द़ृढनिश्चय, जिद्द आणि परिश्रमाने स्पर्धा परीक्षेत यश

द़ृढनिश्चय, जिद्द आणि परिश्रमाने स्पर्धा परीक्षेत यश
गरूडासारखी उंच भरारी घेण्याची वृत्ती मनुष्याच्या अंर्त:मनात निर्माण झाल्याशिवाय अपेक्षेनुसार यशाच्या शिखराची उंची गाठता येत नाही. परिश्रम, जिद्द व योग्य मार्गदर्शन हे नेहमीच आपल्याला आपल्या ओंजळीत फळ देऊन जात असतात. किंबहुना आजपर्यंत यशस्वी झालेल्या अनेक व्यक्तींनीही ही त्रिसुत्री अंगिकारल्याचे सांगितले आहेत आणि ते आजही तंतोतंत लागु पडते. ही त्रिसुत्री जे जे अंगिकारतात त्यांच्या पदरात यशाच्या अगणित राशींची उधळण होत असते. हे कोणीच नाकारू शकत नाही. मग तो शहरी भागातील असो वा ग्रामीण भागातील.

यावल तालुक्यातील न्हावीसारख्या ग्रामीण भागातील मूळ रहिवासी असलेल्या नेहेते परिवारातील डॉ.अतुल नेहेते हा मुलगा क्लास वन अधिकारी होईल असे त्यावेळी वाटले नव्हते. शिक्षक दाम्पत्याचा मुलगा म्हणून ओळख असलेल्या डॉ.अतुलने परिश्रम, जिद्द आणि आई-वडील, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने या ओळखीत वाढ करून क्लास वन अधिकार्‍याचे हे आई-वडील अशी नवी ओळख आई-वडिलांना मिळवून दिली आहे. हे यावरच थांबलेले नसून ज्या गावातून तो क्लास वन अधिकारी झाला आहे त्या न्हावी या गावालाही एक नवी ओळख त्याच्यामुळे मिळाली आहे.

प्राथमिक शिक्षक हेमचंद्र (डालू) रामा नेहेते व प्राथमिक शिक्षिका सौ.प्रभावती हेमचंद्र नेहेते यांचा थोरला मुलगा डॉ.अतुल हेमचंद्र नेहेते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पशुसंवर्धन अधिकारी श्रेणी-1 (एल.डी.ओ-लिव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर) या परिक्षेत यश मिळवले आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि एका बाजुने पाहिले तर स्पर्धा परिक्षेत खूप अभ्यास करून, क्लासेस लावून यश मिळवणे फार काही विशेष नाही. कारण शहरात स्पर्धा परिक्षेबाबत 16 ते 18 तास घोकमपट्टी करून अभ्यास करून घेणारे व्यावसायीक खासगी क्लासेस आहेत. पदवीनंतर अनेक युवक असे क्लास लावून कधी पहिल्या तर कधी दुसर्‍या पाचव्या प्रयत्नात यश मिळवतात. ते कौतुकास्पद आहेच. त्यात शंका नाही. परंतू ज्याचे मुळात शिक्षण ग्रामीण भागात झालेले आहे. आई-वडील जरी शिक्षक असले तरी या दोघांवर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी असते. केवळ शाळेच्या वेळेत वर्गात जाऊन शिकवणे, शाळेच्या विविध अ‍ॅक्टिव्हिटी राबवणे, पेपर तपासणे एवढेच शैक्षणिक काम दिसत असले तरी अनेक अशैक्षणिक कामेही शिक्षकामार्फत शासकीय यंत्रणा करून घेत असतात. त्यामुळे स्वत:च्या मुलाच्या करिअरकडे पुरेसे लक्ष देता येणे शक्य होतेच असे नाही. मिळेल त्या वेळेतून मुलांच्या अभ्यासाकडे, त्याच्या करिअरकडे नेहते दाम्पत्याने लक्ष दिले. नेहेते दाम्पत्य ग्रामीण भागात शिक्षक असल्याने अतुलचे पूर्व प्राथमिक शिक्षण रावेरच्या निंभोरा येथील जि.प. मराठी शाळेत झाले. निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण भुसावळच्या जवाहर नवोदय विद्यालयात घेतले.

बारावीनंतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा ओढा हा अभियांत्रिकी, फार्मसी किंवा तत्सम शाखेकडे असतो. ग्रामीण भागात शिक्षण झालेल्या अतुलला डॉक्टर होऊन ग्रामीण भागातील रूग्णांची सेवा करण्याची इच्छा होती. परंतू एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस.या शाखेकडे प्रवेश न मिळाल्यामुळे तिची इच्छा पशुवैद्यकीय शिक्षणातून पूर्ण करण्याचे निश्चित केले. वैद्यकीय शिक्षण घेणे ही मनस्वी इच्छा असल्याने मी या शाखेकडे ओढला गेला असल्याचे अतूल सांगतो. माध्यमिक शिक्षण घेत असताना एक विशिष्ट नवीन शिक्षण प्रक्रिया अंतर्गत आपला अभ्यासक्रम पूर्ण व्हावा यासाठी सदर कालावधीत नवोदय विद्यालयाचे डॉ.राजेंद्र पांडे, खैरनार सर, होलंबे सर, सिंग सर व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी माझी निवड पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर, जिल्हा लातूर येथे झाली. तेथे माझे बी.व्ही.एस.सी.चे शिक्षण पूर्ण झाले. तदनंतर एम.व्ही.एस.सी.साठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे पूर्ण करीत असताना पशुसंवर्धन अधिकारी यासाठी असलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एम.पी.एस.सी.) मी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो. महाविद्यालयीन शिक्षण घेताना उदगीर येथील डॉ.मुंगडे, डॉ.सूर्यवंशी, डॉ.अनिल भिकाने व मुंबई येथील डॉ.झेंडे, प्रा.व्ही.एम.वैद्य यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. त्याच प्रेरणेतून मी ही एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे अतुल सांगतो. त्यासाठी त्याने कोणताही क्लास लावलेला नव्हता हे महत्त्वाचे आहे.

एम.पी.एस.सी.परीक्षाबद्दल सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे उदासीनतेचे धोरण असते. परंतु समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा निर्माण झाल्यानंतर आपणही शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत राहून ती पूर्ण करू शकतो. पशुसंवर्धन अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुवैद्यकीय शाखेसाठी निर्धारित पदांची निर्मिती करून शेतकर्‍यांच्या पशुधनाची वाढ होण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे म्हणून मी जिद्दीने या स्पर्धेकडे पाहू लागलो. सदर परीक्षेसाठी विषयांतर्गत असलेली परिक्रमा पुस्तके वापरून अभ्यासाची मनापासून तयारी केली.

पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातून पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खासगी क्षेत्रातही भरपूर संधी उपलब्ध असतात. पशुऔषधी निर्मिती, फार्महाउस, स्वतःचे कॅटल फार्म व खासगी सल्लागार म्हणूनही सेवा उपलब्ध करू शकतात.

स्पर्धा परीक्षा तरुणांनी द्याव्या की नको याबाबत बोलताना ते म्हणाले की समाजाच्या विकासासाठी व पुढे नेण्यासाठी चांगल्या अधिकार्‍यांची निर्मिती याद्वारेच निर्माण होते. त्यामुळे समाजातील गरीब-गरजू लोकांना आपली मदत होऊ शकते. तसेच पदावर गेल्यानंतर आपल्यातला माणूस आपण ओळखू शकतो.

सर्वसाधारण विद्यार्थी एम.पी.एस.सी.परीक्षा देत असताना अनुत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षेकडे पाठ फिरवतो, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले अपयशामुळे खचून न जाता सातत्याने कठोर प्रयत्न केल्यामुळे काही काळाने का होईना यश आपल्या पदरात येतेच. त्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याचवेळा परिस्थितीअभावी काही विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. मात्र परिश्रम, निष्ठा, जिद्द निर्माण झाल्यानंतर नक्कीच यश मिळते यात तिळमात्र शंका नाही.

प्रत्येक पालकांमध्ये आपल्या पाल्याकडून काही विशिष्ट अपेक्षा असतात की ज्या ते पालक स्वतः पूर्ण करू शकत नाहीत. त्या त्यांच्या पाल्याने पूर्ण कराव्यात म्हणजे एकप्रकारे पालक त्यांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या पाल्यावर टाकतात, परंतु मुलांनी आपला मार्ग आपल्या इच्छेनुसारच निवडावा, असे ते म्हणाले.

माझ्या आजपर्यंतच्या एवढ्या प्रवासात आई-वडिलांचेही फार मोठे योगदान आहे. किंबहुना तेच माझे मार्गदर्शक आहेत. त्यांनी कधीही माझ्यावर त्यांच्या अपेक्षांचे ओझे लादले नाही. वेळेनुसार योग्य संस्कारही त्यांनी दिले. याचीच परिपूर्ती म्हणून आज मी हे यश संपादन करू शकलो, असे मी अभिमानाने सांगू इच्छितो.

स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी निराश न होता संयम व सातत्य याबरोबर योग्य मार्गदर्शक असणे आवश्यक असते.त्यामुळे आपल्याला जीवनात यश संपादन करता येते, असा सल्ला ते आजच्या तरुणांना देतात.

स्पर्धा परिक्षेसाठीच्या काही ट्रिक्स

स्पर्धा परिक्षेसाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यात स्पर्धा असल्याने एका-एका मार्काने नव्हे तर अर्ध्या अर्ध्यामार्काने स्पर्धा असते. अभ्यासासोबत सामान्य ज्ञान, निरीक्षण आणि मुलाखत देतांना असलेला आत्मविश्वास तसेच प्रसंग कितीही बाका, संतापजनक असला तरी स्वत:वरचे नियंत्रण सुटू न देणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेतांना कायद्यानुसार व शासनाच्या परिपत्रकानुसार काम करणे आवश्यक आहे. शासकीय अधिकारी म्हणून काम करतांना शासन आणि सामान्य जनता यांच्यामधला दुवा/मध्यस्थ म्हणून काम करणे गरजेचे आहे. शांत, संयम, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष यानुसार काम करण्याची मनात ठसवावे. शासकीय योजना या सामान्यांसाठी असतात. त्यामुळे त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावा. शासकीय काम करतांना अडचणी, नियमांची आडकाठी, मर्यादा या येत असतात. परंतु यातुन सुवर्णमध्ये साधण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. तरच यशस्वी अधिकारी म्हणून समाज आणि शासन मान्यता मिळेल. हे लक्षात ठेवावे. डॉ.अतुल नेहेते त्याचा लहान भाऊ दिग्विजय नेहेते इंजिनीअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com