Thursday, April 25, 2024
Homeशब्दगंधकहीं ये ’वो’ तो नहीं...

कहीं ये ’वो’ तो नहीं…

‘लता मंगेशकर’ हे नावच इतके जादूमय आहे की, त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी, प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातात. दीदींच्या स्वरांनी धर्म, भाषा, जात, पात, देश, खंड, उपखंड न मानता एकछत्री अंमलाखाली अनेक वर्षे अधिराज्य गाजवले. आचार्य अत्रेंनी म्हटल्याप्रमाणे ‘लोण्यात केशर विरघळावे’ तसा दीदींचा आवाज! बालपणापासून दीदींनीच सर्वात प्रथम अनेक पिढ्यांना ‘दर्जेदार संगीत’ काय असते हे शिकवले. चांगले-वाईट जाणण्याची नीर क्षीर विवेकबुद्धी दिली. आज देहरुपाने त्या गेल्या असल्या तरी रसिकांचे प्रेम अव्याहत सुरूच राहणार आहे.

साल 1982…. भावगंधर्व पंडित हृदयनाथजी मंगेशकरांचा एके दिवशी अनपेक्षितपणे मला फोन आला….. मी मुंबई दूरदर्शनसाठी एक दिवाळी पहाट स्पेशल… ‘शब्दांच्या पलीकडले’ करतोय. मी आणि दीदी गातोय. त्यात तुम्हीही गावे अशी आमची इच्छा आहे…. हे फोनवर ऐकताक्षणी माझ्या पायात कापरे भरले आणि आनंदाने हात थरथरू लागले. हे सारे काही ‘विश्वासाच्या पलीकडले’ होते. आजही माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना परमेश्वराच्या अस्तित्वाची सदैव साक्ष देतात.

दीदींनी आणि बाळासाहेबांनी मला ‘तरुण आहे रात्र अजुनी’ गायला बोलावले खरे, मात्र रेकॉर्डिंगच्या आदल्या रात्री मी बाळासाहेबांकडून गाणे घेऊन घरी परतल्यावर मला, तुमचे उद्याचे रेकॉर्डिंग कॅन्सल झालेय असे सांगणारे निनावी फोन वारंवार येऊ लागले. इतकी मोठी सुवर्णसंधी हातून जाईल की काय, असे वाटून मी खट्टू झाले. बाळासाहेबांना फोन केल्यावर ते म्हणाले, दीदीशी बोलून घे. त्वरित मी दीदींना फोन केला आणि सारे सांगितले…. त्यावर त्या गोड आवाजात म्हणाल्या, ही तर तुमच्या यशाची पहिली पायरीच समजा. माझ्याही बाबतीत करिअरच्या सुरुवातीला असेच घडायचे!

- Advertisement -

सन 1981 मध्ये अनिल-अरुण या संगीतकार द्वयींच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ मध्ये मी गायलेले ‘धुंद मंद ही अशीच सांज उतरली’ हे माझे दूरदर्शनवरचे अगदी पहिलेवहिले गीत ऐकून ही मुलगी कोण? हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला आणि मला हिच्याकडून गाऊन घ्यायचेय…. ही दीदींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनिल मोहिलेंकडून मला समजल्यावर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.

‘लता मंगेशकर’ हे नावच इतके जादूमय आहे की, त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी, प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातात. दीदींनी माझे ‘धुंद मंद…’ गाणे ऐकून मला सहीसकट भेट दिलेल्या एल.पी.रेकॉर्डस् आजही मी जपून ठेवल्यायत. ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हा तरी पहाटे’ व ‘लवलव करी पातं’ ही गाणी बाळासाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाऊन घेऊन दीदींनी, मला हिच्याकडून गाऊन घ्यायचेय हा शब्दही पुरा केला.

असेच कधीतरी गप्पा मारताना, दीदी त्यांच्या परिचयातील जुन्या गायकांच्या गायकीची हुबेहूब नक्कल करून दाखवत. त्यावेळी 25-30 वर्षांपूर्वीचे सारे काही दीदींना जसेच्या तसे कसे काय आठवते, याचे मला कुतूहल वाटे… तर मग कधी त्या माझ्याच समक्ष, दोन्ही हातांनी हातवारे करून, मी जशी गाते तशीच थेट नक्कल करून दाखवत हास्याचे फवारे उडवत.

एकदा दीदींनी मला, मी भरली वांगी कशी करते ते पाहायला या म्हणून स्वत:च्या सपाता मला घालायला देऊन स्वयंपाकघरात नेले. मला कोण आनंद! जणू काही त्यांच्या सुरांनी त्यांच्या सपातांतून माझ्या शरीरात विजेप्रमाणे प्रवास केला तर…. काय मज्जा येईल? असेच मला वाटत होते.

कढई, तेल, मसाले, बारीक चिरलेला कांदा, छेद असलेली छोटी वांगी, सारे काही आधीच तयार होते. जणू काही संगीत दिग्दर्शकाने वाद्यवृंदासह गाण्याची जय्यत तयारी केल्यासारखे! मग दीदींनी सर्व मसाले प्रमाणात घेऊन एका ताटात कालवले आणि छेद असलेल्या वांग्यांत भरून ती वांगी अलगदपणे उकळत्या तेलात सोडली. ही सर्व प्रक्रिया मला दीदींच्या गाण्याप्रमाणेच भासली.. संगीतकाराने तयार ठेवलेल्या प्रत्येक गाण्यात, भावभावनांचे रंग योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रमाणात मिसळून, दीदी किती तरलपणे रसिकांसमोर सादर करतात तशीच! गंमतच सारी न्यारी! सारे काही खमंग, चविष्ट आणि सुरेल!

बालपणापासून दीदींनीच सर्वात प्रथम अनेक पिढ्यांना चांगले ‘दर्जेदार संगीत’ काय असते हे शिकवले. त्यांनी चांगले-वाईट जाणण्याची नीर क्षीर विवेकबुद्धी दिली. हिंदुस्थानी संगीतातला लखलखता जरतारी, उत्तुंग स्वर म्हणजे मास्टर दीनानाथ! या ओजस्वी आणि तेजस्वी दीनानाथांचीच कन्या ती! ते तेज आणि ओज दीदींमध्ये उतरले नाही तरच नवल! आचार्य अत्रेंनी म्हटल्याप्रमाणे ‘लोण्यात केशर विरघळावे’ तसा दीदींचा आवाज! कधी दूरदूरच्या दौर्‍यात, प्रवासात एकटे असताना दीदींचे गाणे कानावर पडले तर केवढा मोठा आधार वाटतो आणि एकटेपण पळून जाते.

कुठे कसे गावे, कुठे कसा शब्दोच्चार करावा, तलमपणे व तरलपणे भावना कशा व्यक्त कराव्यात, कुठे ठहराव घ्यावा, कुठे श्वास घ्यावा, कुठे हरकती, मुरक्या घ्याव्यात नि कुठे घेऊ नये, तसेच चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेला साजेशा आवाजात गायलेले गाणे… एक ना दोन… अशा अमाप गोष्टींच्या अचूकतेचा ‘वस्तुपाठ’ म्हणजे साक्षात दीदी! सरस्वतीचाच वरदहस्त तो!

26 जानेवारी 2001 रोजी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्काराने दीदींना ‘भारतरत्न’ व मला ‘पद्मश्री’ने सन्मानित केल्याचे एकाच वेळी जाहीर झाले अन् दीदींचे मला अभिनंदनपर सुंदर पत्र आले. मी भाग्यवान अशी की, दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातील सोहळ्यातही मला दीदींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न स्वीकारताना पाहायला मिळाले. माझे नाव पुकारल्यावर पुढे येऊन मी या गानसरस्वतीला वाकून नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ‘विश यू द बेस्ट’ असा छान आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’चा स्वीकार केला. हे सारे क्षण माझ्यासाठी केवळ अनमोल आहेत.

असेच एकदा अमेरिकेच्याच एका दौर्‍यात दीदींच्या लॉस एंजेलिसमधल्या एका कार्यक्रमास मी त्यांना ऐकायला गेले होते. गंमत म्हणून चॉकलेटस् घेऊन गेले. ती भेट हातात देताना दीदींच्या थंडगार हाताचा स्पर्श जाणवला… अगदी बर्फासारखा! वाटले, या संगीताच्या सर्वोच्च स्थानावर असताना दीदींना का बरे टेन्शन यावे? पण मग लगेच जाणवले…. त्यांना त्यांच्या ‘लता मंगेशकर’ असण्याचे टेन्शन असावे कदाचित! दशकानुदशके तोच उत्तुंग दर्जा सातत्याने अबाधित राखणे याचे हे फार दुर्मिळ उदाहरण! त्यावेळी दीदींच्या प्रत्येक दौर्‍यात, माझे गुरुजी ‘पद्मश्री’ पंडित हृदयनाथजी त्यांच्याबरोबर असायचे, तेही कंट्रोलरूममध्ये! अशी घरच्या विद्वान मंडळींची साथ असणे हे कलाकाराला मानसिकदृष्ट्याही फार महत्त्वाचे असते. दीदींच्या आयुष्यात बाळासाहेबांचे अस्तित्व हे असेच अनन्यसाधारण होते.

माझे गुरू आदरणीय बाळासाहेबांच्या प्रोत्साहनामुळे व वादकांच्या आग्रहामुळे मी दीदींच्या पंच्याहत्तरीला दीदींना मानवंदना म्हणून ‘तेरे सूर और मेरे गीत’ या कार्यक्रमास सुरुवात केली. दीदींनी इतक्या अप्रतिम गायलेल्या या गाण्यांना त्यांच्याव्यतिरिक्त कुणी स्पर्शू नये असे वाटायचे, म्हणून जवळपास दोन वर्षे मी या कार्यक्रमास नकार देत होते. परंतु साक्षात दीदींनी तुझे कौतुक केलेय त्यामुळे तू त्यांना तुझ्या गाण्यातून जरूर मानवंदना दे. या वादकांच्या प्रेमळ आग्रहामुळे शेवटी मीही सर्व गाणी मूळ सौंदर्यगाभा न बदलता माझ्या शैलीत गायचे ठरवले. माझ्या बालपणी दीदींच्या ज्या गाण्यांचे संस्कार झाले ती तसेच सहसा वाद्यवृंदात गायली जात नाहीत अशी गाणी मी निवडली. उदा. ‘जाने कैसे सपनों में, ना जिया लागे ना, अजी रूठकर,…..’ त्यातले ‘कहीं ये वो तो नहीं’ हे गाणे तर बाळासाहेबांचे खूप आवडते, म्हणून ते माझ्याकडून नेहमी म्हणून घेत आणि सांगत, यातला ‘वो’ म्हणजे साक्षात परमेश्वरच मला दिसतो.

कार्यक्रमास सुरुवात करताना, दीदींचा आशीर्वाद घेतेवेळी ‘तेरे सूर और मेरे गीत’ हेच नाव का ठेवले? अशी दीदींनी माझ्याजवळ पृच्छा केली. त्यावेळी मी त्यांचा छोटासा गुलाबी, मऊशार हात हाती घेऊन म्हटले, तुमच्याच गीतात व्यक्त झाल्याप्रमाणे….. धड़कन में तू है समाया हुवा, ख़यालों में तू ही तू छाया हुवा, दुनिया के मेले में लाखों मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुवा….. ही भावना तुम्हांप्रती माझ्या मनात आहे. मधाळ सुरांनी काळीज कापणार्‍या गाण्याचे हेच मोहित करणारे रहस्य आहे.

या दैवी सुरांत परमेश्वराप्रत क्षणार्धात नेण्याचे सामर्थ्य होते. म्हणूनच मला सदैव वाटायचे आणि वाटत राहील की, ‘कहीं ये वो (ईश्वर) तो नहीं?’

- Advertisment -

ताज्या बातम्या