आमदनी अठन्नीतही बजेट बसतेय!

आमदनी अठन्नीतही बजेट बसतेय!

नाशिक | निशिकांत पाटील

महिन्याचे आर्थिक बजेट बसविण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र करोनाने आपण मोजक्या पैशांतदेखील कुटुंब व्यवस्थित चालू शकतो, हे लक्षात आले आहे. आमदनी कमी झाली तरी आहे त्यातूनही बचतीची सवय देखील लागली आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावर सर्वत्र नुकसान होत असताना मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरखर्चावर मात्र नियंत्रण आल्याचे चित्र आहे.

उदाहरणार्थ पूर्वी सामान्यतः नॉर्मल घरांमधील खर्च सुमारे दहा ते बारा हजार रुपये होता तो आता चार ते पाच हजारांवर आला आहे. याचे कारणही तसेच आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. काहींचे पगार कमी झाले आहेत. घरात येणार्‍या पैशाचा ओघ आटला आहे. त्याचवेळी खर्च मात्र कमी झालेले नाहीत.

त्या खर्चाचा मेळ बसवण्याला लोक आता शिकले आहेत. लॉकडाऊन पूर्वी मध्यमवर्गीय कुटुंब किमान महिना-पंधरा दिवसातून एकदा तरी सहकुटुंब बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जात होते. आता तसे राहिलेले नाही. लोक सहपरिवार घरातच जेवण करण्याचा आनंद घेऊ लागले आहेत.

घरात महिनाभरासाठी लागणार्‍या किराणाच्या प्रमाणात थोडीशी वाढ जरी झाली असली तरी मात्र दर महिन्याच्या बजेटच्या तुलनेने हा खर्च जवळपास निम्म्यावर आल्याने मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या खिशात थोडीशी बचत होत असल्याचे लोक सांगतात.

महिन्याचे आर्थिक बजेट बसविण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र करोनाने आपण मोजक्या पैशात देखील कुटुंब व्यवस्थित चालू शकतो हे लक्षात आले आहे.

लॉकडाऊनमुळे बर्‍याच जणांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत तर काही जणांना घरूनच काम करावे लागत असल्याने पगार देखील काही टक्के कमी मिळत असला तरी बाकीचे अनावश्यक खर्च बंद झाल्याने कमी पगारात देखील जगणे शक्य होत आहे. काही प्रमाणात आवडीनिवडीना मुरड घालायला माणसे शिकली आहेत.

भविष्यात ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवली तर बचतीची सवयच लागेल. करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा एकदा सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनावश्यक घराबाहेर पडणे बंद असल्याने पेट्रोलची देखील मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबांना ‘आपण इतक्या पैशात देखील जगू शकतो’ हे समजले आहे. कमी पैशात जगण्याची सवय लागल्याने येणार्‍या काळात याचा नक्कीच फायदा होईल, यात शंकाच नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com