस अ‍ॅड एजन्सी’ (बोमास)मध्ये रुजू झालो. तिथे मी सर्वाधिक म्हणजे दहा वर्षे काम केले. या संस्थेनेच मला नैरोबी ब्रँचमध्ये पाठवले. हाही आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणायला हवा. कारण यानिमित्ताने मला इंग्लंड, न्यूझीलंडमधल्या चित्रकारांची कामे बघायला मिळाली. व्हिक्टर हॅसलर नावाचा आमचा आर्ट अ‍ॅडव्हायझर होता. त्याच्यामुळे मोठमोठ्या भिंतीवर काम करण्याचे वेगळेच कौशल्य मिळाले. खरे तर त्याला भारतीय चित्रकारांबाबत अजिबात आदर नव्हता. तो त्यांना अत्यंत तुच्छ लेखे. पण माझे काम पाहिले आणि त्याचे मत बदलले. ‘तू माझे मत बदलवले, माझ्याकडे कामाला ये,’ अशी त्याची स्टँडिंग ऑफर होती. पण मी ती स्वीकारली नाही. त्यानंतर नैरोबीत काम करण्याची संधी मिळाली. ‘तुम्ही लंडनच्या कुठल्या आर्ट स्कूलमध्ये शिकलात?’ असे मला वारंवार विचारले जायचे. त्यातूनच कामाचा दर्जा सिद्ध होत होता. आपले काम त्यांच्या तोडीचे आहे ही भावनाच सुखावह होती. पण तिथे कायम वास्तव्य करायचे नाही हे ठरवले असल्याने मी परत आलो. परत आल्यानंतर पुन्हा त्याच एजन्सीत काम सुरू केले. पण 1973 मध्ये जॉब सोडला आणि फ्रीलान्स कामाला सुरुवात केली.

काम केले की पैसे मिळतातच. त्याचे प्रमाण बदलते इतकेच. पूर्वीही मला पैसे मिळत होते. पण याच सुमारास आर्किटेक्चर रेंडरिंग या नव्या क्षेत्राशी माझा परिचय झाला. एक मित्र माझ्याकडे ब्रोशर डिझायनिंगसाठी आला. त्याच मीटिंगमध्ये एका आर्किटेक्टला चित्रकाराची गरज आहे हे समजले. मीटिंगला गेल्यावर काम बघून मीच त्याच्या प्रोजेक्टचे आर्किटेक्चर रेंडरिंग करावे, अशी गळ त्याने घातली. मलाही हे वेगळे काम आवडले. एक चित्रकार हे काम करू शकेल हा विचारच तोपर्यंत केला गेला नव्हता. पण माझी पहिली असाईनमेंट लोकांना आवडली आणि अशा प्रकारच्या कामाचा ओघच सुरू झाला. त्याच काळात शहरेही वाढत होती, उपनगरे विकसित होत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इमारती बांधल्या जात होत्या. सगळी समीकरणे जुळून आल्याने माझ्याकडे कामाचा अखंड स्रोत सुरू झाला आणि उत्पन्नाचाही. या कामाने मला भरपूर पैसे मिळवून दिले.

त्यामुळेच मी स्टुडिओ वाढवला, कलाकारांना ट्रेन केले आणि एक मोठा सेटअप तयार झाला. मला अजूनही आठवतेय, त्यावेळी माझा दिवस साडेपाचला सुरू व्हायचा आणि मध्यरात्री दोनच्या सुमाराला संपायचा. त्या कामाचे स्ट्रक्चर वेगळे होते आणि चॅलेंजही. याच कामाच्या निमित्ताने मी ‘थंबनेल’ करायला लागलो. पुढच्या पेंटिंगसाठी हा सराव उपयुक्त ठरला. इतके सगळे झाले तरीही मनासारखे सगळे करता आले, असे मी म्हणणार नाही.

मला प्रिंट मेकिंगमध्ये काम करायचे होते. कार्व्हिंग करून ब्लॉक तयार करायचा आणि इंक लावून छापायचा हे तंत्र मला शिकायचे होते. पण कामाच्या धबडग्यात हे काही जमले नाही. मनातले गाणे ओठावर आणता आले नाही.

आर्ट ही एक ‘मेंटल अ‍ॅक्टिव्हिटी’ आहे हे मान्य, पण ती इंटिलेक्च्युअल अ‍ॅक्टिव्हिटीही असायला हवी. तरुणांनी माझ्या पुस्तकांचा वारसा जपावा. ती मनापासून वाचावीत, त्याचे डॉक्युमेंटेशन करावे, असे वाटते. लोकांचे बळ मिळाले तरच ही चळवळ पुढे जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com